28 February 2021

News Flash

हे टाळता आले असते..

सततच्या हस्तक्षेपाचे कारण देऊन त्या जबाबदारीतून तडकाफडकी राजीनामा देऊन तो मुक्त झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

भारतातील जी दोन क्षेत्रे धर्मवादापासून अजूनही दूर आहेत असे मानले जाते, ती म्हणजे चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट. दोन्ही ठिकाणी जमातवाद झिरपू लागल्याची निव्वळ चर्चा ऐकायला मिळायची. परंतु माजी विक्रमवीर रणजीपटू वासिम जाफरशी संबंधित उद्भवलेल्या वादामुळे क्रिकेटमध्ये या विषाणूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वासिम जाफरकडे उत्तराखंडच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. सततच्या हस्तक्षेपाचे कारण देऊन त्या जबाबदारीतून तडकाफडकी राजीनामा देऊन तो मुक्त झाला आहे. याविषयी उत्तराखंड क्रिकेट संघटनेतर्फे असा खुलासा करण्यात आला, की वासिमने क्रिकेट संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये ‘धर्म’ आणला. त्याने केवळ मुस्लीम क्रिकेटपटूंना प्राधान्य दिले, संघाच्या सरावादरम्यान मौलवी बोलावून इक्बाल अब्दुल्ला या क्रिकेटपटूला नमाज पडण्याची अनुमती दिली अशी कारणे लेखी नव्हे, तर अनौपचारिक पद्धतीने देण्यात आली. या सगळ्या तोंडी दाव्यांचा प्रतिवाद वासिमने समाजमाध्यमांतून केलेला आहे. परंतु त्याच्यासारख्या प्रतिभावान, अनुभवी क्रिकेटपटूवर तो मुस्लीम असल्याचा ठपका ठेवणे आणि त्याविषयी त्याला प्रतिवाद करावा लागणे हे अत्यंत खेदजनक आहे. धार्मिक जाणिवा टोकाच्या प्रखर बनण्याच्या सध्याच्या युगात असे घडणे फार अचंब्याचे मात्र नाही. उत्तराखंड क्रिकेट संघटनेशी त्याचा करार एक वर्षांसाठीचा होता. परंतु सध्या कोविड-१९ मुळे फारसे सामनेच होत नाहीत. रणजी स्पर्धा रद्द झालेली आहे. मुश्ताक अली टी-२० स्पर्धा संपली नि आता विजय हजारे स्पर्धा सुरू होत आहे. त्यामुळे मैदानावरील खराब कामगिरीकरिता प्रशिक्षक म्हणून वासिमला जबाबदार धरण्यात आले असेही नाही. या प्रकरणातील उल्लेखनीय बाब म्हणजे, वासिम जाफरने राजीनामा दिल्यानंतरच ‘तो धर्मवादी’ असल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महीम वर्मा आणि संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांनी केला आहे. प्रशिक्षकपदी नेमले गेल्यानंतर वासिमने जय बिश्त, इक्बाल अब्दुल्ला, समद फल्ला या तिघांना बाहेरून आणले. यांतील इक्बाल अब्दुल्ला हा मुंबईचा गुणवान रणजीपटू आहे आणि त्याने आयपीएलमध्येही चमक दाखवली होती. त्यामुळेच त्याची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. यात धर्मवाद दिसण्याचे काहीच कारण नाही. कारण त्याच्याऐवजी बिश्तला कर्णधार बनवावे अशी शिफारस आपण केली होती, असे वासिम सांगतो. त्याच्याविरुद्ध अनेक क्रिकेटपटूंच्या तक्रारी होत्या, असे महीम वर्मा म्हणतात. त्यांतील एक तक्रार, आम्हाला (म्हणजे खेळाडूंना) ‘जय हनुमान’ म्हणू दिले जात नाही, ही होती! आणखी एका गटाला शीख धर्मघोषणा करू दिली जात नाही अशीही तक्रार होती. त्याऐवजी ‘गो उत्तराखंड’ असा नारा देण्याचे वासिमने सुचवले. तो हे नाकबूल करत नाही. परंतु ‘जय हनुमान’ म्हणणे धर्मवादी ठरत नाही असा समज उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या सचिवांनी करून घेणे जितके आक्षेपार्ह, तितकेच  इक्बाल अब्दुल्लाने नमाज पढण्यासाठी मौलवींना पाचारण करणे आणि कोविड-१९मुळे क्रिकेटपटूंसाठी जैवसुरक्षेचे नियम कडक असताना वासिमने तशी परवानगी देणे आणि दोघांनी ड्रेसिंगरूममध्ये मौलवींच्या साक्षीने नमाज पढणे हेही आक्षेपार्ह ठरते. धार्मिक घोषणा आणि धार्मिक कर्मकांडे यांचे खेळाच्या मैदानावर काहीही प्रयोजन नाही. धर्मश्रद्धांचे प्रदर्शन एकाने केल्यास, दुसऱ्याला तशी संधी नाकारता येत नाही. यातून निव्वळ ‘तुझा धर्म, माझा धर्म’ असा वादच उद्भवणार असल्यास, या प्रकारांना सरसकट प्रतिबंध घालणेच उत्तम! क्रिकेटला या देशातील आणखी एक धर्म म्हटले जाते हे पुरेसे आहे. त्यात नव्याने धर्मवेड कशाला शिरू द्यावे? असे धर्मकेंद्री वाद उत्तराखंड क्रिकेट संघटना आणि वासिम जाफर या दोहोंनाही टाळता आले असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2021 12:06 am

Web Title: article on wasim jaffer communal approach in selection during uttarakhand stint abn 97
Next Stories
1 दिलासा आणि खबरदारी
2 प्रश्न मुत्सद्देगिरीचा
3 मुत्सद्दी मेरुमणी
Just Now!
X