उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी प्रतिनिधित्व केलेल्या अनुक्रमे गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांतील पराभवाचा भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत गोरखपूर आणि फुलपूरची पुनरावृत्ती होता कामा नये, अशी सक्त ताकीदच भाजपच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांना देण्यात आली आहे. कैरानामध्ये भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आले आहेत. सर्व विरोधकांनी राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना पाठिंबा दिल्याने भाजपपुढे आव्हान उभे ठाकले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील बॅ. जिना यांच्या छायाचित्रावरून वाद उकरून काढला होता. मतांच्या ध्रुवीकरणाकरिताच भाजपने ही खेळी केल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. याआधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कथित देशविरोधी घोषणांचा मुद्दा भाजपने तापविला होता. कैराना मतदारसंघात ऊस आणि साखरेचा प्रश्न गंभीर आहे. यामुळेच आम्हाला ‘जिना यांच्यापेक्षा गन्नयाची (ऊस) अधिक चिंता आहे’ अशी मार्मिक प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात सहा साखर कारखाने असून, त्यातील चार खासगी तर दोन सहकारी आहेत. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या उसासाठी १६९५ कोटी रुपये देणी आहेत. यापैकी ८८८ कोटी रुपयांचे वाटप झाले असले तरी ८०७ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १४ दिवसांमध्ये सर्व पैसे दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. भाजप सरकारमधील साखर विभागाचे मंत्रीही याच विभागातील आहेत. तरीही शेतकऱ्यांना अद्याप सर्व पैसे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या नाराजीचा सौराष्ट्रात सत्ताधारी भाजपला तर कर्नाटकात काँग्रेसला फटका बसला. कैरानामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. पण पैसे देताना कारखान्यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशांचा प्रश्न हा काही आजचा नाही तर नेहमीच उद्भवतो, असे सांगत भाजपच्या मंत्र्याने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे खासदार हुकूमसिंग यांच्या निधनाने या मतदारसंघातील पोटनिवडणूक होत आहे. हुकूमसिंग यांनी दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी मतांच्या ध्रुवीकरणाकरिता मोठा वाद निर्माण केला होता. मुस्लिमांच्या धाकदपटशहामुळे कैरानामधील हिंदू घरे सोडून अन्यत्र स्थलांतर करीत आहेत, असे विधान सिंग यांनी केले होते. त्याची चांगलीच प्रतिक्रिया उमटली होती. उत्तर प्रदेशातील तत्कालीन अखिलेश सिंग सरकारने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन सिंग यांनी आरोप केलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते. तेव्हा अनेक जण केव्हाच मरण पावले आहेत किंवा काही जणांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केल्याचे वास्तव्य समोर आले होते. भाजपने सहानुभूतीकरिता हुकूमसिंग यांची कन्या मृगंकालाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील एकूण १६ लाख मतदारांपैकी साडेपाच लाख मुस्लीम, दीड लाख जाट, अडीच लाख दलित मतदारांवर विरोधकांची सारी मदार आहे. कर्नाटकातील सत्तासंघर्षांत भाजपचा चांगलाच विचका झाला. गोरखपूर आणि फुलपूरची पुनरावृत्ती कैरानात झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपचे नाकच कापले जाऊ शकते. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची खरी कसोटी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp desperate to win kairana bypoll
First published on: 22-05-2018 at 01:17 IST