१९५९ नंतर प्रथमच क्युबाच्या प्रमुख शासकपदावर कॅस्ट्रोंव्यतिरिक्त एखादी व्यक्ती विराजमान होत आहे. क्युबाच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव राउल कॅस्ट्रो यांनी पदत्यागाची घोषणा केली आहे. क्युबाच्या अध्यक्षपदावरून ते २०१८ मध्येच दूर झाले होते. तरीही कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव या नात्याने तेच देशाचे सर्वेसर्वा होते. त्यांचा हा निर्णय काहीसा अपेक्षित असला, तरी ऐतिहासिक नक्कीच. क्युबावासीयांच्या तीन पिढय़ांना कॅस्ट्रो बंधूंव्यतिरिक्त (खरे तर प्रामुख्याने थोरले बंधू फिडेल कॅस्ट्रोच) इतर कोणाला सत्ताधीशपदी पाहण्याची सवय नव्हती. ही म्हटले तर एकाधिकारशाही आणि घराणेशाहीदेखील. १९५९ मध्ये लष्करशहा फुलगेन्सियो बाटिस्टा यांची लष्करशाही उलथवून फिडेल कॅस्ट्रो सत्तेवर आले. ते लोकप्रिय भले असतील, पण लोकशाहीवादी नव्हते. त्यामुळे लष्करशाही गेली, तरी क्रांतीच्या मुखवटय़ाआड पुन्हा लष्करशाहीच आली! भौगोलिकदृष्टय़ा अमेरिकेच्या अतिसमीप राहिल्याने आणि तरीही भांडवलशाहीचा जाहीर दुस्वास करून सोव्हिएत महासंघाशी वैचारिक आणि पुढे सामरिक बांधिलकी मान्य केल्यामुळे क्युबाचा संदर्भ नेहमीच शीतयुद्धाच्या चर्चेमध्ये येत राहिला. खुद्द अमेरिकेच्या सर्वपक्षीय अध्यक्षांनीही सोव्हिएत महासंघाला धडा शिकवण्यासाठी क्युबा, तसेच दक्षिण अमेरिकेतील बहुतेक सर्व कम्युनिस्ट वा डाव्या विचारसरणीच्या सरकारांना संपवण्यात वा अस्थिर ठेवण्यात आयुष्याची इतिश्री मानली. या सगळ्या जगड्व्याळात ‘अमेरिकेच्या नाकावर टिच्चून’ उभे राहिले ते फिडेल कॅस्ट्रोच. त्यांच्या बरोबरीने पण त्यांच्या इतके प्रकाशात अजिबात न राहता, पडद्यामागे राहून सारे काही निगुतीने सांभाळणारे त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो हेही क्युबन सत्तावर्तुळातलेच. थोरले कॅस्ट्रो म्हणजे या क्युबन क्रांतीचा चेहरा होता, ज्याने युरोप, आफ्रिका, आशियापर्यंत बहुतांना भुरळ पाडली. फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे घनिष्ठ सहकारी व अर्जेटाइन क्रांतिवीर अर्नेस्टो ‘चे’ गवेरा यांनी गारूड केले नाही अशी माणसे त्या वेळच्या पिढीत सापडणे विरळाच. पण क्रांती आणि राष्ट्रगाडा या वेगळ्या गोष्टी आहेत. राउल कॅस्ट्रो आणि त्यांच्यासारख्या अनेक सहकाऱ्यांनी फिडेल यांच्या पायाभरणीवर क्युबा नावाचे राष्ट्र प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत चालवले हे नक्कीच दखलपात्र.

दुसऱ्या महायुद्धानंतर आणि विशेषत: १९५०च्या दशकात अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाला आव्हान देणारा गट सोव्हिएत महासंघाने उभा केला. पण त्या आव्हानाचे पडसाद क्युबासारख्या चिमुकल्या देशाच्या नेतृत्वमुखातून उमटणे अमेरिकेसारख्या एककल्ली वर्चस्ववादी देशाला कधीही रुचले नाही. ‘बे ऑफ पिग्ज’मधून क्युबन असंतुष्टांना कॅस्ट्रोंवर चाल करण्यासाठी पाठवणे, सीआयए या अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून कॅस्ट्रो यांचा काटा काढण्यासाठी सतत प्रयत्न करणे, क्युबा सोडून अमेरिकेच्या आश्रयाला येणाऱ्यांना त्वरित नागरिकत्व देणे आदी उपाय करूनही कॅस्ट्रो नामक अवघड जागीचे गळू न फुटता ठणकत राहिले. पण अमेरिकेला चिथावण्याच्या नादात आपला वापर करून घेतला जातो याची कॅस्ट्रो बंधूंनी कधी फिकीर केली नाही. सोव्हिएत रशियाचे वैचारिक, सामरिक आणि आर्थिक अघोषित मांडलिकत्व कॅस्ट्रोंच्या क्युबाने स्वीकारले ही त्या नेतृत्वाची घोडचूक ठरली. कारण सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर क्युबाचा हा तोरा पूर्णपणे फिका पडला. इराकमधील दोन युद्धे आणि ९/११ नंतर अमेरिकेचे लक्ष दुसरीकडे वळते ना, तर कदाचित क्युबाला धडा शिकवण्याची अमेरिकेची ऐतिहासिक आकांक्षा फलद्रूप होती. पण अमेरिकेला हा विषय प्राधान्याने मार्गी लावावा असे नवीन सहस्रकात कधी वाटलेच नाही.

राउल कॅस्ट्रो यांना कधी काळी क्युबाचे डेंग ज्यावफंग बनायचे होते. त्यांनी काही प्रमाणात अर्थव्यवस्था खुली करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोजके अपवाद वगळता क्युबाची अर्थव्यवस्था बंदिस्त आणि त्यामुळे घुसमटलेलीच राहिली. समाजवादी मूल्यांच्या प्रामाणिक अंगीकारामुळे अमलात आलेली परवडण्याजोगी आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था या जमेच्या बाजू वगळल्यास क्युबामध्ये सरकार आणि नागरिक यांच्यासमोर अनंत आर्थिक विवंचना आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने लादलेले निर्बंध आणि पाठोपाठ करोनाचा उद्रेक या दुहेरी आघातांमुळे क्युबन अर्थव्यवस्था अधिकच खिळखिळी झालेली आहे. आर्थिक सुधारणांसाठी राजकीय सुधारणा घडून याव्या लागतात, असे म्हटले जाते. पण राउल कॅस्ट्रो हे सत्तेवरून दूर होत असले, तरी ती क्युबातील राजकीय सुधारणांची (उदा. बहुपक्षीय राजकीय व्यवस्था, निवडणुका वगैरे) नांदी ठरण्याची शक्यता जवळपास शून्य. कारण त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष मिग्युएल दियाझ कानेल यांची क्युबन राजकारणावर राउल यांच्याइतकी पकड नाही. शिवाय खुद्द राउल यांचे पुत्र अलेहांद्रो कॅस्ट्रो एस्पिन आणि जामात लुइस अल्बेर्तो रॉड्रिगेज यांचे सरकारमधील स्थान भक्कम आहे. त्यामुळे कॅस्ट्रोंच्या पलीकडे पाहण्याची संधी क्युबन नागरिकांना खरोखर मिळेल का, हा प्रश्न उरतोच.