पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागला असतानाच कर्नाटकच्या पाच मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहेत. काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीने पाचपैकी चार जागा जिंकल्याने भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजपचा निभाव लागत नाही हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील गोंदिया-भंडारा व आता कर्नाटकातील पाच मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले. गेल्या मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजपने औट घटकेचे सरकार स्थापले, पण न्यायालयाच्या दणक्यानंतर ते गडगडले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता काँग्रेसने कमी जागा मिळालेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार, सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू आदी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली व तेव्हापासून महाआघाडीची कल्पना पुढे आली. कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दुसरीकडे भाजप टपून बसलेला आहे. त्यातच मंत्रिमंडळातील समावेशावरून काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू झाल्याने सरकार केव्हाही पडेल, असे चित्र भाजपच्या गोटातून रंगविण्यात येते; पण आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून लोकसभेच्या तीन, तर विधानसभेच्या चार जागांसाठी (दोन जागांसाठी आधी पोटनिवडणूक झाली) झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाने भाजपची डाळ शिजू दिलेली नाही. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सात महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच लोकसभेच्या तीन जागांकरिता पोटनिवडणूक घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कर्नाटकातील सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. मात्र पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर, लोकसभेपूर्वी रंगीत तालीम म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. भाजपने सारी ताकद पणाला लावूनही पदरी अपयश आले. बल्लारी हा मतदारसंघ खाणसम्राट रेड्डी बंधूंमुळे देशभर वादग्रस्त. १९९९च्या निवडणुकीत तेव्हा राजकारणात नव्यानेच प्रवेश केलेल्या तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांच्यात बल्लारीमध्ये चुरशीची लढत झाली; त्यात सोनियांनी बाजी मारली होती. मात्र २००४ पासून रेड्डी बंधूंचे, पर्यायाने भाजपचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. काँग्रेस उमेदवाराने सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने बल्लारीत विजय संपादन केला आहे. मंडया हा धर्मनिरपेक्ष जनता दलाचा पारंपरिक मतदारसंघ व तो मतदारसंघ देवेगौडा यांच्या पक्षाने कायम राखला. दक्षिण कर्नाटकात विस्तारण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना धक्का बसला. शिमोगा हा भाजप नेते येडियुरप्पा यांचा पारंपरिक मतदारसंघ. येडियुरप्पा यांच्या मुलाने विजय संपादन केला असला तरी ५० हजारांच्याच मताधिक्याने भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. विधानसभेच्या दोन मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी आणि काँग्रेसने विजय संपादन केला. रंगीत तालमीचा सामना काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाने ४-१ अशा फरकाने जिंकला आहे. पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे कुमारस्वामी सरकारवरील अस्थिरता सध्या तरी दूर झाली आहे. कर्नाटकातील लोकसभेच्या २८ पैकी १७ जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलात योग्य समन्वय साधला गेल्यास येथे भाजपला २०१४च्या यशाची पुनरावृत्ती करणे कठीण जाईल. समविचारी पक्षांची मोट बांधली गेल्यास भाजपपुढे देशभर आव्हान असेल, हाच पोटनिवडणुकांचा संदेश आहे. यामुळेच समविचारी पक्ष एकत्र येऊ नयेत किंवा त्यांच्यात फूट कशी पडेल या दृष्टीने भाजपकडून प्रयत्न केले जातील. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना यश मिळाल्यास महाआघाडी आकारास येण्याचा मार्ग मोकळा होईल आणि भाजपला ते परवडणारे नाही.