News Flash

‘झाडीपट्टी’ची व्यथा!

पडद्यावरचे व पडद्यामागचेही कलावंत आज आपल्या अस्तित्वासाठीच संघर्ष करीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी पहिल्यांदा अतिशय वाईट काळ अनुभवत आहे. अदृश्य करोनाने या रंगभूमीचा बेरंग केला आहे. पडद्यावरचे व पडद्यामागचेही कलावंत आज आपल्या अस्तित्वासाठीच संघर्ष करीत आहेत. आज त्यांचा संघर्ष प्रचंड वेदनादायी असला तरी करोनापूर्वी याच झाडीपट्टीने त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा समृद्ध केले. आधीची समृद्धी व आताची वंचना यादरम्यानचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर आधी झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासात शिरणे क्रमप्राप्त आहे. झाडीपट्टी हा अस्सल वैदर्भीय शब्द. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जंगलाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्य़ांसाठी, झाडीची पट्टी म्हणजे भूप्रदेश म्हणजेच झाडीपट्टी अशा अर्थाने तो वापरला जातो. घनदाट जंगले, पाच व्याघ्र प्रकल्प आणि कोष्टी, गोंड, वंजारी, मंजा, धीवर, गोवारी, कुणबी, माळी, तेली, धनगर आणि छत्तीसगडी अशा जमातींनी नटलेला हा प्रदेश सर्वार्थाने समृद्ध आहे. इथल्या लोकांची उपजीविका जंगलावर आणि अर्थातच शेतीवर अवलंबून आहे. पण या पारंपरिक ओळखीपेक्षाही मोठी ओळख अन् विशिष्ट ओळख या झाडीपट्टीला येथील स्थानिक रंगभूमीने मिळवून दिली आहे. भाताच्या शेतात दिवसभर राबून थकूनभागून घरी आल्यावर चार घटका करमणूक हवी, या अपेक्षेने येथील रंगकर्मीनी अनेक वर्षांपूर्वी नाटकाचा आधार घेतला. अर्थात सुरुवातीच्या काळात त्याचे स्वरूप हौशीच होते. पण या नाटकांना तुफान लोकप्रियता मिळत गेली आणि कालांतराने झाडीपट्टी रंगभूमीची आर्थिक उलाढाल कोटय़वधींच्या घरात पोहोचली. अगदी २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तिकिटाचे दर असतात. १०० रुपये हा दर खुर्चीसाठी आणि इतर दर हे खाली जमिनीवर बसून नाटक पाहण्यासाठी. झाडीपट्टी रंगभूमीच्या अभ्यासकांचे निरीक्षण असे की, काही नाटकांचा गल्ला तर सुमारे दोन ते तीन लाख इतका असतो. कारण या नाटकांना येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दोन ते तीन हजार इतकी प्रचंड असते. पाच महिन्यांत या रंगभूमीवर सुमारे २५ कोटींची उलाढाल होत असते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह झाडीपट्टी रंगभूमीवर अवलंबून असतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा या रंगभूमीचा सुगीचा काळ. याच काळात नाटक कंपन्यांना सुपारी दिली जायची. अवघ्या झाडीपट्टीत नाटकाची ‘नांदी’ निनादायची. शंकरपटांच्या आयोजनाचाही काळ हाच. दिवसभर या शर्यती झाल्यावर रात्री नाटकांची मेजवानी असायची. रात्री १० च्या सुमारास सुरू झालेली ही नाटके अगदी पहाटेपर्यंत रंगायची. परंतु करोनाने झाडीपट्टी रंगभूमीलाही हलाखीचे दिवस दाखवले. झाडीपट्टी रंगभूमीवर नाटक सादर करणाऱ्या कंपन्यांचे मुख्यालय वडसा येथे आहे. सुमारे ५० ते ६० कंपन्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात प्रचंड व्यस्त असतात. किमान ९० दिवस या सर्व कंपन्यांचे नाटक कुठे ना कुठे सुरूच असते. एका नाटकाच्या आयोजनाचा खर्च सुमारे ६० हजार असतो. एका नाटकातील ४० ते ५० जण धरले तरी सुमारे तीन हजारांवर लोकांचा उदरनिर्वाह या नाटकांवर अवलंबून असतो. पण यंदा करोनामुळे गर्दीच जमणार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. नाटकांच्या काळात मिळणारे उत्पन्नच वर्षभर त्यांचे पोट भरण्याचे साधन. परंतु करोनाने ते हिरावून घेतल्याने आणि आता पुढच्या वर्षीशिवाय नाटकाचा पडदा उघडणार नसल्याने आपले व कुटुंबीयांचे कसे होणार, या एकाच प्रश्नाने झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत व बॅकस्टेज आर्टिस्ट यांची झोप उडाली आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर भरपूर पैसा मिळतो म्हणून पुण्या-मुंबईचेही अनेक रंगकर्मी इकडे येत. यंदा करोनाने त्यांना ही संधीच दिली नाही. हे बाहेरचे कलावंत पाच महिने वडसा येथे मुक्कामी राहात असल्याने येथील अनेक घरमालकांना भाडय़ापोटी हजारो रुपये मिळायचे. यंदाही या घरमालकांनी आपले घर इतरांना भाडय़ाने दिले नाही. करोना इतका प्रदीर्घ लांबणार नाही, असे या घरमालकांना वाटत होते. परंतु करोनाचा कहर सुरूच असल्याने भाडय़ापोटी मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांना यंदा पाणी सोडावे लागणार आहे. ज्या भाडय़ाच्या खोल्यांमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत, त्यांनाही हे भाडे झेपत नसल्याने त्यांनी तात्पुरते का होईना आपले बस्तान हलवले आहे. झाडीपट्टी रंगभूमीचा व्याप व आर्थिक उलाढाल खूप मोठी असली तरी येथील रंगकर्मी संघटनेच्या रूपात कधी एकत्र आलेले नाहीत. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाला बाध्य करता यावे, इतका सशक्त त्यांचा दबाव गट नाही. परिणामी करोनाकाळात अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असतानाही झाडीपट्टी रंगभूमीची व्यथा शासनदरबारी पोहोचलेली नाही. दरवर्षी पाच-पन्नास कार्यकर्त्यांसह हसऱ्या चेहऱ्याने नाटकाच्या उद्घाटनाच्या फिती कापणाऱ्या स्थानिक नेत्यांनाही या कलावंतांची व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ नाही. परिणामी, शेकडोंना रोजगार देणारी झाडीपट्टी रंगभूमी पुरती हतबल झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:02 am

Web Title: article on zadipatti plays a barrier to corona rules abn 97
Next Stories
1 मोडला नाही कणा, तरी..
2 परिणामाची प्रतीक्षा..
3 एवढा उशीर का?
Just Now!
X