शस्त्रास्त्रे सामग्री व्यवहार हा भारत-इस्रायल संबंधांचा गाभा आहे. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत इस्रायलच्या एकूण शस्त्रास्त्रे निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात भारताकडे वळली होती. त्यामुळेच, इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू गेल्या आठवडय़ात भारतात येऊन गेले आणि देशभर फिरले, तरीही जगातील एक प्रमुख शस्त्रास्त्र निर्माता देश आणि जगातील प्रमुख शस्त्रास्त्र खरेदीदार देश यांचे संबंध वृद्धिंगत करणे हाच या भेटीचा प्रच्छन्न हेतू होता. या भेटीच्या काही दिवस आधी म्हणजे २ जानेवारी रोजी, उभय देशांतील ५० कोटी डॉलरचा ‘स्पाइक’ रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा करार रद्द झाल्याचे राफाएल या इस्रायली सरकारी कंपनीनेच जाहीर केले. या प्रकारची क्षेपणास्त्रे देशातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (डीआरडीओ) बनवण्याचे भारत सरकारने ठरवले आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी ते सुसंगतच होते. पण नेतान्याहू यांच्या भेटीत, हा व्यवहार पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे त्यांनीच (एकतर्फी) जाहीर करून टाकले. त्यांच्या घोषणेचा प्रतिवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षण वा परराष्ट्र खात्यातर्फे कोणी केलेला नाही. याचा अर्थ नेतान्याहू यांच्या विधानात तथ्य आहे, असे मानावे लागेल. भारताला भेट देणारे नेतान्याहू हे केवळ दुसरे इस्रायली पंतप्रधान. याआधीच्या इस्रायली पंतप्रधानांची भेटही (आरियल शेरॉन, २००३) भाजपप्रणीत सरकारच्या कार्यकालातच घडून आली होती. दोन देशांमधील अधिकृत संबंध १९९२मध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात प्रस्थापित झाले. मोदींच्या गेल्या वर्षीच्या इस्रायलभेटीआधी २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जीही तिथे जाऊन आले होते. थोडक्यात, या देशाशी संबंध वाढवण्याचे धोरण हे पक्षातीत आहे. इस्रायलशी संबंध वृद्धिंगत करताना पॅलेस्टाइनशी असलेले पारंपरिक संबंधही सांभाळायचे ही कसरत भारताला करावी लागणार आहे. जेरुसलेमला इस्रायली राजधानी ‘जाहीर करण्याच्या’ अमेरिकी आततायीपणाच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये झालेल्या ठरावाच्या बाजूने  मतदान करून हा समतोल सांभाळणे शक्य असल्याचे भारताने दाखवून दिले आहे. नेतान्याहू यांच्या भेटीत ताजमहाल भेट, साबरमती आश्रम भेट, मुंबईत उद्योजकांशी आणि बॉलीवूड तारे-तारकांशी भेट वगैरे कार्यक्रम यथास्थित पार पडले. मुंबईतील छाबड हाऊसला लहानग्या मोशेसह भेट देऊन नेतान्याहूंनी दोन्ही देशांतील भावनिक बंध जोपासले. गुजरातेत रोड-शो आणि पतंग उडवून शो-बाजीची हौसही त्यांनी मोदींसह भागवून घेतली. नेतान्याहू आणि मोदी यांना या प्रकारच्या प्रतीकात्मकतेत सारखाच रस असल्यामुळे हे स्वाभाविक होते. मोदींनी राजशिष्टाचाराचे संकेत बाजूला ठेवून नेतान्याहू यांचे स्वागत केले. असाच स्नेह मोदींनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या बाबतीतही दाखवला होता. नंतरच्या काळात या दोन्ही नेत्यांच्या सरकारांची धोरणे भारतस्नेही नव्हती हे लक्षात घ्यावे लागेल. नेतान्याहू हे तुलनेने वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. भारत भेटीदरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी ‘कमकुवत टिकत नसतात. शांतता ही बलवानांबरोबर केली जाते. मैत्र बलवानांबरोबर वाढवले जाते,’ असे विधान केले होते. त्यांचा रोख पॅलेस्टाइनकडे असल्यास, त्या धोरणापासून भारताने विलग राहिले पाहिजे. तूर्तास, भारत आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रास्त्र खरेदी संबंध शाबूत आहेत, इतकेच नेतान्याहू भेटीचे कवित्व मानता येईल.