पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे भाजपने पनवेलमध्ये सत्ता काबीज केली. भिवंडीमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत तर मालेगावमध्ये सर्वाधिक जागा मिळविल्याने हे निकाल वारे वेगळ्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाल्याचे सूचक आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला झालेली तीन वर्षे आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला झालेली अडीच वर्षे या पाश्र्वभूमीवर मुस्लीमधर्मीयांच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन एकगठ्ठा मते काँग्रेस किंवा भाजपविरोधातील पक्षांना मिळणे, ही भाजपला धोक्याची घंटा ठरू शकते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविल्यावर भाजपचा विजयाचा वारू चौखूर उधळला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले आहे. केवळ दोन महापालिकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले, म्हणजे भाजपची विजयी घोडदौड रोखली जाईल, असे नाही. पण गोहत्या बंदी, तिहेरी तलाक, अयोध्येत राममंदिर, महाराष्ट्रात आरक्षण नाकारणे व अन्य अनेक बाबींमुळे मुस्लिमांमध्ये भाजपविरोधात नाराजी वाढत असल्याचे ते निदर्शक आहे. देशात  सर्वात मोठा अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीम समाजाला बाजूला ठेवून विकास साधता येणार नाही, त्यामुळे राजकारण व धार्मिक तेढ बाजूला ठेवून मुस्लीम समाजालाही बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी काही वेळा मांडली. पण उक्ती आणि कृती यातील अंतर आणि  हिंदुत्ववादी संघटनांच्या विचारसरणीच्या प्रभावातून टाकलेली पावले, यातून भिवंडी, मालेगावसारख्या ठिकाणी मुस्लीमबहुल समाज भाजपविरोधात काँग्रेसकडे पुन्हा सरकायला लागला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ दोन महापालिकांमध्ये असलेले चित्र राज्यात सर्वत्र दिसेल आणि काँग्रेस किंवा एमआयएम, समाजवादी पक्षाबरोबर जातील, असे नाही. पण मरगळलेल्या काँग्रेसच्या आशा पल्लवित करण्यासाठी हे निकाल पुरेसे आहेत.  भिवंडीमध्ये काँग्रेसने ९० पैकी ४७ जागा मिळविल्या, त्यात मुस्लीम कार्यकर्त्यांचा वाटा सर्वाधिक आहे. काँग्रेस नेत्यांनी संघटितरीत्या केलेले प्रयत्न, सुयोग्य उमेदवारांची निवड, प्रचारव्यवस्थापन व भाजपविरोधातील मुद्दे प्रखरपणे मांडणे, या बरोबरच आणखी एक गोष्टही काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे न्यायालयीन प्रकरणामुळे काही वेळा भिवंडीत गेले. त्या वेळी त्यांनी रोड शो केले, लोकांमध्ये मिसळले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्याचा उपयोग झाला. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याबद्दल त्यांना आशेचा किरण दिसू लागला असावा, असा निष्कर्षही त्यातून काढला जाऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार कपिल पाटील यांनी जोर लावला असताना काँग्रेसला निर्णायक बहुमत मिळाले, ही भाजपच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. मालेगावच्या निकालातूनही हेच प्रतिबिंबित झाले आहे. काँग्रेसने तेथे सर्वाधिक जागा मिळविल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल अशा धर्मनिरपेक्ष पक्षांनी २६ जागा मिळविल्या आहेत व एमआयएमने सात जागा मिळविल्या आहेत. हे निकाल भाजपविरोधात आहेत. राज्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीमधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केले किंवा तटस्थ राहिले व त्याचा फायदा भाजपला मिळाला. पण आता मुस्लीमधर्मीय समाज भाजपविरोधात संघटित व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त व्हायला लागला आहे, ही भाजपच्या दृष्टीने खचितच चिंतेची बाब आहे.