News Flash

बेफिकिरीचा ऑस्ट्रेलियन वणवा

न्यू साऊथ वेल्स हे ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे सधन राज्य. तेथे जवळपास ४० हजार चौरस किलोमीटर टापू वणव्यांनी व्यापला

(संग्रहित छायाचित्र)

 

स्पेनची राजधानी माद्रिद येथे काही आठवडय़ांपूर्वी अल्पनिर्णितावस्थेत संपुष्टात आलेल्या वातावरणविषयक शिखर परिषदेत- ‘पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी काय करायला हवे’ हे ठरवणाऱ्या मसुद्याला कडाडून विरोध करणारे देश होते अमेरिका, ब्राझील, सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया! याच वाढीव तापमानाच्या समस्येचा फटका सध्या त्या चारपैकी ऑस्ट्रेलियाला बसतो आहे हा काव्यात्मक न्याय मानला, तर त्याची फार मोठी किंमत त्या देशातील अनेक भागांतील सर्वसामान्य जनतेला आणि वनपशूंना मोजावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील खुरटय़ा जंगलांमध्ये लागलेल्या आगींचे विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. ‘बुशफायर’ असे निरुपद्रवी नामकरण झालेले हे वणवे काबूत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्व थरांतील सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संघटना, अग्निशमन आणि वनवणवे तज्ज्ञ कामाला लागले आहेत. परंतु परिस्थितीवर अजूनही म्हणावे तसे नियंत्रण मिळवता येऊ शकलेले नाही. न्यू साऊथ वेल्स हे ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे सधन राज्य. तेथे जवळपास ४० हजार चौरस किलोमीटर टापू वणव्यांनी व्यापला. जवळपास १३०० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि १५ जणांचा मृत्यू झाला. हे सगळे अर्थातच अचानक घडलेले नाही. ऑस्ट्रेलियात सहसा अशा आगी तेथील उन्हाळ्याच्या सुरुवातीला- म्हणजे ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होतात. परंतु २०१९ च्या जुलै महिन्यातच यंदा त्या धुमसू लागल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागात गेली जवळपास तीन वर्षे दुष्काळ होता. त्यामुळे त्या भागांतील जंगले, कुरणांमध्ये सुकलेला पालापाचोळा प्रचंड होता. गेल्या तीन वर्षांत ऑस्ट्रेलियातील तापमानाचेही नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत होते. उदा. गेल्या १८ डिसेंबर रोजी ते नोंदवले गेले ४१.९ अंश सेल्शियस इतके. आगी किंवा वणवे हाताबाहेर जाऊ लागल्याचा इशारा अनेक माजी अग्निशमन प्रमुखांनी, तज्ज्ञांनी सरकारला दिला होता. पण तो ऐकायला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन देशात होते कुठे? ते तर कुटुंबीयांना घेऊन हवाई बेटांवर सुट्टी घालवायला निघून गेले! विशाल भूभागावर वणवा पसरल्यानंतर आणि दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकक्षोभास्तव मॉरिसन मायदेशी परतले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

अर्थात, परिस्थिती अशा प्रकारे हाताबाहेर जाईल याची कल्पना मॉरिसन यांना असली, तरी त्यांच्या सुट्टी नियोजनात फार फरक पडला नसता! कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच- हवामान बदल हा पर्यावरणवाद्यांनी व ‘विरोधकां’नी निष्कारण उभा केलेला बागुलबुवा आहे, असे मॉरिसन साहेबही धरून चालतात. वणवे फक्त हवामान बदलांचा परिपाक आहे असे ते आजही मानत नाहीत. त्यामुळे ते, त्यांचे सरकार आणि त्यांची यंत्रणा या मुद्दय़ावर पुरेशी संवेदनशील नाही. एखाद्या नैसर्गिक आपत्तीविषयीची सजगता आणि सुसज्जता ही निसर्गाविषयीच्या संवेदनशीलतेशी थेट निगडित असते. ऑस्ट्रेलियासारख्या सुस्थापित आणि सामग्रीसुसज्ज देशाकडून या संकटादरम्यान दिसून आलेली ढिलाई एखाद्या विकसनशील वा अविकसित देशाच्या पातळीवरची दिसते. याचे कारण नेतृत्वाच्या पातळीवर असलेली बेफिकिरी. नवपर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही अलीकडेच ऑस्ट्रेलियातील वणवे आणि जागतिक तापमानवाढ यांचा संबंध जुळवला, त्या वेळी- ‘‘परदेशी व्यक्तींनी आम्हाला शिकवू नये,’’ अशी भूमिका मॉरिसन यांनी घेतली होती. अनेकदा अशा प्रकारची नेतृत्वाच्या पातळीवर असलेली बेफिकिरी हितसंबंधांशी निगडित असते. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे वर्षांनुवर्षे अमेरिकेतील तेलसम्राटांशी घनिष्ठ संबंध होते. मॉरिसन यांच्या सरकारने असे स्नेहसंबंध ऑस्ट्रेलियातील कोळसा उत्पादकांशी ठेवले आहेत. याच कंपूच्या आग्रहाखातर किंवा दबावाखातर मॉरिसन यांनी कार्बन कर मोडीत काढला. वणव्यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियन लष्कराला पाचारण केले आणि त्याविषयी ट्विटरवर रीतसर संकलित दृक्मुद्रणफीतही ते दाखवते झाले! परिस्थिती कितीही बिकट असली, तरी ती हाताळण्यात आपले सरकार किती सक्षम आणि सजग आहे याची टिमकी ट्विटरवरून मारण्यात ट्रम्प, मॉरिसन यांच्यासारखे नेते नेहमीच आघाडीवर असतात. मॉरिसन यांची कृती ऑस्ट्रेलियन जनतेला मात्र अधिकच संतप्त करून गेली.

बेफिकिरीचा हा ऑस्ट्रेलियन वणवा हवामान बदलांविरोधात धोरणलकव्याच्या रूपाने जगभर पसरतो आहे. याच भूमिकेतून ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सेनारो अ‍ॅमेझॉन जंगलांतील आगींना अपघाती आणि अपवादात्मक ठरवू पाहतात. डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रेटासारखी मंडळी स्टंटबाज खंडणीखोर वाटतात. एरवी जाहिरातीच्या चौकटीतून बाहेर उडी घेऊ पाहणारे कांगारू हे ऑस्ट्रेलियाच्या समृद्ध जंगलपरंपरेचे आणि पर्यटन प्रसिद्धीचे सुपरिचित प्रतीक ठरते. परंतु गेले काही दिवस आगीपासून बचाव करण्यासाठी सैराट पळणारे, भांबावलेले कांगारूंचे कळप जगभरातील प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील भीतीचा काही अंश जरी मॉरिसन यांच्यासारख्या नेत्यांमध्ये दिसून आला, तर परिस्थिती सुधारू शकेल. पण..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:03 am

Web Title: extreme fires in australias lush forests abn 97
Next Stories
1 ‘लाखोत्तरी’ जीएसटीनंतरचे प्रश्न
2 सक्षमीकरण की नाडणूक?
3 जंगलाचा आभास!