जातिभेद मानणारे आणि पाळणारे लोक मानभावीपणाचे टोक किती व कसे गाठू शकतात, याचे एक उदाहरण तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात घडते आहे. या जिल्ह्यातील अनेक शाळांत मुलांना आपापल्या जातीप्रमाणे ठरलेल्या रंगाचा गंडय़ासारखा दोरा मनगटावर बांधावा लागतो. शाळकरी मुलगी वा मुलगा नाडर जातीचा असेल तर हातास निळा आणि पिवळा दोरा, थेवर जातीच्या मुलामुलींसाठी लाल व पिवळा, हेच विद्यार्थी यादव जातीचे असतील तर भगवा, दलितांपैकी पल्लार जातीसाठी लाल व हिरवा, अरुंधतियार जातीसाठी हिरवा आणि काळा वा पांढरा असे रंग ठरलेले आहेत. तेच रंग काही शाळांमध्ये पाळले जातात. या सर्व जाती कोणत्या ना कोणत्या सवलती मिळवणाऱ्या आहेत. नाडर हे एरवी सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा प्रगत; पण त्यांनी स्वत:ची गणना मागास जातींत करून घेतल्याने नाडर विद्यार्थ्यांनाही काही लाभ मिळतात. म्हणजे एक प्रकारे, ‘जातींवर आधारित सवलती देण्याच्या सरकारी धोरणामुळेच जातीपाती आजही टिकून आहेत’ हा कोठेही, कधीही केला जाणारा कांगावा खरा ठरावा अशीच प्रथमदर्शनी स्थिती. पण मागासांना मिळणाऱ्या सवलती काही प्रत्येक वेळी हातावरला रंग पाहून द्याव्या लागतात असे नाही. शिवाय सरकारला हा प्रकार नामंजूरच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बंध घालण्याची प्रथा थांबवण्याच्या सूचना ऑगस्टमध्ये दिल्या होत्या, तरीही काही झालेले नसून उलट, ‘लेखी आदेश नव्हतेच’ असे काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे! गंडय़ासारखे हे दोरे श्रद्धेचा भाग असू शकतील, असा ढोंगी बचावसुद्धा करण्यास मंडळी तयारच असतात. मात्र देवळांमध्ये दिले अथवा विकले जाणारे गंडे अन्य रंगांचे असतील तर ते घालू नका, असे या शाळाच सांगत असल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने तिरुनेलवेली जिल्ह्यात पोहोचून, संबंधितांशी बोलून दिले आहे. जातिभेदाची हिंसक आणि अत्याचारी उदाहरणे अन्यत्र अनेक असताना हे सारे सौम्यच वाटेल, परंतु शालेय वयापासून जातीची जाणीव रुजवली जाते आहे आणि हे प्रकार १९९० च्या दशकापासून वाढू लागले आहेत, हे निरीक्षण अस्वस्थ करणारे ठरावे. याच दशकात ‘मंडल’वाद राजकारणातही फोफावू लागला हे खरे. परंतु जातिभेद अधिकच रुजतील असे मार्ग आपणही वापरणे हे त्यावरील उत्तर नव्हे. ‘शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा त्याच्या कौटुंबिक स्थितीनुसार निरनिराळ्या असू शकतात’ असे मोघम आणि वरवर साळसूद कारणही यासाठी दिले जाईल. याआधी गुजरातमध्ये उघडकीस आलेला, हिंदू आणि मुस्लीम विद्यार्थ्यांना निरनिराळ्या रंगांचे गणवेश देण्याचा प्रकार अशाच साळसूद कारणांखाली आरंभला गेला होता. तिरुनेलवेली जिल्ह्यात दलित मुलांसाठी निराळ्या शाळा निघाल्या आहेत आणि तेथे गंडय़ादोऱ्यांची कोणतीही सक्ती केली जात नाही, हे जातिभेदमुक्तीचे लक्षण मानायचे का? किंवा केंद्रात नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूत जयललिता यांची सत्ता येण्यापूर्वीच हे सुरू झाले, अशा युक्तिवादाने भेद संपतील का? जर्मनीत नाझीवाद रुजू लागला होता, तेव्हा ज्यूंना त्यांच्या अंगरख्यांवर ‘डेव्हिडची चांदणी’ लावण्याची सक्ती करण्यात आली होती. इतिहासाची पुनरावृत्ती ‘आपोआप’ नव्हे तर त्यापासून धडे न शिकल्यामुळे होते, हे लक्षात ठेवून तामिळनाडूतील मनगटगंडे आणि डेव्हिडची चांदणी यांचे वर्तमानातील साम्य ओळखायला हवे.