क्रिकेट या खेळाचे करमणुकीत रूपांतर होत असताना, त्यातील खेळपण संपुष्टात येत होते. करमणुकीचा व्यवसाय आणि नंतर धंदा होईपर्यंत त्या खेळाचे सगळे चोचले पुरवले गेले. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यांचे प्रायोजकत्व पेप्सी या कंपनीने काढून घेण्याचे ठरवल्याने या धंद्यात आता चांगलीच खोट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेप्सीने या सामन्यांसाठी २०१३ ते १७ या काळासाठी सुमारे ३७० कोटी रुपयांचे प्रायोजकत्व दिले आहे. ज्या कारणांसाठी कंपनीने त्यातून माघार घेण्याचे ठरवले आहे, ती कारणे खेळबाहय़ आहेत आणि त्याबद्दल गेली काही वर्षे देशभर सतत चर्चा होत आहे. सामन्यातील खेळापेक्षा त्यातील भपकेबाजपणावर आणि त्यात नाटय़मयता निर्माण करण्यावर अधिक भर देण्यात येऊ लागला. हे सारे बाजाराच्या रेटय़ामुळे घडते आहे, असे भासवत त्याकडे कानाडोळा करण्याची सूचना क्रिकेटमधील अनेक दिग्गज करत असतात. प्रत्यक्षात या खेळात गुंतवण्यात येणारी प्रचंड आर्थिक गुंतवणूक धर्मादाय स्वरूपाची असत नाही. कोणत्याही प्रायोजकाला त्याने गुंतवलेल्या पैशांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परतावा हवा असतो. तो योग्य मार्गाने मिळावा, अशीही अपेक्षा असते. प्रत्यक्षात गेल्या काही काळांत या खेळातील अनेक दुर्गुण बाहेर येऊ लागले. सामना कोणी जिंकायचा, हे मैदानातील धावपट्टीवर ठरण्याऐवजी बाहेर बसून त्यावर सट्टा खेळणारे बुकी ठरवू लागले. त्यासाठी खेळाडूंना मोठी लालूच दाखवण्यात येऊ लागली. दुधाचे दात असलेले खेळाडू असल्या मागणीला शरण जाऊ लागले. क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या जावयालाही त्यात हात धुऊन घेण्याची इच्छा झाली. क्रिकेटच्या खेळाडूंचा लिलाव होत असताना आशाळभूत नजरेने आपल्याला अधिक किंमत मिळावी, अशी अपेक्षा करणारे खेळाडू पाहून क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणेही फिटले! हे सारे खेळाबाहेर घडत होते. मैदानात जे घडत असे, ते एखाद्या नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे, अगदी ठरलेले आणि संहितेबरहुकूम. न्यायालयांनी त्यात हस्तक्षेप केला, क्रिकेटशी संबंधित संस्थांनी त्यात घुसलेल्या हिणकस मनोवृत्तीला दूर करण्याची आश्वासने दिली. प्रत्यक्षात माध्यमांमध्ये रोजच्या रोज खेळबाहय़ बातम्या प्रसिद्ध होत गेल्या. हे सारे उबग आणणारे होते. पेप्सीने ते अनुभवले आणि त्यावर आपली प्रतिक्रिया कृतीतून दिली. ज्यांच्यामुळे पेप्सी क्रिकेटमध्ये ओढली गेली, त्या जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर लगेचच कंपनीने हा निर्णय जाहीर करून टाकला, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. क्रिकेटचे सामने ज्या क्रीडांगणावर खेळले जातात, तेथे फक्त पेप्सी कंपनीचीच पेये विकली जावीत यासाठी ही कंपनी प्रत्येक सामन्यामागे दोन कोटी रुपये देत असे. यापुढील काळात एवढी रक्कम देण्यास कुणी पुढे येईल, अशी शक्यता नाही. खेळाचे खेळपण टिकवण्यासाठी क्रिकेटबाहय़ शक्तींना बाहेर ठेवणे यापुढील काळात कितपत शक्य होईल, याबद्दलही शंका आहेत. पेप्सीने दिलेल्या या दणक्याने आता सारेच जण हादरले आहेत. खेळातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गब्बर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनाही आता वाईट दिवस येऊ घातले आहेत, एवढाच या घटनेचा अर्थ.