निसर्गावर प्रेम करण्याची आपली संस्कृती वगैरे बऱ्याचदा ऐकविले जाते, पण ही संस्कृती अग्निकुंडे पेटविणारी आणि प्राण्यांचे बिनदिक्कत बळी देणाऱ्यांचीही आहे, हेच मंगळवारी दिसले. मंगळवारच्या पहाटे भारताचे राष्ट्रीय निसर्गेतिहास संग्रहालय आगीत भस्मसात झाले. प्राणी-पक्ष्यांच्या इतिहासाचा मौल्यवान ठेवा आगीत जळाला. त्याबद्दल आपल्या या राजधानीतील सत्ताधारी किंवा विरोधी बाकावरल्यांना तीव्र चिंता वगैरे तर सोडाच, देशभरच्या सामान्यजनांना हळहळदेखील वाटली नाही. दिल्ली परिसरातील शाळांच्या शैक्षणिक भेटींपुरते हे संग्रहालय गेल्या काही वर्षांत गजबजलेले दिसे, हेदेखील आपल्याच अव्वल संस्थांकडे आपण किती दुर्लक्ष करतो, याचे एक लक्षण. यात १६ कोटी वर्षांपूर्वीच्या डायनोसॉरसदृश प्राण्याचा अतिदुर्मीळ जीवाश्मीभूत अवशेष होता. दोन आशियाई सिंहांचे, तसेच पांढऱ्या वाघाचे जतनही ‘टॅक्सिडर्मी’ (जुना मराठी शब्दप्रयोग : ‘पेंढा भरणे’) या तंत्राने करण्यात आले होते. देशातून नामशेष झालेल्या दोन गिधाडांचेही ‘टॅक्सिडर्मी’ अवशेष या संग्रहालयात होते. हे सारे आता पुढल्या पिढय़ांना पाहता येईल का? मुळात, हा सारा अनमोल निसर्गठेवा होता किंवा मानला जायला हवा, हे तरी आजच्या धुरिणांना मान्य आहे का? तसे नसेल, तर या संग्रहालयापेक्षा त्याच इमारतीतील वरच्या मजल्यावरील ‘फिक्की’ अर्थात देशातील उद्योग-संघटनांच्या महासंघ कार्यालयाला आग लागली, एवढेच अधिक गांभीर्याने पाहिले जाईल. या फिक्कीचे प्रसारमाध्यम-स्नेही जनसंपर्क खाते आतापासूनच विजेच्या वेगाने कामाला लागले आहे. या जनसंपर्कवाल्यांचे म्हणणे असे की, या इमारतीचा आमच्या ताब्यातील भाग अत्यंत सुरक्षित होता. या अख्ख्या इमारतीला सर्व संबंधित यंत्रणांनी सुरक्षा-प्रमाणपत्रे दिलेली आहेत. हे जर खरे मानले, तर आग इमारतीच्या सहाव्या मजल्यापासून खाली पसरत गेली आणि तिने सहाही मजले गिळून टाकले, हा काय दृष्टिभ्रम म्हणायचा का? दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार तर, या इमारतीत असलेली साधी अग्निशामक नळकांडीसुद्धा काम करत नव्हती. अग्निशमन दलाचे १०० जवान आणि चार बंब सुमारे साडेतीन तास ज्या आगीशी झुंजत होते, ती पहाटेच्या सुमारास लागण्याऐवजी जर एखाद्या शाळेची सहल येथे आली असताना लागली असती तरच आपले डोळे उघडणार होते का? अर्थात, कोणत्याही इमारतीला आग लागली तरी इमारतीचे सुरक्षा परवाने धड होते की नाही, इमारतीतील अग्निशामक साधने कालबाह्य़ होती की नादुरुस्त होती, याबद्दल अग्निशमन दल आणि इमारतीची जबाबदारी असणारे लोक यांच्यात दुमत असतेच. मग ते मुंबईचे मंत्रालय का असेना. साऱ्याच यंत्रणा किडल्या आहेत, असे म्हणून आपण सारे गप्प बसतो, ते दुसरी आग लागेपर्यंत. राष्ट्रीय निसर्गेतिहास संग्रहालयाच्या आगीबाबतचे प्रश्न केवळ आगीच्या शक्यतेकडे दुर्लक्ष किंवा सुरक्षा उपायांत हलगर्जी एवढेच मर्यादित नाहीत. संग्रहालये किंवा अभिलेखागारे ही आपलाच इतिहास आपण अधिक निदरेषपणे पाहावा यासाठीची गुंतवणूक असते, हे ओळखण्याऐवजी नवे कर्मचारीच न भरणे किंवा आर्थिक तरतूद वर्षांनुवर्षे न वाढविणे यासारखा बेमूर्वतपणा सरकारे करतात. मग संग्रहालयातील मनुष्यबळही आतून किडते. ‘काय फरक पडतो?’ ही वृत्ती बळावतेच. देशभरच्या अशा अनेक संस्थांतून नामशेष झालेल्या सकारात्मक वृत्तीचे ‘जीवाश्म’ कुठे सापडत नव्हते, ते सापडल्याच्या आनंदात केंद्र सरकारने निसर्गेतिहास संग्रहालयाची भस्मसात इमारत तशाच अवस्थेत ठेवून द्यायला हवी!