News Flash

पॅलेस्टिनी संघर्षाला पूर्णविराम? 

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील कायमस्वरूपी शांततेसाठी ते अनिवार्य आहे.

पॅलेस्टाइनमध्ये दूतावाससदृश कार्यालय उभारणे आणि जवळपास चार कोटी डॉलरची नव्याने मदत तेथील प्रशासनाकडे सुपूर्द करणे अशी सकारात्मक पावले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने टाकली आहेत, त्यांचे स्वागत. अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी इस्राायल, पॅलेस्टाइन दौऱ्यात काही वाटाघाटी केल्या. इस्राायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधीतून काही तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा त्यांचा उद्देश होता. ही शिष्टाई अल्पावधीत यशस्वी होण्याची कोणतीही शक्यता वा अपेक्षा नाही. इस्राायल-पॅलेस्टाइन वादाला आता हमासचा तिसरा कोन मिळाल्यामुळे हा संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे. गाझा पट्टीत पॅलेस्टाइनच्या प्रशासनाला हमास जुमानत नाही. गाझा पट्टीवर हमासचेच नियंत्रण आहे. हमास ही दहशतवादी संघटना असली, तरी क्षेत्रीय, धार्मिक आणि राजकीय वादांवर तोडगा काढण्याप्रति इस्राायलची – आणि विशेषत: बेन्यामिन नेतान्याहू यांच्या आधिपत्याखालील इस्राायलची – इच्छाशक्ती आणि हेतू शुद्ध नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. ताज्या संघर्षात हमासकडून अग्निबाणांचा वर्षाव झाल्यामुळे प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडून हल्ले झाले, असे त्यांचे समर्थन केले जाते. स्वसंरक्षण हा कोणत्याही देशाचा सार्वभौम हक्क असला, तरी गाझा पट्टी, तसेच पश्चिम किनारपट्टीवरील पॅलेस्टाइनच्या हद्दीत इस्रायली वसाहती उभारल्यामुळे कटुता वाढते, हे इस्रायलनेही कबूल केले पाहिजे. या कटुतेचा गैरफायदा हमासकडून घेतला जातो आणि इराण व कतार या देशांकडून त्या आगीत तेल ओतण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते हेही लपून राहिलेले नाही. इस्रायल, हमास, इराण, कतार, काही प्रमाणात पॅलेस्टाइनची वास्तव शासक फताह संघटना यांच्या एकत्रित उडाणटप्पूपणाला वेसण घालणे हे अत्यंत व्यामिश्र आव्हान. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील कायमस्वरूपी शांततेसाठी ते अनिवार्य आहे. परंतु अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांचे पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प हेही उडाणटप्पूपणात कोणालाच हार जाणारे नसल्यामुळे हा प्रश्न अनुत्तरित, अनिर्णितच नव्हे, तर उग्र बनला. ती कसर जो बायडेन भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ब्लिंकेन शिष्टाई हा याच प्रयत्नांचा भाग आहे. आपण गाझातील पॅलेस्टिनींना मदत करू, पण ती मदत हमासपर्यंत पोहोचणार नाही याविषयी दक्ष राहू असे ब्लिंकेन यांनी सांगितले. त्याची गरज होती. कारण पॅलेस्टिनींवर अन्याय होतो ही बाब खरी असली, तरी पॅलेस्टिनींचा मक्ता हमाससारख्या संघटनेने घेतल्यास या संपूर्ण प्रश्नालाच वेगळे आणि धोकादायक वळण मिळते. इस्राायलने पूर्व जेरुसलेमवर एकतर्फी दावा सांगणे हे जितके आक्षेपार्ह ठरते, तितकेच हमाससारख्या संघटनांची मदत घेणे पॅलेस्टाइनसाठी आक्षेपार्ह ठरते. ११ दिवसांच्या संघर्षात २५०हून अधिक जीवितहानी झाली, ज्यात गाझातील पॅलेस्टिनी मृतांची संख्या अधिक आहे. उद्ध्वस्त पॅलेस्टिनी घरांसमोर खेळणारी निरागस मुले, काही जखमी झालेली मुले, ईद साजरी करण्यापासून परावृत्त झालेली जखमी, जर्जर कुटुंबे अशी दृश्ये प्रसृत करणे हा हल्ली हमासच्या प्रचाराचा भाग मानला जातो. तसा तो भासू नये यासाठी हमासपासून पूर्ण व जाहीर फारकत घेण्याची जबाबदारी पॅलेस्टिनी प्रशासन आणि नागरिकांची आहे. यासाठी इस्रायलवर अग्निबाण सोडणे प्रथम बंद झाले पाहिजे. हमासला शस्त्रपुरवठा व आर्थिक मदत करणे इराण आणि कतारने थांबवले पाहिजे. हे होते, तरच इस्रायलला खलनायक ठरवण्याचा व काहीएक उत्तरदायित्व निश्चित करण्याचा मार्ग सुकर बनेल. अन्यथा अग्निबाण आणि उद्ध्वस्त घरे यांमध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचा तोडगाही पूर्णतया गाडला जाईल. तसेच व्हावे, असे वाटणाऱ्यांची संख्या दोन्ही बाजूंना थोडकी नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:05 am

Web Title: end to the palestinian conflict akp 94
Next Stories
1 पद आणि पायंडा
2 कोण होतास तू..
3 ‘कनवाळू’ नीतीला चाप
Just Now!
X