समाजमाध्यमांतून वावरणाऱ्या अनेकांना हे माहीत नसेल, अनेकांना त्याची कल्पना असेल आणि बाकीच्यांचा त्यात प्रत्यक्ष हात असेल, पण आजकाल ही माध्यमे म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचे काम करणारे कारखाने बनले आहेत. त्यावरील संदेश खरे की खोटे याची शहानिशा करण्याइतका वेळ आणि क्षमता सगळ्यांकडेच असते असे नाही. त्यामुळे हे संदेश वणव्यासारखे पसरतात. सामान्य नागरिकांच्या या मानसिकतेचा फायदा देशविघातक शक्तींनी घेतला नसता तर नवलच. तो कसा घेतला गेला आणि घेतला जात आहे याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. पश्चिम बंगालमधील दंगल हे त्यातील एक ताजे प्रकरण. या प्रकरणामध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असून, त्यातील काही भाजपचे प्रतिष्ठित नेते आहेत. त्यातील एकाला प. बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाने  नुकतीच अटक केली. हा नेता म्हणजे भाजपच्या आसनसोल जिल्हा माहिती-तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख. देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये भाजपचे आयटी सेल असून, समाजमाध्यमांतून पक्षप्रचार करणे, टीकाकारांचा समाचार घेणे हे त्याचे एक महत्त्वाचे काम असल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी हा सेल एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आला होता. मध्य प्रदेशातील एका आयटी सेलमधील ध्रुव सक्सेनानामक भाजप-नेता पाकिस्तानी आयएसआयसाठी काम करीत होता. देशाची गोपनीय माहिती तो आयएसआयला पुरवीत असल्याचा संशय आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे प. बंगालमधील भाजप नेताही अशाच प्रकारच्या देशद्रोही कारवाया करीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सीआयडीने त्याला अटक केली. या कारवाया म्हणजे दंगल भडकवण्यासाठी खोटय़ा बातम्या प्रसृत करणे. ही दंगल मुस्लीम अतिरेक्यांनी सुरू केली. ती फेसबुकवरील एका छायाचित्राने त्यांच्या भावना दुखावल्या म्हणून. या दुखऱ्या भावना ही एक मोठीच सामाजिक डोकेदुखी बनली आहे. पण ती राजकारणासाठी उपयुक्त. त्याचा फायदा तेथील मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी घेतला. त्यात तेल ओतण्याचे काम हिंदू मूलतत्त्ववाद्यांनी केले. हिंदू स्त्रियांवर कसे अत्याचार होत आहेत हे दाखविण्यासाठी एका भोजपुरी चित्रपटातील दृश्य समाजमाध्यमांतून पसरविण्यापासून गुजरात दंगलींची जुनी चित्रे ही प. बंगालमधील असल्याचे भासविण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. ज्या मुलाने फेसबुकवर वादग्रस्त चित्र टाकले होते, त्याच्या आई-बापाचे रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रही अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरविले. ते अर्थातच खोटे होते. त्या मुलाची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि ते छायाचित्र २०१६ सालचे आणि बांगलादेशातील होते. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी तर कहरच केला. गुजरात दंगलीतील छायाचित्र प. बंगालमधील म्हणून पसरविले. त्याचे सत्य उघडकीस आल्यानंतरही त्यांनी ना ते हटविले, ना त्याबद्दल खेद व्यक्त केला. हे करणारे केवळ हिंदूूच आहेत असे नाही. अनेक सुशिक्षित निर्बुद्धही त्यात सहभागी होताना दिसतात. जल्पकांच्या झुंडी तयार होतात त्या या परपीडक निर्बुद्धांतूनच. या सगळ्यांचा वापर प. बंगालमध्ये पद्धतशीरपणे करण्यात आला तो तेथील धार्मिक फाळणीसाठी. पूर्वी कुजबुज स्वरूपात असाच प्रोपगंडा केला जाई. आता त्या कुजबुज आघाडय़ा समाजमाध्यमांवरून सक्रिय आहेत. तो प्रचार धार्मिक कट्टरतावाद्यांच्या हिताचा आहेच. पण देशहिताचा मात्र नक्कीच नाही. अशा बेजबाबदार लोकांकडे आपण देशद्रोही म्हणून पाहणार की नाही की उलट असे म्हणणाऱ्या विवेकाच्या आवाजालाच दाबण्याचा प्रयत्न करणार हा खरा प्रश्न आहे. कोणताही पक्ष-पात न करता तो विचारलाच पाहिजे..