News Flash

धडा शिकणार कधी?

नक्षल्यांचे सर्वात शक्तिशाली प्रभावक्षेत्र अशी बस्तरची ओळख आहे. येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे मोठे आव्हान असते.

(संग्रहित छायाचित्र)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला विकास माध्यमांना दाखवण्याच्या घाईत मानक कार्यपद्धतीकडे झालेले दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय सुरक्षा दलांना मंगळवारी छत्तीसगडमध्ये आला. यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनला प्राण गमवावे लागले. केवळ दैव बलवत्तर म्हणून सहकारी पत्रकार बचावला. नक्षल्यांचे सर्वात शक्तिशाली प्रभावक्षेत्र अशी बस्तरची ओळख आहे. येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे मोठे आव्हान असते. अलीकडच्या दोन वर्षांत नक्षलींची हिंसा कमी झाल्याने सरकारी यंत्रणेने यंदा दुर्गम भागात मतदान केंद्रे थाटण्याचा निर्णय घेतला. ती दाखवण्यासाठी नेण्यात येणाऱ्या माध्यम पथकालाच लक्ष्य करून नक्षलींनी सुरक्षा व्यवस्थेत वावरणारे सारेच चळवळीचे शत्रू असा संदेशच सर्वाना दिला आहे. दंतेवाडा जिल्हय़ातील पालनारच्या परिसरात निलावया या गावात २० वर्षांनंतर प्रथमच थाटलेल्या या केंद्राला गेल्या तीन दिवसांपासून अनेक पत्रकार सुरक्षा व्यवस्थेत भेट देत होते. माध्यमांना रोज एकाच मार्गावरून नेण्याची सुरक्षा दलाची चूक नक्षल्यांनी बरोबर हेरली व या निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लावले. गेल्या दोन वर्षांत नक्षलींचा हिंसाचार कमी झाला याचा अर्थ त्यांची ताकद कमी झाली असे होत नाही, हा धडासुद्धा या ताज्या हिंसाचाराने राज्यकर्त्यांना मिळाला आहे. गृहखात्याच्या ताज्या अहवालात या चळवळीचे कार्यक्षेत्र कमी झाले असले तरी त्यांची हिंसा घडवण्याची क्षमता प्रचंड आहे, असा स्पष्ट उल्लेख आहे. तरीही घटत्या हिंसाचाराला सरकारच्या यशस्वी कामगिरीशी जोडण्याची चूक अनेक राज्ये करीत आहेत. अशा वेळी  घडवून आणलेला हिंसाचार या राज्यांना तोंडघशी पाडतो हे गेल्या आठवडय़ातील घटनांनी दाखवून दिले. मुळात विकास झाला तरच ही चळवळ संपेल हा दावा अर्धसत्य आहे. या विकासाचे स्वरूप सर्वाना सामावून घेणारे असेल व जेव्हा जनतेचा विश्वास सरकारवर वाढेल तेव्हाच या चळवळीची घसरण सुरू होईल हे सत्य आहे. सरकारी यंत्रणांना अजून हे उमगलेले दिसत नाही. रस्ता झाला, त्यामुळे मतदान केंद्र सुरू झाले म्हणून तेथील जनता खूश असा निष्कर्ष काढणे किती दूधखुळेपणाचे आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे. चार दिवसांपूर्वी याच राज्यात बिजापूर जिल्ह्य़ात अशाच हल्ल्यात चार जवान शहीद झाले. कच्च्या रस्त्यावरून शोधमोहीम राबवताना वाहन वापरण्याचा निर्णयसुद्धा सुरक्षा दलांच्या अंगाशी आला. मानक कार्यपद्धतीच्या पालनावर या दलाकडून वारंवार होणाऱ्या चुका हा चिंतेचा विषय असला तरी वरिष्ठ पातळीवर त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे दुर्दैवी आहे. गेली चार दशके सुरक्षा दलांकडून नक्षली बीमोडासाठी मोहिमा आखल्या जात आहेत, पण अजूनही या दलात व्यावसायिक अंगभूतपणा भिनलेला नाही हेच दाखवून देणाऱ्या या घटना आहेत. गेल्या दशकभराचा काळ लक्षात घेतला तर स्थानिक जनता नक्षलींच्या हिंसाचाराला कंटाळली आहे हे दिसते, पण याचा अर्थ त्यांचा सरकारी यंत्रणांवर विश्वास वाढला असा काढणे आजही धाडसाचे ठरते. याच काळात नक्षलींच्या स्थानिक समर्थकांची संख्या कमी झाली असली तरी ते अपुऱ्या मनुष्यबळावर हिंसा घडवून आणत सरकारला जेरीस आणू शकतात, हे या घटनांमधून दिसून आले आहे. निवडणुकीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा दुर्गम भागात प्रवेश करते व नक्षली याच संधीची वाट पाहात असतात. त्यामुळे या काळात हिंसाचार वाढतो. अशा वेळी योग्य ती खबरदारी घेणे सुरक्षा दलांची जबाबदारी असते. ती न घेतल्याने आठ जणांना जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या चुकांमधूनही धडा न शिकणे, याचा हा परिपाक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:47 am

Web Title: doordarshan cameraman and two security personnel lost their lives in the attack by naxals in dantewadas aranpur 2
Next Stories
1 घरे लाटणाऱ्यांना लगाम
2 ब्राझीलचा स्वयंगोल?
3 आरोग्याची कागदी लढाई
Just Now!
X