29 March 2020

News Flash

इकडे भाजप, तिकडे ‘नागरिकत्व’!

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सध्या चोहोबाजूंनी घेरले गेले आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सध्या चोहोबाजूंनी घेरले गेले आहेत. मित्रपक्ष भाजप, विरोधी राष्ट्रीय जनता दलाबरोबरच स्वपक्षीयांनीही नितीश यांच्या अडचणीत भरच पाडली. येत्या ऑक्टोबरात होणारी बिहार विधानसभेची निवडणूक जिंकून लागोपाठ चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याची नितीशकुमार यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. पण हे लक्ष्य गाठण्यापूर्वी काटेरी अडथळे अनेक आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूची आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी यातून राजकीय संदर्भच बदलले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला नितीशकुमार यांच्या जनता दलाने (यू) संसदेत पाठिंबा दर्शविला व त्यावरून पक्षांतर्गत वाद उफाळला. निवडणूक विशेषज्ञ प्रशांत किशोर किंवा पवन वर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी नितीशकुमार यांना लक्ष्य केले. यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी भाजपशी युती करून फक्त एक जागा पदरात पाडून घेतल्याने पक्षात प्रतिक्रिया उमटली. बिहारमध्ये निवडणुकीत विकासापेक्षा जातीपाती आणि धर्माचे मुद्दे अधिक प्रभावी ठरतात. बिहारच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण हे १७ टक्क्यांच्या आसपास आहे. ही मते विरोधात जाणे जनता दलास फायदेशीर नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीच्या विरोधात बिहारमधील निदर्शनेही वाढत आहेत. मुस्लीम आणि दुर्बल घटक विरोधात गेल्यास त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल याचा अंदाज आल्यानेच नितीशकुमार यांनी राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी बिहारमध्ये केली जाणार नाही, असे विधानसभेत स्पष्ट केले. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. नितीशकुमार यांना एक प्रकारे माघारच घ्यावी लागली. २००५ पासून (मधला काही काळ वगळता) नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी असले तरी त्यांना स्वबळावर सत्ता संपादन करता आलेली नाही. २००५ ते २०१३ पर्यंत ते भाजपच्या मदतीवर मुख्यमंत्री होते. २०१३ पासून लालूप्रसाद यांचा पाठिंबा घेतला. २०१७ मध्ये त्यांनी लालूप्रसाद यांच्याबरोबरचे संबंध तोडून पुन्हा एकदा कोलांटउडी मारून भाजपच्या कुबडय़ा घेतल्या. बिहारमधील सद्य राजकीय परिस्थितीत स्वबळावर सत्तेत येणे शक्य नसल्याने भाजपलाही नितीश यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. निवडणूक ऑक्टोबरात होणार, हे दिसू लागल्यावर भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली होती. आगामी मुख्यमंत्री भाजपचा, असा प्रचार सुरू झाला. भाजपच्या या आक्रमक भूमिकेने जनता दलात अस्वस्थता पसरली होती. पण आगामी विधानसभा निवडणूक ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी लढवेल, असे भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच जाहीर केल्याने या वादावर पडदा पाडला. तोवर बिहारलगतच्या झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला होता. झारखंडचे पडसाद बिहारमध्ये उमटू शकतात याची नितीशकुमार आणि भाजप या दोघांनाही भीती आहेच. या अडथळ्यांवर मात करून पुन्हा सत्ता मिळविण्याचे आव्हान असतानाच पक्षांतर्गत विरोध नितीशकुमार यांची डोकेदुखी वाढविणारा आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीवरून देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असताना भाजपशी हातमिळवणी करणे कितपत योग्य, असा सवाल पक्षाचे एक नेते पवन वर्मा यांनी केला. यावर वर्माना पक्ष सोडण्याची मोकळीक आहे, असे विधान करून नितीशकुमार यांनी भाजपशी युती कायम, असाच संदेश दिला. भाजपच्या मदतीशिवाय निवडणूक लढविणे नितीशकुमार यांना राजकीयदृष्टय़ा शक्य नाही. आणि स्वपक्षात ‘नागरिकत्व दुरुस्ती’ला विरोध असूनही भाजपला दुखावता येत नाही, अशी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ स्थिती नितीश यांची झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 12:04 am

Web Title: bjp citizenship akp 94
Next Stories
1 हेही विद्यार्थ्यांचे राजकीयीकरण!
2 रोखे म्हणे ‘पारदर्शक’!
3 ..सोडी सोन्याचा पिंजरा
Just Now!
X