अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कल्पनेतली अमेरिका ही केवळ गोऱ्या, अँग्लो-सॅक्सनांची अमेरिका आहे. गौरेतरांकडे आणि त्यातही हिस्पॅनिक म्हणजे प्रामुख्याने मेक्सिकोतून आलेल्या स्पॅनिश भाषक स्थलांतरितांकडे संशयाने, तुच्छतेने पाहणे हा या गौर अँग्लो-सॅक्सनवादी नेत्यांचा आवडता उद्योग. त्यातूनच निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी अमेरिकी समाजात फोफावलेल्या नशेबाजीबद्दल मेक्सिकनांना जबाबदार धरून, त्यांच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्याची टाळीबाज घोषणा केली होती. अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यान असलेल्या सीमेवर भिंत उभारून, ‘गुन्हेगारी वृत्तीच्या अमली पदार्थ तस्करांपासून’ अमेरिकेला मुक्ती देण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच मग अमेरिकेतील शाळा, रुग्णालये, कार्यालये तुडुंब भरणार नाहीत आणि त्यांचा लाभ खऱ्याखुऱ्या अमेरिकनांना घेता येईल, असेही ट्रम्प सांगतात. ही भिंत उभारण्यासाठी झटपट निधी गोळा करता यावा यासाठी ट्रम्प यांनी परवा शुक्रवारी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार अमेरिकी अध्यक्षांना १९७६ मध्ये अमेरिकी संसदेने संमत केलेल्या खास कायद्यान्वये बहाल करण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी असाधारण परिस्थिती किंवा कारण आवश्यक असते. ट्रम्प यांनीच आणीबाणी जाहीर करताना सांगितले, की असे करण्यासाठी फारशी गरज नाही. पण आपण केवळ भिंत झटपट उभी राहावी यासाठी असे करत आहोत! म्हणजे अमेरिकी अध्यक्षांनी आणीबाणीसारखा असाधारण निर्णय, एकीकडे प्रतिनिधिगृहातील बहुतेक सदस्यांचा विरोध असताना आणि दुसरीकडे तसे करण्याची फारशी गरज नसताना जाहीर केलेला आहे.

अमेरिका-मेक्सिको सीमेवरून आजही बेकायदा घुसखोरी होतच आहे. मात्र हे प्रमाण खूपच घटलेले आहे. एका आकडेवारीनुसार, सन २००० मध्ये मेक्सिकोतून अमेरिकेत बेकायदा घुसणाऱ्यांचे प्रमाण १६ लाख इतके होते. २०१७ मध्ये हे प्रमाण ४ लाखांपेक्षा खाली आलेले आहे. या घुसखोरांपैकी बहुतेक अमेरिकेत आश्रय घेऊ इच्छिणारी कुटुंबे आहेत. यात भर पडली आहे अनाथ मुलांची. या लहान मुलांना अमेरिकेत ‘धाडले’ जाते नि मग ताबा घेण्याच्या निमित्ताने त्यांचे आई-वडीलही अमेरिकेत दाखल होतात, हा ट्रम्प यांचा आणखी एक आक्षेप. परंतु ट्रम्प म्हणतात तसे हे गुन्हेगार नाहीत. अमेरिकेत काही राज्यांमध्ये अमली पदार्थाना कायदेशीर मान्यता देण्यात येत आहे. कारण अमेरिकी समाजातून या व्यसनाचे उच्चाटन होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. या व्यसनाला मेक्सिको, कोलंबियासारख्या देशातले ड्रग-माफिया खतपाणी घालतात, असा एक सोयीस्कर गैरसमज अमेरिकी समाजात पसरवण्यात ट्रम्प प्रभृती आघाडीवर असतात. विशेष म्हणजे आता, अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी मुक्रर केलेला निधीच मेक्सिको भिंतीच्या उभारणीसाठी वळवला जाणार आहे. ट्रम्प यांच्यासारखे नेते एखादे धोरण फसले किंवा अयशस्वी ठरले की त्याबद्दल विशिष्ट घटकाला जबाबदार धरून, अकारण भलत्याच ठिकाणी जालीम उपाय शोधू पाहतात. यातून मूळ समस्येवरून लक्ष वळवणे इतकाच हेतू असतो.

ट्रम्प यांची आणीबाणी कायदेशीर कसोटीवर कितपत टिकेल, याविषयी मंथन सुरू झाले आहे. अमेरिकी संसदेने एखाद्या प्रकल्पाला निधी देण्याचे नाकारल्यानंतरही तो प्रकल्प रेटण्यासाठी आणीबाणीचा आधार घेणारे ट्रम्प बहुधा पहिलेच अध्यक्ष असावेत. १९७६ मध्ये आणीबाणीविषयक कायदा संमत झाल्यानंतर (अध्यक्षांच्या आणीबाणी अधिकारांविषयी अमेरिकी राज्यघटनेत उल्लेख नाही. भारतीय राज्यघटनेत त्याविषयी सविस्तर विवेचन आहे.) आजवर ५८ वेळा ती जाहीर केली गेली. त्यांपैकी ३१ अजूनही जारी आहेत आणि वेळोवेळी त्यांचे नूतनीकरण होते. अशा प्रकारच्या आणीबाणीसाठी दोन मुद्दे निर्णायक असतात- लष्करी बांधकाम प्रकल्प आणि स्वसंरक्षणासाठी अत्यावश्यक मोहीम. ट्रम्प यांच्या कल्पनेतली भिंत यांतली कोणती अट पूर्ण करते, हे अमेरिकेतील न्यायालयांना ठरवावे लागेल. या आघाडीवर आपली बाजू लंगडी आहे, असा इशारा विधि खात्याने ट्रम्प यांना यापूर्वीच दिला आहे. या निर्णयाविरोधात विविध न्यायालयांमध्ये खासगी याचिका दाखल होण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. या भिंतीसाठी इतर मार्गानी  निधी आणण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. पण तरी ट्रम्प यांच्या मार्गात घटनात्मक आणि कायदेशीर अडचणी आहेत. या निर्णयासाठी आवश्यक राजकीय मतैक्य किंवा जनमत जमवण्यात ट्रम्प पूर्णतया अपयशी ठरले आहेत. तरीही निव्वळ पोकळ बाणा दाखवून आणीबाणी रेटण्याचा हा निर्णय ट्रम्प यांच्यावर उलटू शकतो.