X

जैवइंधन : भरारी आणि सबुरी

भारतीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने २७ ऑगस्ट २०१८ हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

भारतीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने २७ ऑगस्ट २०१८ हा दिवस महत्त्वाचा ठरतो. कारण या दिवशी स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने डेहराडून ते नवी दिल्ली असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या बळावर केला. पारंपरिक जेट इंधनाच्या (एटीएफ) चढय़ा किमती, त्यांच्यामुळे आणि स्वस्तात तिकिटे विकण्याच्या असहायतेपायी देशातील अनेक विमान कंपन्यांना (जेट एअरवेज हे एक ठळक उदाहरण) लागलेली घरघर, पृथ्वीभोवतालच्या वातावरणाला बाधा पोहोचू नये यासाठी जेट इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने घटवण्यामागची अपरिहार्यता असे अनेक घटक विचारात घेतल्यास जैवइंधनांचा पर्याय स्वागतार्हच मानला पाहिजे. पण यानिमित्ताने व्यक्त होत असलेला आशावाद अनाठायी ठरणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल. स्पाइसजेटच्या बम्बार्डियर क्यू ४०० टबरेप्रॉप प्रकारातल्या विमानात २८ प्रवासी आणि कर्मचारी होते. ४० मिनिटांच्या उड्डाणादरम्यान या विमानाने ७५ टक्के पारंपरिक इंधनाचा आणि २५ टक्के जैवइंधनाचा वापर केला. विमान उड्डाणांसाठी बायोइंधनांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर यापूर्वीही झालेला आहे. २००८ मध्ये व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने लंडन ते अ‍ॅमस्टरडॅम असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या आधारे केला होता. क्वान्टास या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीने या वर्षी लॉस एंजलिस ते मेलबर्न असा १५ तासांचा प्रदीर्घ प्रवास १० टक्के जैवइंधनाच्या जोरावर केला. अलास्का एअरलाइन्स, केएलएम या कंपन्यांनीही असे प्रयोग करून झालेले आहेत. भारतात हा प्रयोग करण्यात डेहराडूनस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियमचे योगदान महत्त्वाचे आहे. स्पाइसजेटच्या उड्डाणासाठी या संस्थेने खास ३३० किलो जैवइंधन बनवले. यासाठी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी खास लागवड केलेल्या जत्रोफा वनस्पतीचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे ५० टक्क्यांपर्यंत जैवइंधन उड्डाणांमध्ये वापरता येऊ शकते. त्या प्रमाणापलीकडे जैवइंधन वापरल्याने उड्डाणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे. ते ध्यानात घेतल्यास, ‘जैवइंधनामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबिता ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते’ असे स्पाइसजेटचे प्रमुख अजयसिंह म्हणतात, त्याचा खरा अर्थ कळेल. विमान वाहतूक उद्योगाची सद्य:स्थिती गंभीर आहे. हवाई इंधनाच्या चढय़ा किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरत चाललेले मूल्य, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिकीट दरांमध्ये द्याव्या लागणाऱ्या भरमसाट सवलतींमुळे बहुतेक सर्व विमान कंपन्या तोटय़ात आहेत. एप्रिल-जून या तिमाहीत इंडिगो एअरलाइन्सच्या नफ्यात ९७ टक्के घट झाली. स्पाइसजेटला ३८ कोटी रुपयांचा तर जेट एअरवेजला १३२३ कोटींचा तोटा झालेला आहे. जेट एअरवेजच्या इंधन खर्चातच तब्बल ३५ टक्के वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत जैवइंधनाविषयी आशावाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु सध्या तरी मोठय़ा प्रमाणात जैवइंधन निर्माण होऊन त्याचा व्यापारी तत्त्वावर वापर विमान कंपन्यांना करता येईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. एक तर जैवइंधन हे पर्यायी इंधन असले, तरी तो ‘स्वच्छ’ पर्याय ठरेलच याची कोणतीही शाश्वती नाही. सध्या जैवइंधनाचा सध्याचा एकमेव प्रमुख स्रोत असलेल्या जत्रोफा वनस्पतीवर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) चार वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनाअंती आढळले की, या वनस्पतीच्या ज्वलनाने हरितगृह वायू उत्सर्जनाचे (ग्रीनहाऊस गॅस एमिशन) प्रमाण वाढू शकते किंवा घटूही शकते. जैवइंधनाची साठवणूक आणि वाहतूक ही तर स्वतंत्र आव्हाने आहेत. शिवाय व्यापारी तत्त्वावर जैवइंधननिर्मिती करायची झाल्यास जत्रोफाची लागवड मोठय़ा प्रमाणात करावी लागेल. या संभाव्य प्रचंड उत्पादनाचा इतर पिकांवर, जमिनीच्या कसावर, भूजलावर काय परिणाम होईल याविषयी संशोधन झालेले नाही. हे होत नाही तोवर जैवइंधनाला पारंपरिक इंधनाचा पर्याय म्हणून स्वीकारायचे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.