07 August 2020

News Flash

कोविडमुक्तीची चाहूल?

मुंबईत देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक रुग्ण आढळू लागले आणि मृत्यूदरही सुरुवातीला अधिक होता.

मुंबईतील काही झोपडवस्त्या व बिगरझोपडवस्ती भागांत नुकत्याच घेण्यात आलेल्या रक्तद्रव्य प्रतिपिंड पाहणीचा (सेरॉलॉजिकल अँटीबॉडीज सव्‍‌र्हे) अहवाल मंगळवारी रात्री प्रसृत झाला असून, त्यांतील निष्कर्ष आशादायी आहेत. ढोबळ मानाने या निष्कर्षांबाबत असे म्हणता येईल की,  मुंबईतील अनेक भागांत समूह प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागली आहे. कोविडविरोधी लढाईचा अपेक्षित अंत अद्याप दृष्टिपथात आलेला नसला, तरी अशा प्रकारचे निष्कर्ष या लढय़ातील योद्धय़ांना तसेच सर्वसामान्यांनाही बळ देणारे ठरतात. या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे अथक कर्मचारी, त्यांचे कष्ट व झोपडवस्त्यांतील नागरिकांची सहकार्यशीलता आणि समज यांचा उल्लेख आवर्जून करावाच लागेल. ही महासाथ आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट आणि रूपरेषा सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर ठरते. पण तिच्या  अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी सेवक व नागरिकांचीही असते. मुंबईत देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक रुग्ण आढळू लागले आणि मृत्यूदरही सुरुवातीला अधिक होता. पण या आकडय़ांमुळे कर्तव्यबधिर न होता महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी कामाला लागले. बाधितांवर उपचार व समुपदेशनाबरोबरच संसर्ग पसरू नये यासाठी अलगीकरण, विलगीकरण, सातत्याने तपासण्या आणि चाचण्या अशा अनेक मोहिमांवर हे कर्मचारी राबले. याची मोठी किंमत महापालिकेलाही मोजावी लागली. उपायुक्त, सहायक आयुक्तांसारखे वरिष्ठ, तसेच कित्येक कर्मचारी प्राणास मुकले. सहसा अशा सर्वेक्षणांत कळीचा मुद्दा असतो, नमुन्यांच्या संख्येचा. त्या आघाडीवर प्रस्तुत सर्वेक्षण शंकातीत ठरते. एकंदर ६९३६ नमुने गोळा केले गेले. हा आकडा निष्कर्षांसाठी पुरेसा प्रातिनिधिक आहे. दहिसर, चेंबूर, शीव, माटुंगा येथून हे नमुने गोळा झाले. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात झोपडवस्ती आणि बिगर-झोपडवस्ती क्षेत्रांतून प्रत्येकी चार-साडेचार हजार नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. झोपडवस्तीमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला, पण बिगर-झोपडवस्तीमध्ये नागरिकांचे पुरेसे सहकार्य मिळाले नाही हे दखलपात्र आहे. कोविड-१९चा प्रसार वेगाने होऊ लागल्यावर, ‘आमच्यामुळे नव्हे त्यांच्यामुळे’ तो पसरत असल्याचे साक्षात्कार अनेकांना सुरुवातीपासूनच होऊ लागले होते. कालांतराने असे समज अनाठायीच नव्हे, तर खोडसाळही ठरले. मुंबईचे सेरो सर्वेक्षण अशाच समजुतींना पुरून उरणारे. सुस्थिर आणि सुशिक्षित वस्त्यांमधून सहकार्य कमीच मिळाले हे भूषणास्पद नाही. असो. आणखी एक निष्कर्ष लक्षणीय आहे. तो म्हणजे, महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रतिपिंडे निर्माण झालेली आढळून आली. म्हणजे महिलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक झाल्याचे सिद्ध होते. या सर्वेक्षणाचे एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे, ६९३६पैकी कोणीही नित्याच्या आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोविड अस्तित्वाची तपासणी केलेली नाही. म्हणजे हे सर्वजण लक्षणाविना बाधित किंवा सौम्य लक्षणधारी होते. याचा अर्थ इतक्या मोठय़ा प्रमाणात लक्षणाविना बाधित लोक समाजात वावरत आहेत. याचा एक अर्थ म्हणजे साथ मोठय़ा प्रमाणात – टाळेबंदीचे कठोर उपाय योजूनही – पसरली आहे; परंतु ज्या दिवशी हे सर्वेक्षण प्रसृत झाले, त्या दिवशी मुंबईतील बाधितांची गेल्या १०० दिवसांतली नीचांकी संख्याही नोंदवली गेली. हा विरोधाभास खरा; पण यातून आशादायी बाब अशी की, संसर्गाचा सामना करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांमध्ये प्रतिपिंडे निर्माण होत आहेत. हा प्रवास निसंशय सामूहिक प्रतिकारशक्तीकडे सुरू आहे. अशा प्रकारचे सेरो सर्वेक्षण नवी दिल्लीतही झाले, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ते होऊ घातले आहे. चाचण्यांमुळे बाधितांची ज्ञात संख्या वाढते, प्रत्यक्षात संसर्ग त्यापेक्षा कितीतरी अधिक झालेला आहे हा एक भाग. परंतु पूर्वीसारखा हा विषाणू विक्राळ पद्धतीने संहार करत नाही याची जाणीव या सर्वेक्षणातून होते, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:55 am

Web Title: coronavirus mumbai slum population developed antibodies zws 70
Next Stories
1 एक पाऊल पुढे, दोन मागे..?
2 औद्योगिक शहाणिवेची गरज
3 करोनाग्रस्त शिक्षण
Just Now!
X