देशातील विद्यार्थी आपापल्या विषयात ज्ञानसंपन्न असावेत, त्यांना अन्य विषयांतही रुची आणि गती असावी, त्यांच्यात विविध कौशल्ये असावीत.. असे विद्यार्थीच राष्ट्रनिर्मितीच्या कामात योगदान देऊ शकतात. हा आदर्शवाद समोर ठेवून, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच्या गणिती पद्धतीच्या अभ्यासक्रमाला आता कलाभ्यासाचीही जोड देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला असून, त्याचे स्वागत करायला हवे. या निर्णयानुसार देशपातळीवर अभियांत्रिकीसाठी एकच अभ्यासक्रम असेल आणि त्यात कला, साहित्य, योग, तसेच खेळ या विषयांचाही समावेश असेल. या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय महत्त्वाचेच असतात. या नव्या आराखडय़ात त्यांचे ते महत्त्व अबाधितच ठेवण्यात आले आहे. परंतु उत्तम, सुसंस्कृत आयुष्य जगण्यासाठी कला, साहित्य, खेळ या गोष्टीही तेवढय़ाच महत्त्वाच्या असतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी नोकरी/व्यवसायलक्ष्यी अभ्यासक्रमांत या विषयांना आजवर दुय्यम म्हणूनच पाहिले जाई. हळूहळू त्यातही बदल होत चालला आहे. बारावीला अभियांत्रिकी वा वैद्यकीय या शाखांकडे जाण्याइतके गुण मिळविलेले विद्यार्थीही कलाशाखेकडे अभिमानाने वळताना गेल्या काही वर्षांत दिसत आहेत. हल्ली तर अभियांत्रिकी महाविद्यालयांना मुलेच मिळत नाहीत, परिणामी अनेक महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहतात असे चित्र दिसू लागले आहे. ते का होत आहे याची कारणे वेगळी आहेत. ती बाजारप्रणीत अर्थकारणात शोधावी लागतील. शिवाय हा प्रवाह कायमस्वरूपी असाच राहील असेही म्हणता येणार नाही. परंतु त्यातून कलाशाखेला, मानव्यविद्येला आलेले महत्त्व मात्र नक्कीच अधोरेखित होत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही आता त्यातील काही विषय आकळून घेता येतील. हे त्यांच्यादृष्टीने अंतिमत फायद्याचेच असेल. आणि हा लाभ केवळ श्रेयांकाबाबतचाच नसेल हे नक्की. यातून विद्यार्थ्यांमधील एकारलेपणा कमी होण्यास साह्यच होईल. हे सर्व हेतू पाहता या निर्णयास स्वागतार्हच म्हणावे लागेल. परंतु आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेचा वा खरेतर अशा सर्वच गोष्टींचा विचार करताना केवळ हेतूंकडे पाहून चालत नसते. हेतू चांगले असूनही केवळ अंमलबजावणीच्या पातळीवर हजारो निर्णयांचा फज्जा उडाल्याचे या देशाने पाहिलेले आहे. त्यामुळेच या निर्णयानंतर आज शिक्षणक्षेत्रातील अनेकांच्या मनात, हे सर्व ठीक, पण मूळ अभियांत्रिकी शिक्षणाचे काय असा प्रश्न उमटत आहे. या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत हे आजचे दुखणे खरे. पण जे आहेत त्यांना शिकविण्यासाठी सुयोग्य शिक्षकही मिळत नाहीत. या महाविद्यालयांची तपासणी करण्याचे अधिकार ज्या एआयसीटीईकडे आहेत, त्यांच्याकडेही त्याकरिता पुरेसे मनुष्यबळ नाही. हे वास्तव आहे. ते बदलण्यासाठी ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या धर्तीवर एखादी ‘शैक्षणिक अभियांत्रिकी’ योजना सरकारकडे आहे का याचा तपास करायला जावे तर तेथे गणिती शून्यच दिसेल. याबाबत विद्यमान सरकार वा शिक्षणमंत्री यांना दोष देऊन कोणालाही मोकळे होता येईल. ते सोपे. याचा अर्थ त्यांचा काहीच दोष नाही असे नाही. आज शिक्षणक्षेत्रात जे गोंधळ दिसत आहेत, त्याची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. परंतु मुद्दा एकूण आपल्या शैक्षणिक वातावरणाचा आहे. जेथे शालेय पातळीवरही चित्रकलेसारखा विषय ‘ऑप्शन’लाच टाकलेला असतो, त्याचे गुण अंतिम निकालात ग्रा धरले जात नाहीत, म्हणून असा एखादा विषयच अग्रा समजला जातो, त्या शैक्षणिक वातावरणात मुलांना मारूनमुटकून द्यायचे म्हटले तरी कलाभान कुठून येणार? हा खरे तर विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्यात बदल होऊन आपले मूल सुजाण सुसंस्कृत कलाभान असणारे असावे असे सर्वच पालकांना वाटेल तो सुदिन म्हणायचा. तोवर अभियांत्रिकीसाठीच्या या निर्णयाचे स्वागत आणि त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.