07 December 2019

News Flash

‘जननायक’ की जोडीदार?

महाराष्ट्रात युतीला १६१, तर हरयाणात फक्त ४० जागा जिंकता आल्या.

(संग्रहित छायाचित्र)

 

‘अब की बार ७५ पार’ ही हरयाणा, तर ‘२२० पार’ ही महाराष्ट्रात घोषणा करणाऱ्या भाजपला मोठा धक्का दोन्ही राज्यांत बसला. महाराष्ट्रात युतीला १६१, तर हरयाणात फक्त ४० जागा जिंकता आल्या. राज्यात शिवसेनेशी युती केल्यामुळे, सत्तेत स्वबळावर येणार नसल्याचे भाजपने आधीच मान्य केले होते. पण हरयाणात चांगल्या यशाची भाजपला खात्री होती. महाराष्ट्रात भाजपला १०५ जागा मिळाल्या असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आता ‘आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू’ हे स्पष्ट केलेले आहे. शिवाय, ‘आमच्यापुढे अन्य पर्याय असल्याचे’ कितीही इशारे दिले तरी शिवसेनेचे नेतृत्व तेवढी धमक दाखविण्याची शक्यता नाही. त्यामुळेच महाराष्ट्राविषयीचे निर्णय घेणाऱ्या केंद्रीय भाजप नेतृत्वाला मुंबईतील सत्तास्थापनेची तेवढी घाई दिसत नाही. याउलट हरयाणात भाजपने तातडीने पावले उचलली व सरकार सत्तेतही आले. कारणही तसेच होते. भाजपला ४०, तर काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या. दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाला १० जागा व सात अपक्ष निवडून आले. हरयाणातील काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हुडा यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. भाजपने साऱ्या अपक्षांना बरोबर घेतले, पण त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय लोकदलातून फुटून वेगळी चूल मांडलेल्या जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौताला यांचा पाठिंबा मिळवला. दुष्यंत चौताला हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू. देवीलाल यांच्या पश्चात भारतीय राष्ट्रीय लोकदलाची सूत्रे सध्या तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्याकडे होती. चौताला यांच्या दोन मुलांमध्ये पक्षाची सूत्रे कोणाकडे असावीत, यावरून वाद सुरू झाला. यातूनच ओमप्रकाश चौताला यांनी दुष्यंत आणि त्यांचे वडील अजय यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर तिशीच्या वयाच्या दुष्यंत यांनी जननायक जनता पक्षाची (जेजेपी) स्थापना केली. देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल, ओमप्रकाश चौताला किंवा हुडा या जाट समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी हरयाणात ३० टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या जाट समाजाला झुकते माप दिले. महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणात भाजपने प्रस्थापित जातींकडे नेतृत्व सोपवण्याचे टाळले. हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वीही ठरला. हरयाणात इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमातीचे मतदार यातून भाजपकडे आकर्षित झाले. काँग्रेसचे हुडा आणि दुष्यंत यांच्या पक्षामुळे जाट मतांचे विभाजन झाले. तरीही भाजपचे सत्तेचे गणित जुळू शकले नाही. जाट मतदारांनी भाजपला दिलेल्या पूर्ण नकाराचे महत्त्वाचे शिल्पकार दुष्यंत चौतालाच होते. पक्षस्थापनेपासूनच दुष्यंत यांनी जाट समाजावर भाजपकडून कसा अन्याय होतो, असा प्रचार सुरू केला. तरीही केंद्रात भाजपची सत्ता असल्यानेच बहुधा दुष्यंत यांनी भाजपशी हातमिळवणी केली. पंजाबी खत्री समाजातील मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री, तर जाट समाजातील दुष्यंत उपमुख्यमंत्री, असे जातीय समीकरण भाजपने साधले. भाजपशी हातमिळवणी करताच अवघ्या २४ तासांत दुष्यंत यांचे वडील आणि हरयाणातील शिक्षकभरतीतील भ्रष्टाचार प्रकरण सिद्ध झाल्यामुळे तिहार तुरुंगात दहा वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या अजय चौताला यांना १४ दिवसांची सुट्टी (फलरे) मंजूर झाली. तिहार तुरुंगाचे प्रशासन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने चौताला यांना दिलासा कोणाकडून मिळाला, हा प्रश्नच उद्भवत नाही! हरयाणाची सत्ता कायम राखण्याचे भाजपचे ध्येय साध्य झाले. याशिवाय विरोधात गेलेल्या जाट समाजाला चुचकारण्याची संधी चौताला यांच्यामुळे मिळाली. आता खरी कसोटी दुष्यंत चौताला यांची आहे. मित्रपक्षांना वापरून सोडून देण्याची भाजपची नेहमीची खेळी असते. आसाम गण परिषद, कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, सिक्किम डेमोक्रॅटिक पक्ष अशी उदाहरणे देता येतील. भाजपविरोधात दुष्यंत चौताला यांनी केलेल्या प्रचाराला यश मिळाले असले, तरी आता ते याच पक्षाचे सहकारी आहेत. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात प्रादेशिक शक्ती म्हणून पुढे येण्याचा दुष्यंत यांचा प्रयत्न आहे. सत्तेत सहभागी झालेल्या दुष्यंत यांची कोंडी करण्याचे राजकारण भाजपकडून केले जाण्याची चिन्हे आहेत. दुष्यंत जास्त प्रभावी ठरणार नाहीत, असेच प्रयत्न भाजपकडून केले जातील. महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच हरयाणात जाट समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. जाट समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. दुष्यंत यांना सत्तेची फळे चाखायला मिळाली असली, तरी त्यांच्या पक्षास किती मंत्रिपदे द्यावी, हा मुद्दा भाजपने रविवारच्या शपथविधीनंतरही अनिर्णित ठेवला आहे. भाजपने हरयाणातील ओमप्रकाश चौताला या प्रभावी नेत्याच्या नातवाला गुंडाळले, असा संदेश यातून गेला असल्यास नवल नाही. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि नातवाला गुंडाळण्यात यशस्वी होतात का, हे बघायचे. दुष्यंत हे पक्षाच्या नावाप्रमाणे ‘जननायक’ ठरतात की भाजपच्या अन्य जोडीदारांप्रमाणे त्यांची गत केली जाते, हे कालांतराने स्पष्ट होईल.

First Published on October 28, 2019 12:03 am

Web Title: bjp jjp government in haryana abn 97
Just Now!
X