अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात रविवारी दोन्ही कोरियांदरम्यानच्या निर्लष्करी भागात झालेल्या भेटीमध्ये प्रतीकात्मकता ओतप्रोत भरलेली आहे. निर्लष्करी भागात आणि मग उत्तर कोरियाच्या भूमीवर पाऊल ठेवणारे ट्रम्प पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले. या भेटीची कोणतीही राजनैतिक तयारी झालेली नव्हती, कारण ओसाकामध्ये जी-२० देशांच्या परिषदेनंतर ट्रम्प दक्षिण कोरियाला जाणार होते आणि तेथून निर्लष्करी भागाला भेट देणार होते. ओसाकातील हॉटेल रूममधून ट्रम्प यांनी किम जोग उन यांच्या भेटीबाबत ट्विटरद्वारे केलेल्या अनौपचारिक विचारणेला उत्तर कोरियाकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. ट्रम्प-उन भेटीला अशी काहीशी नाटय़मय पाश्र्वभूमीही होती. परंतु अण्वस्त्रनिर्मूलनासाठीच्या मुत्सद्देगिरीसाठी निव्वळ नाटय़मयता आणि प्रतीकात्मकता पुरेशी ठरत नाही. त्यापलीकडे अनेक बाबींचा विचार केला जातो. इतक्या महत्त्वाच्या मुद्दय़ावरील वाटाघाटी सुरू राहणे ही काही महिन्यांची प्रक्रिया असते. तरीही तिच्या यशस्वितेची शाश्वती देता येत नाही. ट्रम्प-उन यांच्यातील ही वर्षभरातील तिसरी भेट होती. सिंगापूर आणि हनोई (व्हिएतनाम) येथे झालेल्या भेटीही कमी नाटय़मय नव्हत्या. पण या भेटींचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तर ट्रम्प यांना देता आलेले नाही आणि उन यांच्याकडून ते मिळण्याची अपेक्षाही नाही. काही वर्षे वाटाघाटी करून साधलेला इराण अण्वस्त्रनियंत्रण करार ट्रम्प यांनी एकतर्फी उधळून लावला. ती जमलेली घडी विस्कटल्यानंतर आता ट्रम्प कोरियन द्वीपकल्पात ‘शाश्वत शांतता’ नांदावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतात. परवाच्या किंवा त्याआधीच्या भेटींमध्येही किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाकडील अण्वस्त्रे कमी किंवा टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून उन उद्या व्हाइट हाऊसलाही भेट देतील. या दोघांमध्ये आणखीही भेटी होत राहतील. परंतु या भेटींचे फलित काय, हा प्रश्न उपस्थित होणारच. माध्यमांनी असे प्रश्न विचारलेले ट्रम्पसाहेबांना फारसे रुचत नाहीत. त्यांच्या मते, किम जोंग उन यांच्याबरोबर होत असलेल्या ऐतिहासिक भेटीगाठींचे कौतुकच अमेरिकी माध्यमांना नाही! भेटी, चर्चा आणि संवाद यांचे द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये काही एक महत्त्व निश्चितच असते. ट्रम्प यांनी उन यांच्याविषयी किंवा उत्तर कोरियाविषयी ‘पाश्चिमात्य आकस’ न बाळगता त्यांच्याबरोबर पुन:पुन्हा भेटीची तयारी दाखवली हे कौतुकास्पद आहेच. परंतु अशा भेटींतून उत्तर कोरिया खरोखरच गांभीर्याने वाटाघाटी करू लागला आहे का, अण्वस्त्रे कमी करण्याबाबत त्यांनी कागदोपत्री तरी एखादा कार्यक्रम सादर केला आहे का, किंवा एकुणात उत्तर कोरियाकडील अनियंत्रित आणि अनियमित अण्वस्त्रे नष्ट होऊन जग अधिक सुरक्षित बनेल का, या विविध प्रश्नांची सकारात्मक आणि आश्वासक उत्तरे अद्यापही सापडत नाहीत. इराणप्रमाणेच उत्तर कोरियावरही आर्थिक, व्यापारी, लष्करी र्निबध आहेत. ते र्निबध शिथिल करण्याबाबत अमेरिकेकडून कोणतेही आश्वासन हनोई भेटीत मिळवले नाही या कारणास्तव किम जोंग उन यांनी त्यांच्या काही सल्लागारांची आणि मुत्सद्दय़ांची हकालपट्टी केली होती. याचा अर्थ, त्यांना स्वत: कोणतेही आश्वासन न देता प्रथम काही र्निबध शिथिल व्हायला हवे आहेत. तसे एकतर्फी आश्वासन तर ट्रम्पही देऊ शकत नाहीत. ही परिस्थिती उन यांच्या प्रस्तावित व्हाइट हाऊस भेटीतूनही बदलेल असे वाटत नाही. तेव्हा भेटीगाठींमधील प्रतीकात्मकतेच्या लोलकापलीकडे पाहून वाटाघाटींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज या दोन्ही देशांना आहे.