17 December 2017

News Flash

चिंताजनक हुच्चपणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणावर केवळ दोनच प्रकारच्या

लोकसत्ता टीम | Updated: September 21, 2017 3:07 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणावर केवळ दोनच प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया, ते भाषण सुरू असतानाच इस्रायलच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर उमटली होती. ती अर्थातच समाधानाची, आनंदाची होती. अमेरिकेतील उजव्यांची ती प्रातिनिधिक भावना आहे. दुसरी प्रतिक्रिया ही अर्थातच याच्या विरोधी आहे. त्याची कारणे विविध आहेत. संयुक्त राष्ट्रांतील त्या हिरव्या संगमरवरी व्यासपीठाची, त्याची म्हणून एक खास प्रतिष्ठा असते. तेथून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलणार म्हटल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांच्याकडून तशा परिपक्वतेची अपेक्षा होती. त्या भाषणातून ट्रम्प हे दहशतवादापासून त्याच्याइतक्याच महत्त्वाच्या जागतिक तापमानवाढीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आपले धोरणात्मक विचार मांडतील असे सर्वसाधारण सभेला वाटले होते; परंतु अमेरिकेतील एका राजकीय भाष्यकाराच्या शब्दांत सांगायचे, तर ‘संयुक्त राष्ट्रांना प्रतीक्षा होती ती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची. पण तेथे आले ते उमेदवार ट्रम्प.’ आपण आता निवडणूक जिंकलेलो आहोत. तेव्हा प्रचारसभांसारखी भाषणे बंद करावीत, विरोधी नेत्यांना काही तरी नावे ठेवून जीभ दाखविणे बंद करावे, घोषणाबाजी थांबवावी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रौढ विचार मांडावा हे ट्रम्प यांच्या गावीही नसावे. त्यामुळे त्यांचे हे भाषणही तसेच प्रचारी झाले. ज्यांनी ते पाहिले, त्यांच्या हे लक्षात आले असेल, की काही ठिकाणी तर ट्रम्प असे काही विराम घेत होते, की जणू त्यांना टाळ्या आणि चीत्कारांचीच अपेक्षा होती. संयुक्त राष्ट्रांत अर्थातच या टाळ्या-चीत्कारजनक भाषणांना महत्त्व नसते. तशा भाषणांनी आपले स्वदेशी अनुयायी खूश होतात. त्यांच्या छात्या अभिमानाने फुलून येतात, हे खरे. ट्रम्प यांनाही तेच हवे होते असे वाटावे इतके हे भाषण प्रचारी ढंगाचे होते. एका आत्ममग्न अमेरिकेचे चित्रच त्यातून स्पष्ट झाले. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी जॉर्ज डब्लू बुश यांनी सैतानी अक्षाची कल्पना मांडली होती. ते सैतानी देश होते- इराक, इराण आणि उत्तर कोरिया. त्यातील इराक आज विकलांग आहे. इराकवरील आक्रमणाच्या वेळी बुश यांनी त्याला दहशतवादविरोधी लढाईचे स्वरूप दिले होते आणि जे आमच्याबरोबर नाहीत ते विरोधात आहेत असा पेच जगासमोर टाकला होता. ट्रम्प यांची धावही त्यापुढे गेलेली नाही. त्यांच्या सैतानी अक्षामध्ये इराण आणि उत्तर कोरिया कायम आहेतच. इराकची जागा व्हेनेझ्युएलाने घेतली आहे. उत्तर कोरियाला तर त्यांनी, ‘वाटे जाल तर वाट लावू’ अशा प्रकारची धमकीच दिली आहे. त्या देशाच्या नेत्याचा उल्लेख हल्ली ते ‘रॉकेट मॅन’ असा करतात. हे एखाद्या सामान्य जल्पकाला शोभावे. महासत्तेच्या नेत्याला अशी चिडवाचिडवी करणे हे अशोभननीयच. तो ‘रॉकेट मॅन’ सध्या आत्मघातकीपणा करीत आहे व त्यात त्या देशाचे नुकसान आहे, असे ट्रम्प यांचे मापन आहे. त्यावर उपाय काय? तर उत्तर कोरिया बेचिराख करणे? हेच इराकमध्ये घडले आहे. त्याचे परिणाम जग आजही भोगत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून ट्रम्प आता इराण अणुकरार रद्द करण्याचे इशारे देत आहेत. या सगळ्याच्या मागे पुन्हा साधू विरुद्ध सैतान अशी ‘बायनरी’ निर्माण करणारा बुशीझम आहेच. टीका होत आहे ती यावर. आणि त्या टीकेमागे आहे ती आक्रस्ताळेपणा, घोषणाबाजी, अतिरेकी राष्ट्रवाद हे सगळे घटक एका महासत्तेच्या धोरणाचा भाग बनत आहेत ही चिंता. आंतरराष्ट्रीय समुदायाने काळजी करावी असाच हा अवघा हुच्चपणा आहे.

First Published on September 21, 2017 3:07 am

Web Title: donald trump speech in un