पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या सौहार्दपूर्ण पत्राची चर्चा सध्या सुरू आहे. पण खरे तर या पत्रापेक्षाही महत्त्वाची आणि मोठी बातमी गेल्या आठवड्यात पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी केलेल्या भाषणाची होती. पाकिस्तानात राजकीय निर्वाचित राष्ट्रप्रमुखापेक्षा लष्करप्रमुखच अधिक शक्तिशाली असतो हे सर्वज्ञात आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी यापूर्वीही अनेकदा भारतीय पंतप्रधानांच्या दोस्तीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. परंतु लष्करी नेतृत्वाला ही दोस्ती मान्य नसेल, तर अशा चर्चांना, संवादप्रक्रियांना काहीही अर्थ उरत नाही. बऱ्याचदा त्या अयशस्वी ठराव्यात यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय ही त्यांची गुप्तहेर संघटना यांनी भारतात विध्वंसक घातपात घडवून आणलेला आहे. या पार्श्वभूमीवर जनरल बाजवा यांचे वक्तव्य, तसेच अलीकडच्या काही घडामोडींकडे पाहावे लागेल. गेल्या महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांच्या लष्करांतर्फे शस्त्रसंधी घोषित झाला होता. २००३ मधील शस्त्रसंधीच्या वेळी निश्चित झालेली स्थिती पुनस्र्थापित करण्याचे त्यात ठरले. त्याच वेळी खरे तर दोन्ही देशांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी उच्च पातळीवरून हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट झाले होते. बाजवा यांचे भाषण यानंतरचे. इस्लामाबादमध्ये एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी ‘भूतकाळाला मूठमाती देण्या’ची भाषा केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दोन देशांच्या सततच्या कलहामुळे दक्षिण आशियात चिरंतन गरिबी साचल्याचे सांगितले. दक्षिण आशिया आणि मध्य आशिया यांदरम्यान व्यापाराचा मार्ग खुला झाल्यास ती समृद्धीची नांदी ठरेल; पण तिला आपण सततच्या संघर्षाच्या दावणीला बांधू शकत नाही, असेही ते म्हणतात. ‘पाकिस्तान दिना’निमित्त २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेल्या शुभेच्छापत्राला इम्रान खान यांनी दिलेली सप्रेम पोचपावती ही घडामोड अलीकडची. बुधवारीच पाकिस्तानच्या आर्थिक परिषदेने भारतातून सूत, साखर आणि कापसाच्या आयातीला मंजुरी दिली आहे. या घटनांची संगती लावल्यास काही बाबी स्पष्ट होतात. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा बहाल करावा ही मागणी अलीकडे पाकिस्तानकडून फार रेटली जात नाही हेही लक्षणीय. ती त्यांनी सोडून दिली आहे असे नव्हे. पण त्या एका अटीवर अडून राहण्याची पाकिस्तानची सवय सुटलेली दिसते. ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ हा चीनचा महत्त्वाकांक्षी मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून, पाकिस्तानमार्गे मध्य आशियाकडे जातो. त्या मार्गाचा लाभ किती मिळाला किंवा मिळाला नाही याचा हिशेबच अजून पाकिस्तानमध्ये मांडला जात आहे! मध्य आशिया आणि दक्षिण आशिया यांच्यात निरंकुश व्यापार सुरू झाला, तर तो अधिक फायदेशीर ठरेल असे आता बाजवा म्हणू लागले आहेत. या सगळ्याच्या मुळाशी पाकिस्तानची आर्थिक अगतिकता आहे. चीनसारख्या देशाशी घनिष्ठ वगैरे मैत्री असली, तरी तिची किंमत चुकवावी लागते हे पाकिस्तानच्या ध्यानी येऊ लागले असावे. अर्थात, पाकिस्तानची अगतिकता हा आपला विजय ठरू शकत नाही. अस्थिर, अस्वस्थ शेजारी आणि सुस्थिर, सुजाण शेजारी यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी म्यानमार आणि बांगलादेशाची उदाहरणे पुरेशी आहेत. पाकिस्तानशी खुंटलेले व्यापारी संबंध पूर्वपदावर येणे आपल्याही फायद्याचे आहे. हे व्यापारी संबंध पुढे मध्य आशियातून येणाऱ्या एखाद्या तेलवाहिनी किंवा वायूवाहिनीपर्यंत पुढे सरकू शकतात. संघर्षाचा कैफ अल्पकालीन असतो. त्याच्या झळा आणि चटके अनंतकालीन असतात. करोनामुळे जगभरातील बहुतेक अर्थव्यवस्था अगतिक झाल्या आहेत. पाकिस्तानच्या मुळातच खिळखिळ्या अर्थव्यवस्थेला तर त्याने मुळासकट उखडून टाकले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक शहाणपण राष्ट्राभिमानापेक्षा वरचढ ठरते, हेच पाकिस्तानचे बदलते रंग दाखवून देतात.