राज्य विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी मुंबई आणि ठाण्यातील ६० जागांना विशेष महत्त्व असते. शहरी भागातील कौल कोणाच्या पारडय़ात पडतो हे महत्त्वाचे असतेच. मुंबईचा विचार केल्यास लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाला किंवा युती अथवा आघाडीला कौल मिळतो, असे चित्र आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढूनही भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व होते. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत युतीने एकतर्फी यश मिळविले. मात्र १९९९, २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश मिळाले होते. या वेळी युती असल्याने मुंबईत जास्तीत जास्त जागाजिंकण्याचे भाजप आणि शिवसेनेचे लक्ष्य आहे. शेजारील ठाणे आणि पालघर पट्टय़ातही आपलेच वर्चस्व राहावे, असाच युतीचा प्रयत्न दिसतो. युतीपैकी मुंबईत वर्चस्व कोणाचे हा भाजप आणि शिवसेनेसाठी कळीचा मुद्दा. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना भाजपचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा शिवसेनेचे दोन नगरसेवक जास्त निवडून आले होते. या वेळी युतीत शिवसेना १९ तर भाजप आणि मित्र पक्ष १७ जागा लढवीत आहेत. मुंबईत युतीच्या जागावाटपात तरी शिवसेना मोठा भाऊ ठरला असला तरी निकालानंतर नक्की मोठा भाऊ कोण हे स्पष्ट होईल. मुंबईत काँग्रेस पक्ष फारच कमकुवत झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलण्यात आले. पक्षात एकूणच मरगळ आली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईत पुन्हा युतीचेच वर्चस्व असेल, असेच चिन्ह आहे. मुंबईतील ३६ जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभर भाजप आणि शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली असली तरी या तुलनेत मुंबईत तीन मतदारसंघांमध्येच बंडखोरी झाली आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवून दाखवतो’, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असतानाच त्यांचे निवासस्थान असलेल्या मतदारसंघातील बंडखोरी ठाकरे रोखू शकले नाहीत. ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी शिवसेनेला रोखता आली नाही हा संदेश शिवसेनेसाठी नक्कीच भूषणावह नाही. दोन पटेलांची बंडखोरी ही भाजप आणि शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते. वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेच्या राजुल पटेल आणि अंधेरी पूर्व मतदारसंघातील भाजपचे मुरजी पटेल यांच्या बंडखोरीने युतीच्या गोटात चिंता पसरली. हे दोन पटेल किती मते खातात यावर भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने ही जागा प्रतिष्ठेची करून ताब्यात घेतलेल्या शिवसेनेची पंचाईत झाली. मीरा-भाईंदर या बालेकिल्ल्यात माजी महापौरांच्या बंडखोरीने भाजपसमोर आव्हान उभे ठाकले आहे. रायगडमधील उरण मतदारसंघातील भाजपची बंडखोरी शिवसेनेसाठी तापदायक ठरू शकते. मुंबई, ठाणे हा पट्टा पारंपरिकदृष्टय़ा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गत वेळी ६० पैकी ४४ जागा भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढून जिंकल्या होत्या. या वेळी भाजप आणि शिवसेनेची असलेली युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची झालेली पीछेहाट लक्षात घेता या वेळी गतवेळ एवढय़ा किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचे युतीचे प्रयत्न आहेत. मुंबईकर सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या मागे उभे राहतात, असा अनुभव आहे. हा कल यंदाही कायम राहतो का, याचीच उत्सुकता.