पाकिस्तानात कराची येथील शेअर बाजाराच्या इमारतीवर सोमवारी भरदिवसा, भरवस्तीत झालेला हल्ला तेथील अस्थैर्याचे निदर्शक आहे. करोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा पाकिस्तानातही दिवसेंदिवस वाढत आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कमीअधिक प्रमाणात टाळेबंदी तेथेही लागू आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, सुरक्षा दले ठिकठिकाणी तैनात असूनही अशा प्रकारे हल्ला होतो हे नोंद घ्यावे असेच. पाकिस्तानातील गेली अनेक वर्षे खदखदत असलेल्या बलुची राष्ट्रवादाने हिंसक आणि उग्र रूप धारण केले असून, कराची शेअर बाजारावरील हल्ला हा या हिंसक राष्ट्रवादाचा पहिला ठळक आविष्कार ठरतो. या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएने स्वीकारल्यामुळे या घटनेमागील विविध कंगोरे तपासण्याची वेळ आलेली आहे. कराची शेअर बाजाराला लक्ष्य करण्याची कारणे अनेक असावीत. एक तर कराची हे पाकिस्तानचे प्रमुख बंदर आणि व्यापारी केंद्र आहे. तेथे होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतात. बीएलए आणि विशेषत: या हल्ल्यात सक्रिय सहभाग असलेल्या माजीद गटाचा चीनवर विशेष राग आहे. पाकिस्तानातील आकाराने सर्वात मोठय़ा, पण खनिजसंपन्न असूनही आर्थिकदृष्टय़ा सर्वात मागास अशा बलुचिस्तान भागात चीनची गुंतवणूक मोठी आहे. पण या गुंतवणुकीचा कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा स्थानिक बलुची जनतेला मिळत नसल्याची स्थानिक नेत्यांची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. कराची शेअर बाजारात ४० टक्के भागभांडवल शांघाय शेअर बाजार आणि इतर चिनी अर्थसंस्थांचे आहे. चिनी गुंतवणूक असलेल्या काही आस्थापनांना बलुची बंडखोरांनी यापूर्वीही लक्ष्य केले होते. यात कराचीतील चिनी वाणिज्य कचेरी आणि बलुचिस्तानच्या ग्वादार बंदर भागातील एका पंचतारांकित हॉटेलाचा समावेश आहे. ग्वादार बंदराचे चीनच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँट रोड प्रकल्पाची इतिश्री ग्वादार बंदरात होणे आहे. चीनव्याप्त अक्साई चीन, पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तान या भागांतून खुष्कीच्या मार्गे मालाची ने-आण ग्वादार बंदरातून तेलसंपन्न पश्चिम आशियाशी संलग्नित करणे असा हा प्रकल्प. त्याने पाकिस्तानला फायदा होणार असला, तरी आपण अधिकच खंक होणार ही बलुचींना भीती. या बलुचींच्या राजकीय नेतृत्वाने – पण दहशतवादी कृत्ये करणाऱ्या बंडखोरांनी नव्हे – अनेकदा भारताशी संधान बांधले आणि भारताची सहानुभूती मिळवली. तेवढय़ा एका कारणावरून पाकिस्तानी राजकीय आणि लष्करी नेतृत्वाने बलुचिस्तानमध्ये अधिक जोमाने दडपशाही चालवली. हा धागा पकडूनच, सोमवारच्या हल्ल्यामागे बलुचींविषयी सहानुभूती असलेली परकीय शक्ती असल्याचे बेजबाबदार विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह अहमद कुरेशी यांनी भारताचा थेट उल्लेख न करता केले. गेल्या आठवडय़ात त्यांचे पंतप्रधान इम्रान खान हे तर ओसामा बिन लादेनलाही ‘शहीद’ ठरवते झाले होते. दहशतवाद हे सरकारी, राष्ट्रीय धोरण एकदा ठरवले, की त्याची झळ खुद्द पोशिंद्या देशालाही बसते हे कराची हल्ल्याने दाखवून दिले. पाकिस्तानात पंजाबी प्रभुत्ववादी लष्करशाही जोवर शाबूत आहे, तोवर काश्मीर ते कराची असे हल्ले होतच राहणार. त्या देशात आज सिंधी असोत वा बलुची, पख्तून असोत वा अहमदिया, ते पाकिस्तानी आहेत  म्हणून कमी असुरक्षित नाहीत. हे त्या देशातील ढासळत्या व्यवस्थेचे आणि केविलवाण्या लोकशाहीचे लक्षण आहे. हे मान्य न करता, प्रत्येक हल्ल्याबद्दल भारताकडे बोट दाखवणे आणि प्रत्येक मदतीसाठी लोकशाहीदुष्ट चीनकडे याचना करणे हेदेखील त्यांचे राष्ट्रीय धोरण बनून गेले आहे. वर्षे सरत राहिली आणि सरकारे बदलत राहिली, तरीसुद्धा.