20 February 2019

News Flash

मानवाधिकार लढय़ाची हानी

वृत्तवाहिन्यांवर ही मंडळी दोन्ही देशांच्या संबंधांवर हिरिरीने चर्चा करीत होती.

 

सन २००१ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांची तथाकथित ‘ऐतिहासिक’ आग्रा बैठक झाली होती, तेव्हा पाकिस्तानातून तमाम पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते भारतात आले होते. वृत्तवाहिन्यांवर ही मंडळी दोन्ही देशांच्या संबंधांवर हिरिरीने चर्चा करीत होती. त्यात अस्मा जहांगीर आघाडीवर होत्या. सातत्याने लष्करशाहीच्या छायेखाली वावरणाऱ्या पाकिस्तानात मानवाधिकारासाठी लढणारी तेही महिला कार्यकर्ती म्हणून तिच्याकडे भारत-पाकच नव्हे तर, संपूर्ण दक्षिण आशिया आदराने पाहत असे. त्यामुळेच अस्मा यांच्या निधानामुळे पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील मानवाधिकार लढय़ाची हानी झाली आहे. त्यांची जागा कोणी घेतली नाही तर मात्र पाकमध्ये अजूनही नवजात अवस्थेत असलेल्या मानवाधिकार लढय़ाची पीछेहाट होईल. आणि हा बाब भारतासाठी घातक ठरेल! पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहाविरोधात एका महिलेने दंड ठोकून उभे राहणे ही कल्पनातीत गोष्ट झाली. अस्मा जहांगीर यांनी ती करून दाखवली हे त्यांचे मोठे योगदान. पाकमध्ये लष्कराने लोकशाहीची मुळे रुजू दिली नसल्याने तिथला नागरी समाज विकसित होण्यातही अडचणी येत गेल्या. लोकशाही कुमकुवतच राहिली वा बराच ती अस्तित्वातच नव्हती आणि झिया उल हक यांच्या इस्लामीकरणाच्या रेटय़ात सामान्य जनता धर्माच्या जोखडाखाली सापडली. रशियाविरोधात लढता लढता पाकिस्तान अधिक कडवा धर्मवादी होत गेला. पाकने तालिबानींना खतपाणी घातले.  दहशतवादाचे थैमान घालणाऱ्या  लादेनला ‘हक्का’चे घर दिले. पाकिस्तान आधुनिक जगाकडे पाठ फिरवून मध्ययुगीन कालखंडाकडे वळू लागल्याचे अधोरेखित होत गेले. ज्या देशात धर्माची निंदा हा देहदंडाचा गुन्हा मानला जातो अशा कर्मठ, दहशतीच्या पाकिस्तानी वातावरणात अस्मा जहांगीर मानवाधिकारासाठी लढत होत्या. थेट रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे धाडस त्यांच्यात होते. न्यायालयात दोन महिलांची साक्ष ही एका पुरुषाच्या साक्षीच्या बरोबर मानली जाईल, असा महिलांचे माणूसपणच हिरावून घेणारा कायदा पाकमध्ये १९८३ मध्ये लागू झाला होता. त्याविरोधात महिलांनी काढलेल्या मोर्चात अस्मा आघाडीवर होत्या. तत्कालीन लष्करप्रमुख याह्य़ा खान, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ या सगळ्या लष्करप्रमुखांविरोधात त्यांनी थेट मोहीम उघडलेली होती. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवली जात असे. त्यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचाही प्रयत्न केला गेला. सातत्याने धमकावले जात होते. तरीही अस्मा यांचा आक्रमकपणा कुठेही कमी झाला नाही. ‘लष्करातील जनरल मूर्ख आहेत,’ असे वृत्तवाहिन्यांवर जाहीरपणे सांगितले होते. अस्मा यांच्या ‘दस्तक’ संस्थेचे कार्यालय म्हणजे पाकमध्ये लोकशाहीसाठी लढणारे बलुच, पश्तून, स्त्रीवादी, धर्माचे चिकित्सक अशा पाकमधील सुधारणावाद्यांचे ‘संरक्षक निवास’च बनले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी, धर्मवाद्यांसाठी अस्मा नेहमीच राष्ट्रद्रोही ठरल्या. त्यातही अस्मांचे भारतातील पुरोगाम्यांशी, मानवाधिकार कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांची पाक सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी भूमिका भारतासाठी सोयीची असली तरी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील मानवाधिकार उल्लंघनावरही केलेली कडवी टीका भारतासाठी अडचणीचीच ठरली. त्यामुळे त्या भारतासाठी पुरेशा ‘पाकविरोधी’ ठरल्या नाहीत. अस्मांचा हा सडेतोडपणा ना पाक सत्ताधाऱ्यांना पचला ना भारतातील सत्ताधाऱ्यांना. पण, त्याची अस्मांनी कधीच पर्वा केली नाही. पाकमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी अस्मांच्या धाडसाची, आक्रमकतेची, नीडरपणाची आजच्या काळात सर्वाधिक गरज आहे.

First Published on February 13, 2018 1:42 am

Web Title: asma jahangir pakistani human rights lawyer loss of human rights struggle