18 February 2019

News Flash

आत्मस्तुती आख्यान

१७९० पासून प्रत्येक अध्यक्षाने राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याची ही रूढी अबाधित आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकी संघराज्याची सद्य:स्थिती सांगणारे – स्टेट ऑफ द युनियन – भाषण हे एक तास २० मिनिटांचे स्वस्तुती आख्यान म्हणून यापुढे ओळखले जाईल. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या शब्दांत सांगायचे, तर ते भाषण तंतोतंत ट्रम्प यांच्यासारखेच होते.. स्वत:वर खूश असणारे, स्वत:चेच कौतुक करणारे, कृत्रिम आणि सहानुभूतीचा अभाव असलेले. तरीही राष्ट्राध्यक्षांचे हे भाषण महत्त्वाचे आहे. एकतर ती सुमारे सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. १७९० पासून प्रत्येक अध्यक्षाने राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याची ही रूढी अबाधित आहे. त्यातून लोकांना आणि अर्थातच जगातील अन्य देशांना अमेरिकी प्रशासनाच्या दिशेचा अंदाज येतो. त्यादृष्टीनेही हे भाषण महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच मंगळवारी रात्री ट्रम्प यांनी दिलेल्या त्यांच्या पहिल्या संघराज्य सद्य:स्थिती भाषणाचा अन्वयार्थ समजून घेणे आवश्यक आहे. या भाषणाची अधिकृत विषयवस्तू होती – ‘सुरक्षित, सामथ्र्यशाली आणि अभिमानी अमेरिका’. ट्रम्प यांच्या आजवरच्या भाषणांतील धूसर घोषणाबाजीला शोभेशी अशीच ती होती. ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांचे वैशिष्टय़ हे की घोषणा हेच सत्य आहे हे पटवून देण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. या भाषणात त्यांनी ते पणाला लावल्याचे दिसले. अमेरिकी स्वप्नात राहण्यासाठी आजच्या एवढा चांगला काळ यापूर्वी कधीच आला नव्हता, असे एक विधान त्यांनी केले. याचा अर्थ असा, की ते सत्तेवर येण्यापूर्वी अमेरिका हा एक नरक होता. अमेरिकेबद्दल अभिमान वाटावा असे काही उरलेले नव्हते. ट्रम्प सत्तेवर आले आणि हे सगळे बदलले. ट्रम्प सांगतात, त्यांनी नवीन २४ लाख नोकऱ्यांची निर्मिती केली. आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांतील बेरोजगारीचे प्रमाण आज सर्वाधिक कमी आहे. अमेरिकी इतिहासात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आम्ही करकपात केली. या अशा वाक्यांना भरपूर टाळ्या मिळाल्या. परंतु हे दावे एकतर अर्धसत्य होते किंवा असत्य. नोकऱ्या निर्माण झाल्या हे खरे. परंतु त्यात ट्रम्प यांच्या धोरणांचा वाटा किती? तेथे २०१० पासून रोजगारवृद्धीचा दर चढताच होता. परंतु असे दावे लोकांना तत्क्षणी खूश करतात. त्यांच्या या भाषणात नेहमीप्रमाणेच नवराष्ट्रवाद, अमेरिकी स्वदेशीवाद यांचे संहत मिश्रण होतेच. या नवराष्ट्रवादाला आणि स्वदेशीवादाला नेहमीच एका शत्रूची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी तो स्थलांतरितांमध्ये शोधला. या भाषणाचा बराचसा भाग स्थलांतरित आणि त्यांच्याविषयीची धोरणे यांवर टीका करणारा होता. ट्रम्प यांनी या विषयाला दिलेला वेळ पाहता, त्यांना खरोखरच देशाची एकता साधायची आहे का, हा प्रश्न निर्माण व्हायला हवा. परंतु ट्रम्प यांच्या भाषणातील नाटय़मयता, त्यांच्यातील ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा आत्मविश्वास आणि आपणच देशनियंते असे स्वत:चेच ढोल आणि ताशे वाजवणे याचा परिणाम सामान्य नागरिकांवर पडतोच. तरीही ट्रम्प यांच्यावर खूश असणारांचे प्रमाण या वेळी घटल्याचे सीएनएनचे सर्वेक्षण सांगते. ही आश्चर्याची बाब. या भाषणातून ट्रम्प यांनी अण्वस्त्रे ‘अपग्रेड’ करण्याची आवश्यकता व्यक्त केलेली आहे. स्वदेशीच वापरा, स्वदेशवासीयांनाच नोकऱ्या द्या अशी हाक दिलेली आहे. हे मुद्देही लक्षणीय आहेत. अमेरिका कोणत्या दिशेने चालली आहे ते यातून दिसते. ही दिशा नक्कीच आश्वासक नाही, पण ती स्वमग्न अमेरिकनांना मोहविणारी नक्कीच आहे. ट्रम्प यांच्या या आत्मस्तुती आख्यानाची निर्मिती कोणती असेल तर हा मोहच.

First Published on February 1, 2018 1:40 am

Web Title: donald trump speech in state of the union