22 October 2020

News Flash

धर्मनिरपेक्षतेची ऐशीतैशी

शहरांमधील सुमारे ३००० आणि  सुमारे २५ हजार ग्रामीण मंडळांना ही बिदागी मिळेल.

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा समित्यांना ममता बॅनर्जी सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर स्थगिती आणण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने तूर्त नकार दिला आहे. हा आदेश कार्यकारी स्वरूपाचा असल्याचा बचाव सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला होता. तो ग्राह्य़ मानण्यात आला. एवढय़ा भांडवलावर ममता आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत असले, तरी धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने ही खेदजनक घडामोड ठरते. पश्चिम बंगालमधील २८ हजार पूजा समित्या किंवा मंडळांना प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण २८ कोटी रुपये अनुदानापोटी वाटले जाणार आहेत. गेल्या वर्षी ममतांनी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत विजयादशमीच्या दिवशी जाहीर शस्त्रपूजनावर आणि शस्त्र मिरवणुकांवर बंदी घातली, न्यायालयाने ‘बंदिस्त जागी शस्त्रपूजेवर बंदी नाही’ असा आदेश दिला आणि तोही झुगारून विश्व हिंदू परिषदेसारख्या काही संघटनांनी जाहीर शस्त्रपूजनाची हौस भागवून घेतली.  यंदा मात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच सरकारी मदतीची उधळपट्टी दुर्गापूजा उत्सवावर करून त्यांनी आधीच्या शहाणपणावर पाणी ओतले आहे. शहरांमधील सुमारे ३००० आणि  सुमारे २५ हजार ग्रामीण मंडळांना ही बिदागी मिळेल. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेची लोकप्रियता आणि त्यानिमित्ताने होणारी उलाढाल पाहता, १० हजार रुपये कोणत्याही मंडळासाठी क्षुल्लकच. त्यामुळे या निधीची चिंता सरकारने वाहण्याचे कारणच काय? उलटपक्षी, ज्या पश्चिम बंगालवर आधीच

३.६४ लाख कोटी रुपये कर्ज आहे, तेथे २८ कोटी रुपये ही रक्कम तिजोरीवर भार येण्यास पुरेशी आहे. देशातील बहुतेक भागांत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नजीकच्या भविष्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालही याला अपवाद नाही. दुष्काळ निवारणासाठी निर्धारित निधीपेक्षा अधिकची गरज भासणार आहे. अशा आनुषंगिक पण आणीबाणीच्या खर्चासाठी तरतूद करण्याऐवजी धार्मिक उत्सवांकडे तो वळवून काय साधणार? शिवाय यातून काही धोकादायक पायंडे पडतात याची फिकीर ममतांसारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना आहे असे दिसत नाही. आज १० हजारांची मदत दिल्यानंतर प्रत्येक वर्षी तशी अपेक्षा बाळगली जाईलच. शिवाय भाजप व परिवारातील संघटनांनी पुढच्याच वर्षी ‘वाढीव खर्चाची नोंद घेऊन मदतीची रक्कम वाढवा’ अशी मागणी करणेही असंभव नाही.  घटनेने आखून दिलेल्या धर्मनिरपेक्ष चौकटीत मुख्यमंत्री किंवा सत्तारूढ व्यक्तींनी धार्मिक बाबींमध्ये लक्ष घालण्याची खरोखरच गरज आहे का, याचीही चर्चा यानिमित्ताने व्हायला हवी. मागे आपल्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गणेशोत्सव मंडळांचे गुन्हे माफ केले होते. कित्येक ठिकाणी बेकायदा मंडप उभारणीस परवानगी दिली गेली होती. दर वेळी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता. ममतांच्या बाबतीत आणखी एक विशेष बाब म्हणजे, आम्ही केवळ विधिमंडळ आणि महालेखापालांनाच उत्तरदायी आहोत, तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही अशी गर्भित तंबीच त्यांच्या वकिलांनी दिली. हे आणखी गंभीर आहे. उद्या या भूमिकेचा कित्ता अन्य राज्य सरकारांनी गिरवला, तर न्यायालयाचीही काय पत्रास? कलकत्ता उच्च न्यायालयाने सध्या तरी उत्सवी आणि उत्साही वातावरणात विरजण नको म्हणून ममतांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका निकालात काढली आहे. मात्र, भविष्यात वेळ पडल्यास या मुद्दय़ावर पुन्हा खल होऊ शकेल, असेही सूचित केले आहे. ममतांच्या धोरणांसमोर न्यायालय हतबल झालेले नाही, इतकीच आशा बाळगणे सध्या आपल्या हातात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:54 am

Web Title: calcutta hc rejects petition challenging grant for durga puja
Next Stories
1 ‘मानांकना’ची शिकवणी!
2 न्यायालयीन पक्षनिरपेक्षता धोक्यात
3 उपान्त्य फेरी
Just Now!
X