X

कोंडीतून सुटका नाहीच?

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी होते. खड्डे त्याला जबाबदार आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई पट्टय़ात सध्या वाहतूक कोंडीने टोक गाठले आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने निव्वळ मनस्तापच नव्हे, तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्याने येणाऱ्या नैराश्यातून ताण किंवा श्वासोच्छ्वासाचे आजार वाढू लागल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. मुंबई, ठाण्यात शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो, महिलावर्गाचेही हाल होतात.  तरीही वाहतूक कोंडीच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यातल्या त्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी किमान पावले तरी उचलली आहेत. मुंब्रा बाह्य़ वळण रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेले तीन महिने ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागतो. त्यातच वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो रेल्वेच्या कामासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले. घोडबंदर मार्ग व मुलुंड चेकनाक्यावर पत्रे लावून एक मार्गिका बंद करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, मुंब्रा बाह्य़ वळण रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रोच्या कामाला परवानगी नाही, असे ठाणे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले. हा निर्णय स्वागतार्ह आहे. अर्थात, मेट्रोचे काम करणारे ठेकेदार वाहतूक पोलिसांना किती दाद देतात हे बघावे लागेल. कारण मुंबईत न्यायालयाने निर्बंध आणले तरी शासकीय यंत्रणा आणि ठेकेदार मनमानी करतात, असा अनुभव आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी होते. खड्डे त्याला जबाबदार आहेत. पण गेली दोन-तीन वर्षे मुंबईत मेट्रोच्या कामासाठी रस्ते खणल्याने आणखीच कोंडी होते. एकाच वेळी किती रस्ते वाहतुकीला बंद करायचे याचे नियोजन करावे लागते. पण मंत्रालयात बसलेले राज्यकर्ते वा मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे नियोजनकार यांना मुंबईकरांशी काही देणेघेणे दिसत नाही हाच अनुभव येतो. कारण पश्चिम द्रुतगती मार्गावर तसेच शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू असून, महत्त्वाचे रस्ते पूर्णत: किंवा अंशत: वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन शहरात आपल्यासारखीच वाहतूक समस्या आहे. सध्या तेथेही शहरात भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. पण हे काम करताना वाहतुकीला कोठेही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेऊन काम केले जाते. राज्यात मेट्रोचे जाळे वाढल्याबद्दल राज्यकर्ते स्वत:ची पाठ थोपटून घेतील, पण नागरिकांना किती त्रास होतो याचा विचार केला जात नाही. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीचा किती त्रास होतो हे या भागातील नागरिकांनी तब्बल पाच वर्षे उड्डाण पुलांची कामे सुरू असताना अनुभवले होते. आता जरा कोठे दिलासा मिळाला तोच मेट्रोसाठी पुन्हा वाहतूक कोंडीचे संकट उभे ठाकले आहे. सरकारी यंत्रणा नागरिकांचा विचार करते की नाही, असाच प्रश्न पडतो. पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगोवच्या प्रदर्शन केंद्राबाहेर वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी होते, असे आढळून आले. मग मुंबईचे वाहतूक पोलीस करतात काय? वाहतूक कोंडी होत असल्यास तेथे वाहने उभी राहणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. मुलुंड, ऐरोली, वाशी, दहिसर येथे टोल नाक्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तर काहीच उपाय दिसत नाही. कारण टोल ठेकेदार आणि शासकीय यंत्रणा यांच्या ‘अर्थाअर्थी’ संबंधांमुळे वाहन चालकांना सारे निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही. टोल वसुलीचे काम ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील रस्ते विकास मंडळाकडे आहे. विरोधी बाकांवर असताना टोल वसुलीच्या विरोधात ओरड करणाऱ्या शिंदे यांना आता टोल नाक्यांवर होणारी गर्दी दिसत नाही का? कठोर उपाय योजल्याशिवाय वाहतूक कोंडीवर उपाय निघणार नाही. नेमकी ही इच्छाशक्ती सरकारकडे दिसत नाही.