21 February 2019

News Flash

..मग लढायचे तरी कुणाशी?

प्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे कायम प्रस्थापितांच्या विरोधात राहिले.

 

भीमा कोरेगाव घटनेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आले आहेत. आंबेडकर हे राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयाची जाण असणारे अभ्यासू नेते आहेत. एका समूहात अडकलेल्या रिपब्लिकन राजकारणाला त्यांनी बाहेर काढून, त्याला बहुजनवादी पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र कधी कधी त्यांच्या राजकीय भूमिका संभ्रमात टाकणाऱ्या असतात. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे कायम प्रस्थापितांच्या विरोधात राहिले. सत्ता ही केवळ मंत्रालयात नसते; तर तिची पाळेमुळे मंत्रालयाच्याही बाहेर सहकारी साखर कारखाने, बँका, दूध संघ, सूत गिरण्या इथपर्यंत पसरलेली आहेत आणि त्यावर विशिष्ट पक्षाचा व घराण्यांचा ताबा आहे, हे ओळखणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर, याबद्दल दुमत नाही. त्यांचे काँग्रेसविरोधी राजकारण सर्वश्रुत आहे. परंतु त्याचमुळे भाजपचे छुपे समर्थक अशा टीकेचे ते लक्ष्य झाले. १९८९ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले, त्या वेळी उमदे नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या हाती नकळत पक्षाची सूत्रे गेली होती. परंतु त्या वेळी युती कुणाशी करायची, काँग्रेसशी की जनता दलाशी, यात बराच घोळ घातला गेला. परंतु निर्णयच लांबवत ठेवल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला हुकमी नेतृत्व देण्याची संधी त्यांची हुकली. त्या वेळी शिवसेना-भाजप या जातीयवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसशी युती अशी घोषणा करून रामदास आठवले यांनी रिपब्लिकन राजकारणाच्या मध्यभागी येण्याची अचूक संधी साधली. अलीकडे भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या हिंसाचाराला संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची ते सातत्याने मागणी करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे ते कडवे विरोधक झाले आहेत. केवळ दलित समाजच नव्हे, तर पुरोगामी विचारांच्या संघटना, बुद्धिजीवी वर्ग त्यांच्या भाजपविरोधी राजकीय भूमिकेचे समर्थन करीत आहेत. परंतु अलीकडेच एका वार्तालाप कार्यक्रमात बोलताना देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विश्वासार्ह नेतृत्व तयार झाले नाही आणि नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, त्यामुळे काँग्रेसला त्यांच्याविरोधात लढता येणार नाही, असे विधान करून पुन्हा आपल्या समर्थकांमध्येच त्यांनी गोंधळ उडवून दिला. आता ‘२००१ मध्ये सासवड दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटेला ‘ मोका’ लावला जाणार होता, परंतु त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाचवले’ असा सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. ‘जातीयवादी एकबोटेला पाठीशी घालणाऱ्या पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली जाणार नाही,’ अशी घोषणाही त्यांनी केली आहे. राजकारणात मित्राप्रमाणेच शत्रूही निश्चित करावा लागतो. त्याशिवाय लढण्याची रणनीती आखता येत नाही. भीमा कोरेगाव घटनेनंतर बदलणाऱ्या राजकीय वातावरणात प्रकाश आंबेडकरांकडे त्यांचे प्रमोद महाजन यांच्याशी एके काळी असलेले सख्य विसरून, भाजपविरोधातील एक आक्रमक, अभ्यासू चेहरा म्हणून बघितले जात आहे. परंतु कधी वाजपेयी, मोदींचे कौतुक, तर कधी शरद पवार यांच्यावर टीका, कधी डाव्यांशी जवळीक, तर कधी काँग्रेसवरही शरसंधान.. अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळे मग राजकीय लढाई करायची तरी कुणाशी, असा प्रश्न त्यांनीच निर्माण करून ठेवला आहे.

First Published on February 6, 2018 1:58 am

Web Title: bhima koregaon violence prakash ambedkar