आधी म. द. पाध्ये, मग के. रं. शिरवाडकर आणि आता गंगाधर पानतावणे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हे तीन माजी प्राध्यापक गेल्या दहा दिवसांत गेले. हे तिघेही मूळचे मराठवाडय़ातील नव्हते, पण त्यांनी मराठवाडा हीच कर्मभूमी मानली. पानतावणे नागपूर विद्यापीठातून एमएची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर म. ना. वानखेडे, म. भि. चिटणीस आदींच्या आग्रहामुळे ६०च्या दशकात औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आले. काही महिन्यांतच छावणी भागातील त्यांचे घर दलित साहित्यिक व कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले. त्या काळी औरंगाबादेतून मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ हे एकमेव वाङ्मयीन नियतकालिक प्रसिद्ध होते. सुरुवातीच्या काळात पानतावणे यांच्या कविता प्रतिष्ठानमधूनच प्रसिद्ध झाल्या. साठोत्तरी काळात दलित साहित्यिक मोठय़ा संख्येने लेखन करू लागल्याने त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून पानतावणे यांनी १९६७ साली ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक सुरू केले. आर्थिक अडचणी होत्याच, पण पानतावणे यांच्या स्वागतशील व मनमोकळ्या स्वभावामुळे ‘अस्मितादर्श’ हे दलित साहित्यासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू बनले. गेल्या पन्नास वर्षांत मराठी भाषेत दलित साहित्य रुजविण्याचे महत्त्वाचे आणि तितकेच ऐतिहासिक काम पानतावणे यांनी केले हे मान्य करावे लागेल. ‘अस्मितादर्श’मधून दलित साहित्य प्रसिद्ध करतानाच याला पूरक ठरेल असेही साहित्य त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. यात उल्लेखनीय आहे ती डॉ. जनार्दन वाघमारे यांची ‘अमेरिकन निग्रोंचे साहित्य आणि संस्कृती’ तसेच प्र. रा. देशमुख यांची ‘सिंधु संस्कृती’वरील लेखमाला! ‘अस्मितादर्श’साठी नवनवीन लेखकांचा शोध घेणे हे कामही पानतावणे अव्याहतपणे करत असत. नागनाथ कोत्तापल्ले, योगीराज वाघमारे, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, प्र. ई.ोोनकांबळे, फ. मुं. शिंदे, रविचंद्र हडसनकर, हृषीकेश कांबळे ते नागराज मंजुळे, वीरा राठोड.. असे किती तरी साहित्यिक त्यांनी ‘अस्मितादर्श’मधून घडवले. दलित, भटके विमुक्त, आदिवासी आणि परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्यांना त्यांनी ‘अस्मितादर्श’ हे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. याला जोडूनच मग अस्मितादर्श साहित्यमेळावे भरवणे त्यांनी सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा सर्वप्रथम शोध घेण्याचा प्रयत्न पानतावणे यांनी केला. डॉ. आंबेडकरपूर्व दलित लढय़ांचा इतिहास शोधून काढण्याचे कामही त्यांनी केले असून या दृष्टीने त्यांचा ‘वादळांचे वंशज’ हा ग्रंथ अभ्यासकांसाठी बहुमोल समजला जातो. ते नामांतरवादी होते, पण बंडखोरी वा विद्रोह त्यांना मान्य नव्हता. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात ते जात असत. त्यामुळे समरसता तसेच समंजसपणाकडे त्यांचा कल असे. त्यामुळेच ते नामांतरवादी असले तरी कुसुमाग्रज, पुलं, नरहर कुरुंदकर, रा. ग. जाधव, भालचंद्र फडके, प्रधान मास्तर, दि. के. बेडेकर यांसारख्या वेगळ्या विचारांची बांधिलकी मानणाऱ्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. ‘सत्ता, अधिकार, पदे यांना मी पादत्राणांप्रमाणे घराबाहेर ठेवतो,’ असे ते नेहमी म्हणत. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा ते या फंदात पडले नाहीत वा पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले तरी हुरळून गेले नाहीत. मधु मंगेश कर्णिक, यू. म. पठाण, ना. धों. महानोर यांसारख्यांच्या तुलनेत त्यांना पद्मश्री किताब तसा उशिराच मिळाला. यंदा तो जाहीर झाला, पण तो स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.