लाहोरमध्ये राहणारी बरीच ख्रिस्ती कुटुंबे ईस्टरच्या रविवारी गुलशन-ए-इक्बाल उद्यानात येणार हे माहीत असल्यानेच तेथे आम्ही स्फोट घडविला, अशी निर्गल कबुली तालिबान्यांच्या ‘जमात-उल अऱ्हर’ या गटाने सोमवारी देणे; हे या स्फोटातील मृतांची संख्या ७२ झाल्याच्या वृत्ताइतकेच चिंता वाढविणारे आहे. ही चिंता केवळ भारताची नव्हे, तर पाकिस्तानातील घडामोडींकडे लक्ष द्यावे लागणाऱ्या अन्य देशांचीही आहे. नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या या स्फोटाने २५ हून अधिक बालकांचेही बळी घेतले. अर्थात, पेशावरमधील शाळेत २०१४च्या डिसेंबरात १४० मुलांची आयुष्ये संपवून टाकणाऱ्या तालिबान्यांसाठी २५ किंवा ७२ हे आकडे कमीच. स्फोट घडविल्याचा दावा करणाऱ्या गटाने आमचा रोख ख्रिस्त्यांवर- पर्यायाने मुस्लिमेतर म्हणजेच काफरांवर- होता, असा ‘खुलासा’ करून पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मॅरियटसारख्या पाश्चात्त्य हॉटेलात राहणारे, पेशावरच्या इंग्रजी पब्लिक स्कूलमध्ये शिकणारे अशांना संपवण्यासाठी गेल्या काही वर्षांत मोठे स्फोट घडवून ज्या तालिबानने धर्मद्रोहाला शिक्षा देण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत, त्या संघटनेच्या ‘जमात उद्-दावा’सारख्या गटावर साधी बंदी घालण्याचेही पाऊल उचलण्यास पाकिस्तानी प्रशासन खळखळ करते, हे सर्वज्ञात आहे. तरीदेखील आता पुन्हा ‘आम्हीही दहशतवादाचे बळीच आहोत’ हे नेहमीचे पालुपद आळवून पाकिस्तानी राज्यकर्ते आणि अधिकारी सहानुभूती मागण्याचा प्रयत्न करू शकतात. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे तालिबानला मानणाऱ्या गटांशीही संबंध आहेत आणि काफरांच्या जगाला धूप घालणारे आपले सरकार शेळपट आहे, असा या गटांचा ठाम समज आहे. यातून या गटांपैकी एखाददुसऱ्या गटाने पाकिस्तानी अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर काय, इथवर जगाच्या पाकिस्तानविषयक काळजीची मजल गेली असताना, पाकिस्तानी सत्ताधारी ‘आम्हीदेखील बळीच’ या भीतीचे सोंग आणखी किती काळ घेत राहणार? त्या देशातील सत्ताधारीदेखील तालिबानी रायफलींचे लक्ष्य ठरले, हे खरे. लाहोर हे ज्या पाकिस्तानी पंजाब प्रांतात आहे, तेथील गव्हर्नर सलमान तासीर यांना जानेवारी २०११ मध्ये मुमताज कादरी याने गोळीबारात ठार केले. या कादरीला गेल्या महिन्यात फाशीही झाली. मात्र आज परिस्थिती काय आहे? कादरी फासावर लटकल्याचा नुसता शाब्दिक निषेध करून न थांबता शेकडय़ांनी समर्थक इस्लामाबादच्या रस्त्यांवर येऊन धुमाकूळ घालत आहेत. हे समर्थन मिळते, कारण तासीर ‘धर्मद्रोही’ होते म्हणून त्यांना मारणे हे क्षम्य ठरते, असा विश्वास लाहोर, कराची वा इस्लामाबादसारख्या शहरांतही आज अनेक जणांना असतो. तो असतो, याचे मूळ अर्थातच धर्माधिष्ठित राष्ट्र म्हणून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी या देशातील इस्लामी- सुन्नी- अस्मिता फुगवून ठेवली, यात शोधावे लागते. गुलशन-ए-इक्बाल उद्यानातील स्फोटाचा रोख धर्मबांधवांवर नव्हताच असे सांगून पापमुक्त होणारे तालिबानी आणि ‘आम्हीही बळीच’ असा कांगावा करणारे सत्ताधारी, यांत फरक उरत नाही, तो या ऐतिहासिक चुकीमुळे. तेव्हा भारताने याप्रकरणी सांत्वनापुरतीच साथ देणे बरे.