19 September 2020

News Flash

सुनियोजित जर्मन यश

लोकप्रिय आणि गुणवान अशा फुटबॉलपटूंवर कोटय़वधी युरो उधळून संघात बोलवायचे हे एक प्रारूप.

युरोपियन चँपियन्स लीग, या फुटबॉलमध्ये विश्वचषकाखालोखाल लोकप्रिय असलेल्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद यंदा जर्मनीच्या बायर्न म्युनिच क्लबने पटकवावे, यात अनेक अर्थ दडले आहेत. युरोपीय फुटबॉलची आर्थिक गणिते मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार या वलयांकित फुटबॉलपटूंभोवती फिरत असतात. क्लब पातळीवरील या फुटबॉल विश्वात दोन ठळक प्रारूपे आढळून येतात. लोकप्रिय आणि गुणवान अशा फुटबॉलपटूंवर कोटय़वधी युरो उधळून संघात बोलवायचे हे एक प्रारूप. त्यासाठी लागणारी अवाढव्य माया हल्लीशी आखातातील शेखांकडे किंवा रशियासारख्या तेलसमृद्ध पण बेबंद देशांतील धनाढय़ांकडेच असते. याउलट मर्यादित गुंतवणूक करूनही चांगल्या संघबांधणीवर भर देणारे काही क्लब युरोपात झळकत असतात. उदा. बायर्न म्युनिच, लिव्हरपूल इत्यादी. बायर्न म्युनिच हा श्रीमंत क्लब असला, तरी उधळपट्टी करणाऱ्यांपैकी तो नाही. मँचेस्टर सिटी, पॅरिस सेंट जर्मेन, रेआल माद्रिद, चेल्सी अशा क्लबांना अजूनही चांगली संघबांधणी म्हणजे उधळपट्टी हेच समीकरण ठाऊक आहे. यांपैकी चेल्सीच्या संघाला बायर्नने यंदा ७-१ असे हरवले. तर बार्सिलोना क्लबची यंदाच्या चँपियन्स लीगच्या उपान्त्यपूर्व फेरीत बायर्नने ८-२ अशी धूळधाण उडवली. अंतिम सामन्यात बायर्नच्या वतीने एकमेव गोल करणारा किंग्सली कोमान हा पॅरिसचाच. त्याचा स्थानिक क्लब म्हणजे अर्थातच पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळण्याची त्याची इच्छा होती. ती फलद्रूप झाली नाही. कारण तो व्यावसायिक फुटबॉल खेळू लागला तोवर त्या क्लबचे धोरण महागडय़ा आणि ‘हमखास ट्रॉफ्या जिंकून देतील’ अशा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत गेले होते. पण त्याच्यातली गुणवत्ता बायर्नने हेरली. परवा अंतिम सामन्यात त्याच्याच गोलमुळे त्याच पॅरिस सेंट जर्मेनला पराभव पाहावा लागला हा काव्यात्म न्याय! बायर्नला मेसी- रोनाल्डो- नेयमार मंडळींवर अवलंबून राहावे लागत नाही. रॉबर्ट लेवांडोवस्की हा पोलिश फुटबॉलपटू त्यांच्याकडून काही वर्षे खेळतो. तोच त्यातल्या त्यात वलयांकित म्हणावा असा. म्हणजे तसे आपण म्हणायचे. कारण त्याच्याइतकेच महत्त्व सुदूर कॅनडातील अल्फोन्सो डेव्हिस या खेळाडूलाही बायर्नकडून दिले जाते. अवघ्या १९ वर्षांचा अल्फोन्सो घानातील एका निर्वासित छावणीत जन्माला आला. पण बायर्नच्या गुणपारखींनी त्याला कॅनडातून जर्मनीत आणले. यंदाचे बायर्न म्युनिचचे हे सहावे युरोपियन अजिंक्यपद. यावेळी युरोपातच नव्हे, तर जगभरात कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे क्रीडास्पर्धा ही संकल्पनाच धोक्यात आलेली असताना, जूनच्या सुरुवातीला बायर्न म्युनिचने – खरे तर जर्मनीच्या बुंडेसलिगा फुटबॉल व्यवस्थेनेच- विशिष्ट उद्दिष्ट ठेवून सरावाला सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात, प्रेक्षकांविना ओक्याबोक्या  मैदानांत तेथील फुटबॉलला सुरुवातही झाली. त्या अर्थी मुख्य प्रवाहातील पहिली व्यावसायिक क्रीडा साखळी सुरू करण्याचे श्रेय बुंडेसलिगा आणि जर्मनीकडेच जाते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी कोविड-१९शी मुकाबला करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली. ती सगळीच यशस्वी ठरली अशातला भाग नाही. पण एक निर्णय अपेक्षित परिणाम साधत नाही म्हणून त्याचा संपूर्ण फेरविचारच करण्याचा धरसोडपणा त्यांनी दाखवला नाही इतके तरी म्हणता येईल. बायर्न म्युनिच आणि एकूणच जर्मनीतील फुटबॉलपटूंना त्यामुळे इतरांच्या तुलनेत अधिक सरावसिद्ध आणि तंदुरुस्त राहता आले. युरोपियन अजिंक्यपद हे या जर्मन सुनियोजनाचेच फळ मानावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 1:03 am

Web Title: bayern munich of germany won european champions league zws 70
Next Stories
1 भ्रष्टाचाराचे बळी
2 शेतकरी तितुका मेळवावा
3 अखत्यारीबा वक्तव्य
Just Now!
X