विख्यात उर्दू आणि पाकिस्तानी कवी फैझ अहमद फैझ यांची ‘हम देखेंगे..’ ही बहुचर्चित कविता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनांमध्ये आंदोलकांचे स्फूर्तिगीत बनली होती. ही कविता गाण्यासाठी विशिष्ट स्थळ आणि विशिष्ट काळच योग्य असतो, असा निष्कर्ष आयआयटी कानपूरमधील एका समितीच्या निरीक्षणांतून काढता येऊ शकेल. हे स्थळ कोणते नि काळ कोणता, याचा तपशील संबंधित समिती सांगत नाही. पण १७ डिसेंबर रोजी या आयआयटीमधील पाच प्राध्यापक आणि सहा विद्यार्थ्यांनी निदर्शने करताना ही कविता म्हटली, ती वेळ आणि ती जागा योग्य नव्हे, असे समिती जेव्हा म्हणते तेव्हा कवितेमध्ये काही अयोग्य नाही हेही अप्रत्यक्षपणे कबूलच करते! म्हणूनच ही कविता म्हणण्यासाठी योग्य स्थळ-काळ कोणता, याविषयीचे विवेचनसुद्धा समितीने केले असते तर बरे झाले असते. कानपूर आयआयटीमधील एक हंगामी प्राध्यापक वशी मंत शर्मा यांनी, ही कविता ‘माझ्या धार्मिक भावना दुखावणारी आहे’ अशी तक्रार केली होती. ‘जब अर्झे खुदा के काबे से, सब बुत उठवाये जाएंगे..’ या ओळींना त्यांचा आक्षेप होता. याच कडव्याच्या शेवटच्या ओळींमध्ये ‘सब ताज उछाले जायेंगे, सब तख्त गिराये जाएंगे’ अशाही ओळी आहेत. मुळात या कवितेची आणि कवीची पाश्र्वभूमी शर्मा यांनी जरा पडताळली असती, तर नको त्या शंका त्यांच्या मनात आल्या नसत्या. फैझ अहमद फैझ यांची ही अजरामर कविता विशेषत्वाने गाजली, पाकिस्तानात जनरल झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीविरोधातील स्फूर्तिगीत म्हणून. या कवितेला नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधकांनी जवळ केले आहे. या कवितेची बंगाली, तमिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. १९७९मध्ये फैझ यांनी ही कविता लिहिली. विख्यात गजम्ल गायिका इक्बाल बानो यांनी लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये ती म्हटली, त्या वेळी झिया राजवट हादरली होती. अरबस्तानात सातव्या शतकात अनेक जुलमी राजवटींची प्रतीके-मूर्ती, सिंहासने, घुमट- उखडले जाऊन एका नव्या सर्वसमावेशक पंथाची पहाट झाली. तो संदर्भ या कवितेला असला तरी पुढे सूफी सुधारणावादही आहे आणि तो झिया राजवटीच्या विरोधात चपखल बसतो अशी फैझ यांची धारणा होती. अखेपर्यंत कट्टर कम्युनिस्ट राहिलेल्या फैझ यांना इतर कोणत्याही मूर्तीविषयक, धर्मविषयक संदर्भाशी देणेघेणे नव्हते. तो नसलेला संदर्भ शर्मा यांनी पकडला आणि स्वतचा धर्मच धोक्यात घातला! त्यांनी तक्रार केली ती केलीच, पण तिची दखल आयआयटीसारख्या संस्थेमधील प्राध्यापकवृंदाला आणि व्यवस्थापनाला घ्यावीशी वाटली हे तर आणखी नवल. रीतसर समिती वगैरे स्थापन झाली आणि कविता सादरीकरणाच्या स्थळ-काळावर समिती आक्षेप घेती झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रकारचा संकुचितपणा दिसून येणे हे सध्याच्या परिप्रेक्ष्यात आश्चर्यजनक वाटत नाही. पण आता संदर्भ तपासण्याचेही अशा मान्यवर संस्थांनी सोडून द्यावे हे खेदजनक आणि धोकादायकही आहे. उद्या ‘हर जोर ज्मुल्म से आझादी’ हे डाव्या चळवळीतील स्फूर्तिगीत कुणी गायला सुरुवात केल्यानंतर त्याला विभाजनवादी ठरवले गेल्यास आश्चर्य वाटायला नको. संदर्भाविषयी अनास्था, संदर्भाचा सोईस्कर अर्थ लावणे किंवा त्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करणे ही सवय त्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने फोफावत चालली आहे. एका कवितेची भीती वाटावी किंवा तिच्यामुळे भावना दुखावली जावी इतका आपला समाज अपरिपक्व कधीच नव्हता. पण भावना आणि धर्म हे जिथे हत्यारासारखे वापरले जाते, तिथे कविता ही श्वापदासमान भासणारच ना!