ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील जुने जाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्राचे राजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्यांपैकी विखे-पाटील एक होते. बाळासाहेबांचे वडील पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना नगर जिल्ह्य़ात केली होती. डाव्या विचारसरणीचा पगडा असलेल्या नगर जिल्ह्य़ात सहकारी चळवळ रुजवण्यात पुढे बाळासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजाविली व वडिलांचा सहकारातील वारसा पुढे नेला. सहकार, शिक्षण, पाणी या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केले. सहकार आणि पाण्याच्या क्षेत्रात विविध नवीन प्रयोग  केले.

पाण्याच्या नियोजनात सरकार कसे चुकते, हे राज्यात काँग्रेसचे सरकार असूनही ते आपली भूमिका सडेतोडपणे मांडीत. आधुनिक विचारसरणी आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर त्यांचा भर असायचा. त्यांच्यामुळेच प्रवरानगर, लोणी परिसराचा कायापालट झाला. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण व पुढे शरद पवार यांचा एक गट तर विरोधी दुसरा गट कायम कार्यरत राहिला. बाळासाहेब विखे-पाटील कायमच पवारविरोधी नेते म्हणून ओळखले गेले. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विरोधी गटाचे शंकरराव चव्हाण यांची साथ त्यांनी सोडली नाही. आपले विचार आणि भूमिका ते सडेतोडपणे मांडत. यामुळेच काँग्रेसच्या नेतृत्वाची खप्पामर्जी त्यांना सहन करावी लागली. विचारमंच किंवा फोरमच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर टीकाटिप्पणी केली होती. राजीव गांधी यांना केलेल्या विरोधामुळेच १९९१ मध्ये काँग्रेसने त्यांना खासदारकीची उमेदवारी नाकारली होती. शरद पवार यांच्या राजकारणाला बाळासाहेबांनी नेहमीच पराकोटीचा विरोध केला. १९९९ मध्ये शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा करीत काँग्रेसला रामराम करीत वेगळी चूल मांडली. पण त्या आधी जवळपास एक वर्ष पवार काँग्रेसमधून बाहेर पडतील, असे भाकीत बाळासाहेबांनी केले होते, पण तेव्हा कोणी ते गांभीर्याने घेतले नव्हते. १९९१ मध्ये यशवंतराव गडाख विरुद्ध विखे-पाटील खटल्यात शरद पवार यांच्यावर अपात्रतेचे बालंट आले होते. कारण उच्च न्यायालयाने निवडणुकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका पवारांवर ठेवला होता. विखे-पाटील यांनी पवार व गडाख यांच्या विरोधात सारे पुरावे न्यायालयाला सादर केले होते. सर्वोच्च न्यायालयात निभावले. यशंवतराव चव्हाण किंवा पवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना दिल्लीतील नेतृत्वाकडून मानाचे स्थान मिळाले. पण बाळासाहेब त्याला अपवाद ठरले. कारण काँग्रेसने सत्तेत त्यांना कधीच संधी दिली नाही. बाळासाहेबांची इच्छा असूनही मुख्यमंत्रिपदाकरिता त्यांच्या नावाचा कधीही विचार झाला नाही. राज्यात शिवसेना-भाजपचा जोर वाढल्यावर बाळासाहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना केंद्रात मंत्रिपदासाठी संधी दिली. नगर जिल्ह्य़ातील राजकारणाचा बाजच वेगळा. सर्व दिग्गज नेत्यांशी दोन हात करीत विखे-पाटील यांनी संघर्ष केला. वजाबाकीच्या राजकारणात त्यांचे तेवढेच नुकसानही झाले. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्याने नगर मतदारसंघातून लढण्याची त्यांची इच्छा होती. पण शरद पवारांनी जुने उट्टे काढले. तेव्हापासून निवडणुकीच्या राजकारणात विखे मागे पडले. पवार आणि विखे-पाटील यांच्यातील वादाची परंपरा पुढील पिढीतही कायम आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आणि अजित पवार परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या सहकार क्षेत्राची वाटचाल खडतर मार्गाने होत आहे. अशा वेळी सहकाराला गतवैभव प्राप्त करून देणे हीच विखे-पाटील यांना आदरांजली ठरेल.