News Flash

काँग्रेसमधील निर्नायकी

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला गेला आहे

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्य़ातून काँग्रेस पक्ष अद्यापही सावरलेला नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मनोदय व्यक्त केला असला तरी ते पदावर कायम राहणार की नाही याबाबत गेले १५ दिवस स्पष्टता आलेली नाही. पक्षात एकूणच निर्नायकी अवस्था तयार झाली आहे. दिल्लीत हा गोंधळ सुरू असताना विविध राज्यांमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या जोरात सुरू आहेत. पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पक्षांतर्गत वाद वाढत चालले आहेत.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट यांच्या समर्थकांनी आघाडीच उघडली आहे. कर्नाटकातील सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे एकूणच चित्र दिसते. कारण दररोज एखादा आमदार पक्षाच्या विरोधात बोलतो किंवा भूमिका घेतो. तेलंगणातील काँग्रेसच्या १२ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीत प्रवेश केला. विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना हरयाणात माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. महाराष्ट्रातही पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवणार की नवा अध्यक्ष नेमणार याबाबत स्पष्टता नाही. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांनी काही धडा घेतलेला दिसत नाही. अजूनही परस्परांचे पंख कापण्याचे उद्योग सुरूच आहेत. पंजाबमधील ताज्या राजकीय घडामोडींनंतर दिल्लीतील नेत्यांना फार काही किंमत देत नाही हे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र धुव्वा उडाला असताना केरळ आणि पंजाब या दोनच राज्यांनी पक्षाला साथ दिली. पंजाबमध्ये १३ पैकी आठ जागा जिंकून अमरिंदरसिंग यांनी पक्षाला तुलनेत चांगले यश मिळवून दिले. अमरिंदरसिंग यांच्या डोक्यावर नवज्योतसिंग सिद्धू सारखा सुमार दर्जाचा नेता पक्षाने आणून बसविला. छोटय़ा पडद्यावरील सुमार कार्यक्रमात मोठमोठय़ाने हसणाऱ्या सिद्धू यांना राजकारणाविषयी कधीच गांभीर्य नव्हते. ‘मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना मी मानत नाही, माझे नेते राहुल गांधी आहेत’, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला नाही या कारणावरून अमरिंदरसिंग यांनी सिद्धूंना त्यांची जागा दाखवून दिली. नगरविकास, पर्यटन, सांस्कृतिक अशी महत्त्वाची खाती काढून ऊर्जा हे खाते सिद्धू यांच्याकडे सोपविण्यात आले. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कागाळ्या करणाऱ्या किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला नवी दिल्लीतील दरबारी राजकारण्यांकडून ताकद दिली जात असे. मुख्यमंत्री विरुद्ध अन्य नेते यांना आपापसात झुंजविले जाई. आपले कोणी वाकडे करणार नाही, अशा आविर्भावात वावरणाऱ्या सिद्धू यांना अमरिंदरसिंग यांनी धडा शिकविला. आता नव्या खात्याचा पदभार स्वीकारण्यास नकार देत सिद्धू यांनी दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे. काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये किंवा अगदी छोटय़ा संस्थांमध्ये गटबाजी उफाळून येते. प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा असते. पण पक्षशिस्तही तेवढीच महत्त्वाची असते. आजच्या घडीला देशातील निम्म्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पण कुठेही पक्षांतर्गत गटबाजी, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी आव्हान दिले असे चित्र बघायला मिळत नाही. राज्यात एकनाथ खडसे यांनी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असता, खडसे यांची आज काय गत झाली याचे उदाहरण समोर आहे. भाजपमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी डोळे वटारल्यावर सारे चिडीचूप होतात. भाजपमध्ये नेतृत्व बदलाची मागणी करण्याची आमदारांची हिंमत होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा ही जोडगोळी ठरवेल ती पूर्व दिशा असते. काँग्रेसमध्ये नेमके त्याच्या विरुद्ध असते.

राजस्थानमध्ये सचिन पायलट हे पाच वर्षे पक्ष उभारण्यासाठी झटले. पण मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा दोनदा मुख्यमंत्रिपद भूषवूनही पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरलेले अशोक गेहलोत यांनी दबाव आणताच राहुल गांधी नरमले. जनाधार असलेल्या नेत्याचे पंख कापायचे, त्याला मोठे होऊ द्यायचे नाही हे उद्योग वर्षांनुवर्षे पक्षात सुरू आहेत. त्याचे परिणाम आता काँग्रेसला भोगावे लागत आहेत. राज्याराज्यांमध्ये काँग्रेसची पीछेहाट होत आहे. यातून काँग्रेस सावरणार का, हाच खरा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 12:03 am

Web Title: dispute in congress party
Next Stories
1 गुणवंतांचा गुंता!
2 फायदा विखेंचा की भाजपचा?
3 मेट्रोच्या जिवावर ‘आप’ उदार..
Just Now!
X