28 January 2021

News Flash

राजकीय उपयुक्ततावाद

गण सुरक्षा पार्टीलाही एक जागा मिळून, या तिहेरी आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

आसाममधील बोडोभूमी प्रादेशिक परिषदेच्या निवडणुकीत बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आपल्याच मित्रपक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपने सर्वच्या सर्व जागा लढवल्या  आणि निकालानंतर ‘युनायटेड पीपल्स पार्टी- लिबरल’ व ‘गण सुरक्षा पार्टी’ या दोन पक्षांबरोबर मैत्रीचा हात पुढे केला. परिणामी गेल्या तीन निवडणुकांत सत्ता मिळवलेल्या बीपीएफ या पक्षाला विरोधी पक्षात बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पक्षाला ४० पैकी १७ जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष ठरला; तर भाजपला नऊ आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल या पक्षाला १२ जागा मिळाल्या. गण सुरक्षा पार्टीलाही एक जागा मिळून, या तिहेरी आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे मंत्री हेमंत बिश्व शर्मा आणि बीपीएफचे हंग्रमा मोहिलरी यांच्यात जाहीर शाब्दिक युद्ध सुरू होतेच. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजप वेगळी भूमिका घेईल, याची चुणूक दिसून येतच होती. मात्र बोडोभूमी प्रादेशिक परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने स्वबळाचा अंदाज घ्यायचे ठरवले आणि त्यासाठी आपले मित्रपक्षही सहज बदलले. ही रणनीती विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार असल्यामुळे आणि ईशान्येतील सगळ्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळवण्याची जिद्द असल्याने अगदी ऐन वेळीही आपले सहकारी पक्ष बदलण्याचा निर्णय जाहीर करताना आपण काही वेगळे करत आहोत, अशी भावना भाजपने व्यक्त करण्याचे कारण नव्हते. महाराष्ट्रात युती तोडल्याची टीका शिवसेनेवर करणाऱ्या भाजपने देशाच्या अन्य राज्यांत या प्रकारचे राजकारण केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह सत्तेत सहभागी होणाऱ्या भाजपने नंतरच्या काळात त्यांना दूर सारले, तसेच बिहारमध्येही नितीशकुमार यांच्यासह निवडणुकीत आघाडी करतानाही त्यांचा पक्ष अस्थिर कसा होईल, याची रणनीती आखत लोक जनशक्ती पक्षाला बळ देण्याचे काम पडद्याआडून केले. गोव्यातही भाजपने मगोपच्या दोन आमदारांना आपलेसे करून सत्ता स्थापन केली. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीबरोबर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली व उपयुक्तता संपताच काडीमोडही घेतला. आसामात काहीही करून सत्ता राखण्याचा भाजपचा इरादा आहे. अशा वेळी गरजेनुसार आपले सहकारी पक्ष बदलणे ही भाजपसाठी क्रमप्राप्त ठरणारी गोष्ट ठरते. बोडोभूमी प्रादेशिक परिषदेच्या यापूर्वीच्या तीनही निवडणुकांत बीपीएफ या पक्षाला सत्ता मिळाली. त्याचे पाठबळ कमी करण्यासाठी यंदाची संधी भाजपने घेतली. स्वबळाची खात्री नसते, तेव्हा सत्ताकारणात सहकारी पक्षांची ताकद मिळवणे आवश्यकच. अशा परिस्थितीत ध्येय, नीती अशा गोष्टींना फारसा थारा नसतो. सत्ता मिळवण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक, ते ते करणे हे प्रत्येकच राजकीय पक्षाला किंवा पक्षांना गरजेचे वाटते. तेव्हा केवळ आपलाच पक्ष नीतिमान आहे, असा डांगोरा पिटण्याची खरे तर काहीच गरज नसते. एके काळच्या सहकारी पक्षाने आपली साथ सोडली, की आपण नीतिमान आणि आपण सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडले की राजकीय उपयुक्ततावाद, हे लोकांनाही संपर्कतंत्राने पटवून द्यावे लागते. भारतीय जनता पक्षाने देशातील राज्यांमध्ये सत्ता मिळण्यासाठी असे प्रयत्न हरघडी केले आणि असे करताना, आपण काही वावगे करत आहोत, असेही भासू दिले नाही. तेव्हा या राजकीय उपयुक्ततावादाचे धडे अन्य पक्षांनीही भाजपकडून घ्यावयास काय हरकत आहे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 12:02 am

Web Title: bjp dumps its coalition partner in assam abn 97
Next Stories
1 लहरी आणि संहारक..
2 संबंधजोडणी आणि समतोल
3 आधीच खचलेला आत्मविश्वास..
Just Now!
X