ज्येष्ठ राजकीय, सामाजिक व राजकीय भाष्यकार आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे सल्लागार संपादक प्रताप भानु मेहता यांनी अशोक विद्यापीठातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर उडालेला गदारोळ बराचसा अपेक्षित असाच. त्यांच्यापाठोपाठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यमान केंद्र सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनीही राजीनामा दिल्यामुळे या चर्चेने आणखी वेग घेतला. वास्तविक अशोक विद्यापीठ हे एक खासगी विद्यापीठ. अशा विद्यापीठांमध्ये कोण अध्यापन करतो वा पदत्याग करतो याच्याशी केंद्र किंवा कोणत्याही राज्य सरकारचे काहीच देणेघेणे असल्याचे कारण नाही. तरीही या दोघांच्या आणि विशेषत: प्रताप भानु मेहता यांच्या राजीनाम्यानंतर उमटलेली उत्स्फूर्त नाराजी विश्लेषक, विचारवंतांइतकीच विद्यार्थ्यांमध्येही दिसून आली. हे कसे घडले? मेहता आणि सुब्रमणियन यांच्या राजीनाम्याचे पडसाद देशातच नव्हे, तर ऑक्सफर्ड, येलसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्येही उमटले. हे का घडले? ‘जाहल्या काही चुका’ स्वरूपाचे संयुक्त निवेदन अशोक विद्यापीठाच्या व्यवस्थापनवृंदाने रविवारी प्रसृत केले. या चुका कोणत्या आणि त्यांचा थेट उल्लेख निवेदनात का नाही? प्रताप भानु मेहतांच्या राजीनाम्यानिमित्त असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधणे आवश्यक ठरते.

मेहता यांना विद्यमान राजकीय आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये बौद्धिक, वैचारिक अभिव्यक्तीचे आकुंचन होते असे वाटते. जवळपास तसेच मत सुब्रमणियन यांनीही व्यक्त केले आहे. सात वर्षांपूर्वी अशोक विद्यापीठ स्थापन झाले, त्या वेळी मेहता त्या विद्यापीठाचे कुलगुरू होते. या पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले, तरीही प्राध्यापक म्हणून ते विद्यापीठामध्ये सक्रिय होते. विद्यापीठांना ‘हमालखान्यां’पलीकडे नेण्यासाठी, तेथे चिकित्सक आणि संशोधक वृत्तीचे अभिसरण व्हावे यासाठी निधीइतकीच आवश्यक असते स्वायत्तता आणि अवकाश. आपल्याकडे खासगी विद्यापीठांचा प्रयोग तसा फार जुना नाही. परंतु वर्षांनुवर्षे बहुतेक सार्वजनिक विद्यापीठांमध्ये सरकारी हस्तक्षेप इतका सरसकट होत असतो, ज्यामुळे अध्यापन क्षेत्रातील नैपुण्यापेक्षा होयबागिरीतील नैपुण्यच अधिक परिणामकारक ठरू लागल्याचे दिसून येते. या विद्यापीठांचे आधिपत्य ज्या कुलपती नामे व्यक्तीकडे असते, ते तर राज्यपाल- म्हणजे सरकारी दूतच. ही पार्श्वभूमी प्रताप भानु मेहतांसारख्या विचारवंतास ठाऊक असेलच. यासाठीच खासगी विद्यापीठाच्या माध्यमातून किमान सरकारी हस्तक्षेपास बगल देऊन विचारप्रवर्तक विद्यार्थी घडवण्याचा त्यांचा मानस होता. परंतु त्यांच्या उद्वेगमिश्रित राजीनाम्याने हा प्रयोग विस्कटल्यागत झाला आहे.

मेहता-सुब्रमणियन यांना अध्यापन सोडावेसे वाटते, कारण प्रश्न पडणारी, प्रश्न उपस्थित करणारी संस्कृतीच संपत चालल्याची त्यांची जाणीव तीव्र बनली आहे. ‘आपले मत पटले नाही’ इतके सांगून ही संस्कृती थांबत नाही. ‘आपले मत पटले नाही.. तेव्हा थांबावे!’ असा आग्रह धरत त्याचा पाठपुरावा करणारी ही नवनित्य संस्कृती. त्यातही ‘आपले मत पटले नाही, कारण ते राष्ट्रविरोधी. तेव्हा थांबावे, नाहीतर..’ अशी वैचारिक पुंडाई करणाऱ्या जल्पकझुंडीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या मागावर राहू लागल्या आहेत. मतवैविध्याचा आदर करणे हा लोकशाहीचा आत्मा. लोकशाही ही केवळ शासनप्रणाली नव्हे, ती जीवनशैलीही असावी लागते, अशी घोकंपट्टी केवळ नागरिकशास्त्राच्या तासाला करायची आणि पुढे लोकशाहीच्या आधारेच शासक बनल्यानंतर दडपशाहीच्या जवळ जाणारी वर्तणूक असेल, तर ठिकठिकाणी ‘आंदोलक’ आणि ‘राष्ट्रद्रोही’ दिसणारच! प्रताप भानु मेहता त्यांच्या स्तंभांमधून अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. संविधानाची आठवण करून देतात. धर्मनिरपेक्ष आणि पक्षनिरपेक्ष घटनात्मक संस्थांच्या परिचालनातील गंभीर त्रुटी आणि राजकीय कल वा हस्तक्षेप दाखवून देतात. या सगळ्याने अस्वस्थ असणारा वर्ग कोणता असतो? त्यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने आपल्या देशातील खासगी आस्थापनांतील विचारपंगुत्वही अधोरेखित होते. सरकारविरोधी भूमिका मांडणारे त्यांना अडचणीचे वाटू लागतात, कारण अनेकदा नियमबाह्य़ सरकारी आशीर्वादाची सवय अंगवळणी पडलेली असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांच्या उदयानेही अमेरिकेचे एका मर्यादेपलीकडे अधपतन होत नाही, कारण तेथे नोम चॉम्स्की यांच्यासारखे विचारवंत सक्रिय आणि लिहिते असतात. पक्षातीत सर्व सरकारांना प्रश्न विचारणारे नोम चॉम्स्की किंवा प्रताप भानु मेहता हे त्या-त्या देशांचे वैचारिक वैभव असतात. ते काय म्हणतात, त्यांचे विचार किती सदोष किंवा निर्दोष आहेत, ते कोणाला पटतात वा न पटतात, ते किती सरकारविरोधी वा समर्थक आहेत यापेक्षाही त्यांना मत मांडण्याचे निर्विघ्न स्वातंत्र्य किती आहे, ही एकमेव बाबच त्या-त्या देशाचा वैचारिक आणि बौद्धिक निर्देशांक सुनिश्चित करते. प्रताप भानु मेहता यांचा राजीनामा हा त्यामुळेच निव्वळ एका प्राध्यापकाचा राजीनामा ठरू शकत नाही. तो त्यापलीकडेही बरेच काही उद्धृत करून जातो!