बजरंग दल ही अतिरेकी हिंदूुत्ववादी संघटना. तिने अयोध्येत हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे शिबीर आयोजित केले. त्याच्या ध्वनिचित्रफिती प्रसारित झाल्या. त्यावरून गदारोळ झाला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी त्या शिबिराचे समर्थन केले. स्वरंक्षणाच्या हेतूने असे प्रशिक्षण देण्यात गैर काय, असा त्यांचा सवाल. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली. राम नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभिमानी स्वयंसेवक, तेव्हा ते असे बोलणारच असे टोमणे विरोधकांनी लगावले. उत्तर प्रदेशात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. ते निमित्त साधून भाजपने त्यांच्या हस्ते या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून घेतला. या निवडणूक राजकारणाचा भाग म्हणूनच बजरंगींच्या या कृत्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशात सामाजिक ध्रुवीकरणाचा खेळ त्यांनी मांडला आहे असे म्हटले जात आहे. एकंदर राजकीय चष्म्यातूनच या प्रकाराकडे पाहिले जात आहे. परंतु ते तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही, हे नीट समजून घेतले पाहिजे. नागरिकांना आयसिससारख्या दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी तयार करणे वा त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे या बजरंग दलाच्या हेतूमध्ये गैर ते काय, हा सवाल वरवर पाहता बिनतोड वाटू शकतो. ‘ते’ हत्यारांचे प्रशिक्षण घेतात हे तुम्हाला चालते, मग ‘आपल्या’ मुलांनी घेतले तर त्यात काय बिघडले हा प्रश्नही सयुक्तिक वाटणारे लोक आहेत. हे सगळ्या लोकांना अतिरेकी विचारसरणीचे असे म्हणणे हे अन्यायकारक ठरेल. ते अशा गोष्टींना पाठिंबा देतात ते अविवेकाने, मनातील भयगंडाने. आयसिस, लव्ह जिहाद, ‘सगळेच मुस्लीम अतिरेकी नसतात, पण सगळेच अतिरेकी मुस्लीम असतात’ असा विकृत प्रचार अशा गोष्टींतून या सर्वसामान्य लोकांच्या मनात भयगंड निर्माण केला जात असतो. ते आणि आपण अशा मानसिक आघाडय़ा तयार केल्या जातात. विरोध व्हायला हवा तो या भयगंडाच्या निर्मात्यांना, एका समाजाला ‘दुश्मन’ ठरवून दुसऱ्या समाजाला त्याची भीती घालत सगळ्यांनाच अतिरेकी िहसात्मकतेकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना. त्यांना सवाल विचारायला हवा की पाकिस्तान, बांगलादेश, सीरिया, सौदी अरेबिया अशा देशांमध्ये ज्या प्रकारचा समाज तेथील अतिरेक्यांनी तयार केला आहे, तसा समाज आपल्याला येथे तयार करायचा आहे का? समजा तमाम मुस्लिमांत आज तालिबानी प्रवृत्ती जोर धरीत आहेत, असे मानले तरी प्रश्न हाच उरतो की त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण हिंदू समाजाचे तालिबानीकरण करणार आहोत का? अतिरेकी हिंदुत्ववादी आणि अतिरेकी इस्लामी यांच्यात तत्त्वत: फरक नसतो ही वस्तुस्थिती आपण सातत्याने अनुभवत आहोत. तालिबानी ज्या प्रकारची नियंत्रणे सर्वसामान्य मुस्लिमांवर घालत आहेत, त्याच प्रकारची नियंत्रणे आपण आपल्यावर घालून घ्यायला तयार आहोत का, हा खरा सवाल आहे. याचे होकारार्थी उत्तर जर कोणी देत असेल तर तो हिंदूंचा कैवारी नव्हे, तर वैरी आहे हे समजून घ्यायला हवे. राहता राहिला प्रश्न बजरंग दलाच्या शिबिरातील प्रशिक्षणाचा. तो गुन्हा आहे की काय हे या देशाचा सेक्युलर कायदा ठरविलच. त्या प्रशिक्षणामागील विचार मात्र नक्कीच समाजाला नैतिक गुन्हेगारीकडे नेणारे आहेत. धिक्कार व्हायला हवा तो त्यांचा. पण राम नाईकांसारखे ‘नेते’ आपली घटनात्मक जबाबदारी विसरून जेव्हा डोळे झाकून त्याची भलामण करतात तेव्हा मात्र स्वत:ला हिंदू सांस्कृतिकतेचे ठेकेदार म्हणविणाऱ्या मंडळींच्याही हेतूंबद्दल शंका येते. हिंदूंनी काळजी करावी अशीच ही बाब आहे.