पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उठणारे बोट तोडले पाहिजे, उठणारा हात कापला पाहिजे, या भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांच्या विधानाकडे एखाद्या माथेफिरूची बडबड म्हणून कोणी दुर्लक्ष करू शकेल. या विधानावरून मोठय़ा प्रमाणावर टीका झाल्यानंतर त्या भाजपनेत्याने आपल्या राजकीय परंपरेस जागत ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’ असा खुलासा करतानाच दिलगिरीही व्यक्त केली. त्यामुळे हा वाद संपला असेही कोणी म्हणू शकेल. परंतु हा विषय तेवढय़ाने संपण्याइतका किरकोळ नाही हे लक्षात घेऊनच त्याचा विचार केला पाहिजे. बोट तोडण्याची, हात कापण्याची धमकी देणारा तो भाजपनेता म्हणजे कोणी समाजमाध्यमातला बिनडोक जल्पक नाही. बिहारसारख्या एका मोठय़ा राज्यातील भाजपचा तो अध्यक्ष आहे. तेव्हा त्याने दिलेल्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पण ते केवळ ती हिंसाचाराला चिथावणी म्हणून नव्हे. त्या धमकीमागे विशिष्ट विकृती असून, आज वाळवीप्रमाणे तिने अवघे राजकीय पर्यावरण पोखरले आहे. शिवाय ती पक्षनिरपेक्षही आहे. नित्यानंद राय यांच्या वक्तव्याचा आशय असा होता, की मोदी हे गरिबीतून वर आलेले नेते आहेत. तेव्हा प्रत्येकाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. आता यात अयोग्य ते काय, असे कोणी म्हणू शकेल. परंतु या विधानाचा अर्थ एवढा वरवरचा नाही. मोदी हे गरिबीतून वर आले म्हणून त्यांचा आदर करावा यातून जे सूचित होते ते वेगळेच आहे. मोदींना विरोध करणारे, त्यांचा अनादर करणारे हे पर्यायाने गरिबांचे विरोधक आहेत हा त्याचा गर्भितार्थ आहे. मोदींविरोधात उठणारे बोट हे गरिबांविरोधात उठणारे बोट आहे असे त्यांना सुचवायचे आहे. हे खरे आहे का? मोदींच्या धोरणांवर टीका करणाऱ्या प्रत्येकास देशविरोधी, गरीबविरोधी, लोकविरोधी म्हणता येईल का? कोणताही शहाणा माणूस तसे म्हणणार नाही. परंतु तसे भासविले जाते. नोटाबंदीच्या टीकाकारांनाही ते सहन करावे लागलेच. हे केवळ मोदींबाबतच घडते आहे असे मानण्याचे कारण नाही. येथील कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या प्रोपगंडापासून मुक्त नाही. आणि मग एकदा आपल्या नेत्यास केला जाणारा विरोध म्हणजे गरिबांना केला जाणारा विरोध वा उदाहरणार्थ देशद्रोह वगैरे मानले गेले की मग त्यानंतरची हिंसा हे राजकीय पुण्यकर्म मानण्याशिवाय अन्य पर्यायच उरत नाही. या देशाचे हे ‘सौभाग्य’ की अद्याप येथे अशा प्रकारचा विरोध हा बव्हंशी भाषिक हिंसाचाराच्याच पातळीवर आहे. समाजमाध्यमांतून याची प्रचीती येते. तेथे आपल्या प्रिय नेत्यावर, त्याच्या कारभारावर वा निर्णयांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर त्या त्या नेत्याच्या वा विचारधारेच्या भक्तांकडून ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या या संदर्भात पाहाव्यात. टीका तथ्यांच्या आधारे खोडून काढावी हे जणू हा देश विसरूनच गेला आहे. मुद्दय़ाला उत्तर भाषिक गुद्दे हेच येथील विचारसंघर्षांचे प्राक्तन बनले आहे. कोणत्याही प्रश्नावर खळखटॅक हेच अंतिम उत्तर असल्यासारखे भासविले जात आहे. ही एका अविवेकी, अ-विचारी समाजाकडे सुरू असलेली वाटचाल आहे. खळांच्या या खटॅक प्रवृत्तीची पाठराखण करून या देशात टोळी विरुद्ध व्यक्ती असा संघर्ष उभा केला जात आहे. अशा लढाईत व्यक्ती कितीही खरे बोलत असली तरी एकटी पडते आणि नेहमीच पराभूत होत असते हा इतिहास आहे. आज प्रिय नेत्यांचे बळ वाढते आहे म्हणून कुणाला त्याची पुनरावृत्ती गोडही वाटू शकेल, परंतु परिस्थिती नेहमीच बदलत असते. आजचे बोटे तोडणारे उद्या कदाचित बोट उठवणारे असू शकतील; त्यावेळी खटॅक करणारे खळ दुसरे कोणी असू शकतील. या अशा बोटे तोडण्यातून बाकी उरेल ती थोटी लोकशाहीच.