‘‘अमेरिकेचे दरवाजे मुस्लिमांसाठी पूर्णत: बंद करावेत. केवळ निर्वासितच नाही, तर मुस्लीम पर्यटकांनाही अमेरिकेत प्रवेशबंदी करावी’’ हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान समाजमाध्यमांत येणाऱ्या अशा प्रकारच्या मतांसारखेच मूर्खपणाचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचे कारण हे ट्रम्प महाशय म्हणजे कोणी निरुद्योगी वा भयगंडग्रस्त नेटकर नाहीत. ते अमेरिकेतील एक अब्जाधीश उद्योजक, गुंतवणूकदार आहेत. एनबीसी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांचा ‘अ‍ॅप्रेंटिस’ हा कार्यक्रम भलताच लोकप्रिय होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता ते अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील आहेत. रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी ते आटापिटा करीत आहेत. याहून अधिक दखलपात्र बाब म्हणजे ते जी वादग्रस्त विधाने करीत आहेत त्यांना अमेरिकी समाजातून पाठिंबाही मिळत आहे. सर्वच समाजांत अतिरेकी अथवा कट्टरतावादी विचार करणारे नेहमीच असतात. एरवी ही मंडळी हिवाळ्यातल्या बेडकांसारखी शीतसमाधीमध्ये असतात. ट्रम्प यांच्यासारख्या कोणाची विचारधग लागताच ती जमिनीवरउडय़ा मारू लागतात. अमेरिकेतील अशी मंडळी सध्या ट्रम्प यांच्याभोवती गोळा झाली आहे. त्या समाजाने आजवर प्रयत्नपूर्वक जपलेल्या वैचारिक खुलेपणापुढे त्यांचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचा मुकाबला अमेरिका कशा प्रकारे करते हे लवकरच, रिपब्लिकन पक्षातील उमेदवारीच्या प्राथमिक फेरीच्या निकालातून दिसेल. ट्रम्प यांचे विधान हे पॅरिस हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून आले असल्याचे अनेकांचे मत आहे. ते खरेच आहे, पण पॅरिस हल्ला किंवा तत्पूर्वीचे शार्ली एब्दो प्रकरण किंवा अलीकडचा अमेरिकेतील जिहादी हल्ला ही अशा वक्तव्यांमागची तात्कालिक कारणे आहेत. मूळ दुखणे अन्य समाज, धर्म, वंश, जात यांबाबत मनामनांतील भय आणि द्वेषाचा गंड हे आहे. यापासून कोणताही समाज वा धर्म वा वंश सुटलेला नाही हेही खरेच. ‘मुस्लिमांकडून होणारे दहशतवादी हल्ले हे त्यांचे न्यायासाठीचे लढे आहेत,’ असे कोणी मानत असेल तर तो नक्कीच मूर्खाच्या नंदनवनात राहात आहे हे नक्की. मुस्लिमांतील धार्मिक दहशतवादाचे कमालीचे भेसूर रूप पाहून विविध देशांतील अन्य समाजच नव्हे, तर इस्लाममधील अनेक मध्यममार्गी लोकही भयकंपित होत आहेत. त्याचा फायदा त्या त्या समाजातील डोनाल्ड ट्रम्प उठवत असतात. आपण करतो ते आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी योग्य तेच करतो असे त्यांना खरोखरच वाटत असते. ते चूक आहे हे दाखवून देणे ही विचारी समाजाची जबाबदारी आहे. जर्मनीमध्ये एके काळी हिटलरने अशाच प्रकारे ज्यूंना लक्ष्य बनविले होते. त्यांना जगण्याचीच बंदी घालण्यात आली होती. त्याच जर्मनीत गतवर्षी तशाच प्रकारे मुस्लीमविरोधी मोर्चा काढण्यात आला होता, पण त्यानंतर काही दिवसांतच तेथील सर्वच धर्माच्या नागरिकांनी त्या मोर्चाविरोधात मोर्चा काढून आम्हांस हिटलरयुगात पुन्हा परतायचे नाही, हा संदेश दिला होता. आजही जर्मनीतील किमान सहा प्रांतांमध्ये पेजीडा नामक मुस्लीमविरोधी गट कार्यरत आहेत. नवनाझींचा त्यांना पाठिंबा आहे, पण जर्मनीतील बहुसंख्य जनता त्यांच्या विरोधात आहे. हेच चित्र अमेरिकेतही दिसते आहे. ट्रम्प यांच्या विधानाचा मोठय़ा प्रमाणावर निषेध होत आहे. भय आणि द्वेषाची ट्रम्पेट कितीही जोरात वाजताना दिसली, तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा आवाज त्या खुल्या समाजात आजही कायम आहे हेच त्यातून दिसत आहे. या आवाजाला अधिक बळ देण्याची जबाबदारी सर्वच धर्म-पंथ-वंश यांची आहे – त्यात अर्थातच मुस्लीम आलेच.