News Flash

तमिळ राजकारणाची वळणे

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता

मोदी यांनी करुणानिधी यांची भेट घेऊन भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने द्रमुकला गोंजारल्याचे मानले जाते.

दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणाचा बाजच निराळा. त्यातही तामिळनाडू राज्याचे राजकारण वेगळ्याच धाटणीचे. गेल्या तीन दशकांमध्ये फक्त प्रादेशिक पक्षांची चलती असून, राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊन राजकारण करावे लागते. पेरियार यांच्यापासून ते अण्णा दुराई, एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, जयललिता या जनाधार असलेल्या नेत्यांच्या भोवताली राजकारण फिरत राहिले. गेल्या वर्षी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणाचे सारे चित्रच बदलले. नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष आणि नेते आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षात दुफळी निर्माण झाली. जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांनी सारी सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली. लोकसभेच्या ३९ जागा असलेले तामिळनाडू राज्य हे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपला जनाधार अद्याप तरी मिळालेला नाही. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यातूनच येथे आपल्या जवळचा पक्ष सत्तेत राहावा म्हणून भाजपचा आटापिटा सुरू होता. अण्णा द्रमुक पक्षात निर्माण झालेल्या दुफळीनंतर सरकार टिकण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यावर भाजपने दिल्लीतून सूत्रे हलविली आणि दोन्ही गटांना एकत्र आणले. अण्णा द्रमुकच्या पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम या जोडगोळीने भाजपला पाठिंबा जाहीर केला. तामिळनाडूचे राजकारण हे लाटेवर चालते. म्हणजेच एका पक्षालाच पूर्ण यश मिळते, असा इतिहास आहे. दुभंगलेल्या अण्णा द्रमुकला आगामी लोकसभा निवडणुकीत कितपत यश मिळेल याबाबत साशंकता आहे. शशिकला आणि दिनकरन यांना मानणाऱ्या १८ आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्याने सरकार तगले आहे. हा सारा राजकीय गोंधळ सुरू असतानाच सोमवारी एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी चेन्नईला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याच्या नियोजनात बदल करून जयललितांचे विरोधक, द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नव्वदी पार केलेले करुणानिधी आता थकले आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती खालावली होती. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची लोकप्रियता आटल्याने त्याचा राजकीय लाभ द्रमुकसाठी मिळवण्याचा प्रयत्न करुणानिधी यांचे पुत्र एम. स्टालिन करीत आहेत. अण्णा द्रमुक भाजपबरोबर असल्याने द्रमुक हे काँग्रेस किंवा अन्य निधर्मवादी पक्षांबरोबर जाणे स्वाभाविकच आहे; पण मोदी यांनी करुणानिधी यांची भेट घेऊन भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने द्रमुकला गोंजारल्याचे मानले जाते. २०१९च्या निवडणुकीत तशी वेळ आलीच तर द्रमुकचा पाठिंबा मिळावा, हा मोदी यांचा उद्देश असू शकतो. अर्थात, ‘या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका’, असा खुलासा भाजप आणि द्रमुकने केला असला तरी मोदी यांची खेळी स्पष्ट आहे. मोदी आणि करुणानिधी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी आपला ६३वा वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या कमल हासन या चित्रपट अभिनेत्याने राजकारणात सक्रिय होण्याचे सूचित केले. तामिळनाडूत लोकप्रिय चित्रपट अभिनेते किंवा अभिनेत्रींना मतदार डोक्यावर बसवितात, असा इतिहास आहे. जयललिता यांच्यानंतर सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. कमल हासन यांनी राजकारण-प्रवेशाच्या तोंडावरच हिंदू दहशतवादावर प्रकाश टाकून वाद निर्माण केला. आता त्यांनी हिंदूंच्या भावना दुखवायच्या नसल्याचा खुलासा केला आहे. या यशस्वी अभिनेत्याचा राजकीय आवाका आणि झपाटा कमीच असल्याचेही यातून दिसले. तरीदेखील, तामिळनाडूचे राजकारण कोणत्या दिशेने वाटचाल करील याचा पक्का अंदाज आताच बांधणे कठीण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:38 am

Web Title: bjp wants to emerge in tamil nadu politics
Next Stories
1 अशी नाही तर तशी भेट!
2 शिक्षणाचा काळा बाजार
3 गुन्हेगारीकरण नको आहे ना?
Just Now!
X