आणखी १५ दिवसांनी- येत्या २१ ऑक्टोबरला भारतीय जनता पक्ष ६८ वर्षांचा होईल. लौकिकार्थाने या पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० या दिवशी झाली असली, तरी त्याची जन्मतारीख मात्र २१ ऑक्टोबर १९५१ हीच आहे. त्यामुळे या पक्षाची सुमारे सात दशकांतील वाटचाल सर्वच राजकीय निरीक्षकांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यापैकी चार दशकांपूर्वी हा पक्ष ‘भारतीय जनता पक्ष’ म्हणून नव्या अवतारात राजकारणात अवतरला, तेव्हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे या पक्षाचे घोषवाक्य होते. मात्र, या पक्षाने गेल्या चार दशकांत ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ असे नवे रूप धारण केले, अशी पक्षाच्या असंख्य निष्ठावान कार्यकर्त्यांची भावना अलीकडे लपून राहिलेली नाही. समाजमाध्यमांमुळे सामान्य कार्यकर्त्यांचा हा आवाज सर्वदूर पोहोचू लागलेला आहे. ‘एकचालकानुवर्तित्व’ हा विचार असलेल्या रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या पक्षाने पुढे सत्तेच्या राजकारणासाठी सोयीस्कर म्हणून ‘सामूहिक नेतृत्व’ या संकल्पनेचा स्वीकार केला. परंतु विचाराचे चक्र कधी उलटे फिरले आणि पुन्हा एकचालकानुवर्तित्व कधी सुरू झाले, ते निष्ठावंत कार्यकर्त्यांसही समजले नाही. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर याची जाणीव होऊ  लागल्याने, कार्यकर्त्यांच्या मनातील या भावना समाजमाध्यमांवर व पक्षांतर्गत मेळावे, सभा-बैठकांमध्येही व्यक्त होऊ  लागल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या रणधुमाळीत या पक्षाने ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ हे नवे घोषवाक्य स्वीकारल्याचे आणि एकचालकानुवर्तित्व हे जुने ब्रीद नव्याने कोरल्याचे स्पष्ट झाले आणि संघाच्या मुशीत घडलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम पसरला. तीच भावना आता मतदारांतही पसरू लागली आहे. भाजपने वेळोवेळी बदललेल्या भूमिका, तसेच आधी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या विरोधकांना पक्षात घेऊन पावन केले गेले; एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी स्वपक्षातील अनेक निष्ठावंतांची मानाची आसने मोकळी करून दिली गेली, हे या संभ्रमाचे मूळ आहे. सत्तेसाठी तत्त्वशून्य तडजोडी केल्या जाणार नाहीत, असे बोलणारी नेतृत्वाची फळी मावळताच भाजपमध्ये तडजोडींच्या राजकारणास ऊत आल्याचे या निवडणुकीच्या वातावरणात स्पष्ट झाले. विरोधकांच्या भूमिकेत असताना ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच नेत्यांवर आज पक्षामध्ये महत्त्वाच्या भूमिका सोपविल्या गेल्या आहेत, ही भाजपनिष्ठांची भावना आहे. भ्रष्टाचार संपविणे म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा घडविणे असा जनतेचा समज असतो. भाजपने मात्र एकनाथ खडसेंसारखा एकमेव अपवाद वगळता; ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना ‘क्लीन चिट’ देऊन ते डाग पुसले आणि स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेचा डांगोरा पिटला, असे कार्यकर्ते बोलून दाखवितात. विरोधात असताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले- त्यांच्यावर गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात कारवाई तर झाली नाहीच, उलट त्यांपैकी अनेकांना अभयछत्र मिळाले असे या निष्ठावंतांना का वाटते, याचे उत्तर देणारी एकही व्यवस्था भाजपमध्ये नाही हे उघड झाले आहे. ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि व्यक्ती शेवटी’ असा एक आकर्षक नारा भाजपमध्ये दिला जातो. महाराष्ट्रात होऊ  घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांची निवड, नेत्यांच्या फळीची आखणी व कार्यकर्त्यांच्या भूमिका पाहता, हा नारा सध्या पुरता हास्यास्पद झाला असून, त्याचा क्रमही उलटा झाला आहे, हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते उघडपणे मान्य करू लागले आहेत. अर्थात, सध्या भाजप हाच एकमेव प्रबळ राजकीय पक्ष असून विरोधकांतील प्रभावशाली नेत्यांनाच पक्षाच्या वळचणीला आणल्याने आता भाजपला आव्हान नाहीच, अशी भाजपच्या नेत्यांची झालेली भावना हेच त्याचे कारण आहे. विरोधी पक्षास खिळखिळे करून त्याच्याच जोरावर सत्ताकारण करण्याच्या प्रयोगात स्वपक्षातील अनेक प्रभावशाली नेत्यांचे पंख छाटण्याचा प्रयोगही पद्धतशीरपणे भाजपमध्ये पार पडलेला दिसतो. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे उमेदवार निवड प्रक्रियेतील दुय्यम स्थान आणि ‘गडकरी गट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची गच्छंती हे त्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर बंडखोरी अपरिहार्यच असूनही तावडे, खडसे वा अन्य मोजक्या निष्ठावंतांनी संयम दाखविला. बंडखोरांना संवादाच्या माध्यमातून शांत करण्याचा इरादा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविला आहे. मात्र, ज्यांना डावलले त्यांना संवादाचा मार्ग बंद का झाला; ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांपैकी स्वपक्षातील आणि आयारामांतीलही अनेकांवर उमेदवारीची उधळण करण्यात आली; पण ज्या निष्ठावंतांना डावलले, त्यांना मात्र नाकारण्याचे कारणही कळले नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांमधून उमटताना दिसते. या शंकांची उत्तरे निवडणुकीनंतर शोधण्याचा प्रयत्न करू, असे तावडे म्हणतात. मात्र, तेव्हाच्या भाजपमध्ये या नेत्यांचे स्थान दखलपात्र असेलच याबद्दल पक्षातच साशंकता असल्याने, निवडणुकीनंतरचा भाजप आणखी कोणते नवे रूप धारण करणार, याचीच आता पक्षातील निष्ठावंतांना प्रतीक्षा आहे.