19 January 2019

News Flash

नकाराची नांगरणी..

गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्यांबद्दल कमालीचा राग असतो.

समाजातील सगळ्याच घटकांना गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्यांबद्दल कमालीचा राग असतो. आपल्याच खिशावर डल्ला मारून हे लोक श्रीमंत होतात, त्यांना सगळ्या सोयी-सुविधा आपोआप मिळतात अशी सर्वसामान्यांची समजूत असते. भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांना बुडवून परदेशात बसलेल्या नीरव मोदीबद्दल देशात नेमकी हीच भावना आहे. अशाच पद्धतीने बँकांना गंडवून परदेशात गेलेल्या विजय मल्या याच्याबद्दल समाजमाध्यमांतून ज्या प्रकारे राग व्यक्त केला जातो, तो पाहता, नाकासमोर चालणाऱ्या सामान्यांना अशा व्यक्तींबद्दल राग व्यक्त करण्याची संधीच हवी असते. नोटाबंदीनंतरच्या काळात देशभरातील बँकांसमोर अहोरात्र रांगेत उभे राहून आपल्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी खस्ता खाणाऱ्या प्रत्येकाला देशातील श्रीमंतांची कशी जिरली, याचा आनंद अधिक होता. नीरव मोदी याने अहमदनगर जिल्ह्य़ातील कर्जत येथे खरेदी केलेल्या जमिनीवर नांगरणी करून तेथील ग्रामस्थांनी जे आंदोलन केले, ते असा राग व्यक्त करण्यासाठीच होते. मल्याच्या किती तरी आधीपासून परदेशातील, विशेषत: स्विस बँकेत, काळ्या पैशाची रास असल्याची चर्चा भारतीय समाजात सतत होत राहिली आहे. हे पैसे परत भारतात आणले, तर प्रत्येकाच्या वाटय़ाला किती पैसे येतील, याची हिशेबही करून झाला आहे. परदेशांत काळा पैसा असू नये, यासाठी ‘प्रयत्न’ तर प्रत्येकच सरकार करत असते. भाजपने तर हा पैसा आणण्याचा विडाच उचलला होता आणि मतदारांच्या मनावर हलकीशी फुंकरही घातली होती. प्रत्यक्षात असे काही झाले नाही, उलट भारतीय बँकांची फसवणूक करून परदेशात आश्रय घेणाऱ्या ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी यांच्यासारख्यांची यादी वाढतच राहिली. नीरव मोदीने कर्जत येथील जमिनी फसवून कमी भावात खरेदी केल्या. त्या वेळी ग्रामस्थांना नोकरीचे आमिषही दाखवले. शेतकऱ्यांच्या हाती एकरी दहा ते पंधरा हजार असा भाव पडला, परंतु त्यांचे सगळे भविष्यच उद्ध्वस्त झाले. याबद्दल कोण कुणाला जबाबदार धरणार, असा खरा प्रश्न. पण आपण फसवले गेले आहोत, ही भावना जसजशी बळावत जाते, तसा रागाचा पाराही वरवर जात राहतो. समूहाने फसले जाण्याच्या अशा घटनांनी मनाचा उद्रेक होतो आणि त्यातून प्रतीकात्मक का होईना, पण आंदोलन उभे राहू लागते. नीरव मोदी आणि त्याचे साथीदार यांनी बँकांशी संगनमत करून व्यवहार केले, त्याबद्दलचा राग रस्त्यावर येऊन व्यक्त करता येणे शक्य नसले, तरीही त्याची खदखद मात्र सदैव वाढत असते. विजय मल्या काय किंवा नीरव मोदी काय, यांनी देशाला लुटले, अशी सर्वसामान्यांची भावना होते, त्यातून काही कृती घडते. कर्जतमधील जमिनीवर ग्रामस्थांनी नांगर फिरवून राग व्यक्त केला आणि काळी आई मुक्तिसंग्रामाला सुरुवात केली. असे आंदोलन करून या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा मिळणे शक्य नसले, तरी ही कृती निदान मनाची समजूत घालणारी तरी असतेच. परदेशी बँकांमधील पैसा हे जसे सामान्यांचे मृगजळ असते, तसेच ते एक राजकीय हत्यारही असते. समाजातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमध्ये दुष्ट प्रवृत्तींचा विजय होता कामा नये, असे प्रत्येकाला वाटत असते. सुष्ट प्रवृत्ती अशा दुष्टांचा नाश करते, असेच लोकप्रिय चित्रपटांपासून अभिजात साहित्यापर्यंत व्यक्त होत असते. प्रत्यक्षात असे घडत नाही, ही वस्तुस्थिती नाकारण्यास त्यामुळेच सामान्यजन तयार नसतात. मातीमोल भावाने विकलेल्या जमिनी नांगरण्याचे आंदोलन याच नकारातून आकाराला येते.

First Published on March 19, 2018 2:44 am

Web Title: financial scams in india