20 June 2019

News Flash

‘अफ्स्पा’ असूनही हत्यासत्र?

अबो हे मावळत्या विधानसभेत आमदार होते आणि नवीन विधानसभेसाठीही निवडणूक लढवत होते.

अरुणाचल प्रदेशमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार तिरोंग अबो, त्यांचे पुत्र आणि काही अंगरक्षकांची मंगळवारी झालेली हत्या ही या टापूतील अशांत परिस्थितीचे निदर्शक आहे. ही घटना घडली त्या इराप जिल्ह्यात सशस्त्र दलांचा विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) लागू आहे. या कायद्याच्या विरोधात तेथील जनमत प्रक्षुब्ध असले, तरी अशा घटनांमुळे ‘अफ्स्पा’ लागू करणे अपरिहार्य ठरते अशी भूमिका सरकार घेते. गेली अनेक वर्षे विशेषत ईशान्य भारतातील दहशतवादाकडे, अशांतता आणि अस्थैर्याला खतपाणी घालणाऱ्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी तेथील नागरिकांची, नेत्यांची, विचारवंतांची रास्त तक्रार असते. जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराला आणि मुद्दय़ांना जे राजकीय महत्त्व मिळते, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी चर्चा ईशान्य भारताविषयी माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये होत असते. तिरोंग अबो यांच्या हत्येसारख्या घटनांनी एक प्रकारे हे दुर्लक्षही अधोरेखित होत असते. अबो हे नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) खोन्सा पश्चिम येथील आमदार होते. अरुणाचलच्या या भागात नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) संघटनेच्या आयझ्ॉक-मुईवा गटाचा प्रभाव आहे. त्यांच्या कारवायांच्या विरोधात अबो यांनी अलीकडे अनेकदा आवाज उठवला होता. अरुणाचलचे तिराप, चांगलांग आणि लोंगडिंग हे जिल्हे आसाम, नागालँड आणि म्यानमारने वेढलेले आहेत. या टापूत एनएससीएनचे काही गट, तसेच उल्फाही सक्रिय आहेत. यामुळेच येथे गेली काही वर्षे ‘अफ्स्पा’ लागू करण्यात आला आहे. ज्या गटाविषयी या हल्ल्याबद्दल सर्वाधिक संशय व्यक्त केला जात आहे, तो एनएससीएन-आयएम गट सध्या सरकारशी चर्चा करत आहेत. या गटाकडून तरीही अशी कृत्ये केली जाणार असतील, तर चर्चेपेक्षा वेगळा मार्ग सरकारला अनुसरावा लागेल. त्याचबरोबर, एखाद्या गटाशी चर्चा सुरू असताना तो गट अशा प्रकारे हल्ले करणार असेल, तर ती सरकारसाठीही नामुष्की ठरते. कारण दहशतवाद्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या चर्चेसाठी बोलावण्यापूर्वी त्यांच्याकडून काहीएक हमी घेणे आवश्यक असते. अबो यांच्यावर हल्ला कुणाकडून झाला याचा आम्हीदेखील शोध घेत आहोत, अशी भूमिका एनएससीएन-आयएमच्या प्रचार-प्रसिद्धी विभागाने घेतली आहे. या दोन्ही शक्यता गृहीत धरल्या तरी नवीन केंद्र आणि राज्य सरकारांवर जबाबदारी वाढली आहे हे निश्चित. लोकसभेप्रमाणेच अरुणाचल विधानसभेसाठीही यंदा मतदान झाले आहे. अबो हे मावळत्या विधानसभेत आमदार होते आणि नवीन विधानसभेसाठीही निवडणूक लढवत होते. त्यांची एनपीपी सध्या ईशान्य भारतातील काही राज्यांत भाजप आघाडीचा घटक आहे. लोकसभेसाठी जेथे युती होऊ शकली नाही अशा जागांवर या दोन पक्षांमध्ये मित्रत्वाच्या लढती होत आहेत. ज्या दिवशी अबो यांची हत्या झाली, त्याच दिवशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातर्फे मित्रपक्षांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अरुणाचलमधील घटनेमुळे एनपीपीचे नेते भाजपवर नाराज झाले आहेत. अरुणाचल विधानसभेसाठी मतदान होण्याच्या काही दिवस आधी अबो यांच्या एका कार्यकर्त्यांची आणि लोंगडिंग जिल्ह्य़ातील एका जिल्हा परिषद सदस्याची हत्या झाली होती. त्या हत्यांबाबतही संशय एनएससीएन-आयएमवरच व्यक्त केला गेला होता. अबो यांना गेले काही दिवस धमक्या येत होत्या. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या मुलाचाही मृत्यू ओढवला. ‘अफ्स्पा’ लागू असताना अशा प्रकारे हत्या होत असतील, तर त्याबद्दल लष्कराच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहते. २३ तारखेला नवीन सरकार निवडून आल्यानंतर त्याला काश्मीरप्रमाणेच ईशान्येतील अंतर्गत सुरक्षेकडेही प्राधान्याने लक्ष पुरवावे लागेल.

First Published on May 23, 2019 1:04 am

Web Title: arunachal pradesh mla shri tirong aboh killed by militants