तेंडुलकर या नावास महाराष्ट्राच्या कलाविश्वात अनन्यसाधारण असे महत्त्व. हे नाव अंगाखांद्यावर रुळवून आपापले जगणे अधिक संपन्न करत राहणे हे तसे अवघडच; पण विजय तेंडुलकर यांच्यासारख्या नाटककाराच्या सावलीतही मंगेश आणि सुरेश हे भाऊ आपापल्या वाटेने चालत राहिले. वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि आपले जगणे खऱ्या अर्थाने सार्थकी लावले. मंगेश तेंडुलकर हे नाव त्यांच्या रेषांमुळे आणि त्याच वेळी त्यांच्या शब्दसाहित्यामुळे महाराष्ट्रात परिचित झाले. एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार एवढीच त्यांची ओळख निश्चितच अपुरी. याचे कारण समाजातील व्यंग्य टिपत असतानाच, तेथे काही भरीव घडावे, अशी मनोमन आशा बाळगून काम करणारे कलावंत विरळा. मंगेश तेंडुलकर त्यातले. आयुष्यभर आपल्या मोटारसायकलीवरून सगळीकडे यथेच्छ हुंदडणारे तेंडुलकर कोणत्याही समारंभात सहजपणे उपस्थित असत. अनेकदा श्रोते म्हणूनही. काही वेगळे घडते आहे, असे लक्षात आले, की तेंडुलकर तेथे धाव घेणारच. नाटकाच्या क्षेत्रात विजय तेंडुलकर यांनी केलेल्या कामगिरीचा असा नाही तसा परिणाम होणे ही स्वाभाविक गोष्ट असल्याने मंगेश तेंडुलकरांनी अनेक वर्षे नाटय़परीक्षणाचे काम अतिशय मनोभावे केले. नाटक हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होताच; पण त्याकडे तटस्थ वृत्तीने पाहण्याची क्षमता त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली होती. आपण ‘तेंडुलकर’ आहोत, याची त्यांनी कधी ओळख दिली नाही की त्याचा कशाही प्रकारे उपयोग केला नाही. व्यंगचित्रकला ही त्यांच्या जगण्याची सर्वात मोठी भूक होती. रेषांच्या माध्यमातून भाष्य करताना, अनेक वेळा तेंडुलकर जरा तीव्रपणे व्यक्त होत. तेच त्यांचे बलस्थानही होते. जे चूक ते चूकच म्हणतानाही तेंडुलकरांच्या रेषा अधिक कडवटपणे व्यक्त होत असत. त्यामुळे जातीपातीमधील मतभेदांपासून ते राजकारणातील सर्वच पातळ्यांवरील भ्रष्टता तेंडुलकरांना कधीच स्वस्थ बसू देत नसे. व्यक्त होताना सर्वाना सांभाळून घेण्याचा अनैतिकपणा त्यांनी कधी केला नाही, याचे कारण जे म्हणायचे आहे, त्याबद्दल ते पक्के असत. हा बोचरेपणा आणि तिरसटपणा त्यांच्या व्यंगचित्रातून सतत दिसत असे. व्यंगचित्रांचे प्रदर्शन गर्दी खेचू शकते, हे मंगेश तेंडुलकरांमुळेच सिद्ध झाले. आयुष्याच्या शेवटपर्यंत व्यंगचित्रांतून व्यक्त होण्याचा ध्यास टिकून राहिला, याचे कारण जगण्याकडे रसरसलेल्या भूमिकेतून पाहण्याची त्यांची वृत्ती. बोचरेपणा हे समाजभानाचे प्रतीक म्हणूनच तेंडुलकरांनी उपयोगात आणले. काही वेळा कठोर वाटावे, इतकी कडवट प्रतिक्रिया त्यांच्या व्यंगचित्रातून प्रकट होई; परंतु त्यांनी मात्र कधीच आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘संडे मूड’ या पुस्तकात तर शब्द आणि व्यंगचित्र असाच समसमासंयोग आहे. दिवाळीच्या काळात फटाके उडवून पर्यावरणाला बाधा येते, त्यामुळे ते न उडवणे योग्य. ही भूमिका पटल्यानंतर गेली सुमारे पंधरा वर्षे तेंडुलकर पुण्यातील चौकांमध्ये, भल्या पहाटे उठून आपणच चितारलेल्या या संदेशाच्या चित्राच्या स्वखर्चाने केलेल्या छायाप्रती वाटत हिंडायचे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठीही त्यांचा असाच चित्रमय अट्टहास. त्याचा किती परिणाम होईल, याची तमा न बाळगता, एखाद्या व्रतासारखे ते हे काम सातत्याने करीत आले. समाजात मिसळण्यासाठी कलाकाराच्या अंगी असावी लागणारी सहिष्णुता त्यांच्यापाशी होती, त्यामुळेच त्यांना समाजस्वास्थ्याशी निगडित घटनांमध्ये कमालीचा रस असे. आपण अस्सल पुणेरी आहोत, याबद्दलचे त्यांचे भान कधीच सुटले नाही. त्यामुळे सभासमारंभात जाऊन भाषणे करतानाही त्यांना मनापासून जे वाटे, तेच बोलण्याचे धाष्टर्य़ त्यांनी कसोशीने जपले होते. आपल्या मर्जीप्रमाणेच जगायचे, हा त्यांचा बाणा. त्यामुळे नोकरीनंतरच्या निवृत्तीच्या काळात ते कलाजगतात अधिक रममाण झाले; पण ही कला समाजाभिमुख करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले. मंगेश तेंडुलकरांच्या निधनाने सामान्यांनाही दु:ख का झाले, याचे हे एक मुख्य कारण. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.