13 December 2019

News Flash

हवामान बदलाचे तडाखे

सलग दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ांना पावसाचा तडाखा बसल्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सलग दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ांना पावसाचा तडाखा बसल्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या थैमानाचे हे लोण आता नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्येही पोहोचले आहे. अतिवृष्टीमुळे नाशिक आणि कोल्हापूर या प्रगत शहरांमध्ये अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहणे किंवा धरणांमधील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यास विसर्गरूपात पाणी शहर वा गावांमध्ये सोडावे लागणे असे प्रकार महाराष्ट्रात गेले तीन दिवस ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे काही भागांत माणसांचे जीव धोक्यात आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालेलेच आहे. मुंबई शहर आणि परिसरात उपनगरी रेल्वे सेवा बहुतेक ठिकाणी बराच काळ खोळंबली.  दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाडय़ात अद्याप पावसाळा म्हणावा इतका पाऊसच झालेला नाही. गेल्या सुमारे दशकभरात या विभागांना सातत्यपूर्ण पावसाळा अनुभवताच आलेला नसला, तरी याच भागांत अवकाळी पावसाचे फटके मात्र गेल्या दशकभरातच अधिक वारंवार बसले आहेत. मुंबई आणि परिसरातही पावसाचा एक गुणधर्म सुनिश्चित होऊ पाहात आहे. हा पाऊस संपूर्ण हंगामात सातत्याने न पडता, एखाद्या आठवडय़ात अकस्मात अधिक पडतो. त्यामुळे हंगामाअखेरीस पावसाची सरासरी नेहमीसारखी दिसत असली, तरी पारंपरिक पावसापेक्षा अशा तडाखेबंद पावसाने केलेला विध्वंस कितीतरी पटीने अधिक दिसून येतो. या बदलत्या प्रकाराला हवामानतज्ज्ञांनी जागतिक हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) एक परिणाम असे संबोधले आहे. या हवामान बदलाची विविध रूपे जगभर दिसू लागली आहेत. ४१, ४० आणि ३९ अंश सेल्शियस अशी तापमाने भारतातील बहुतेक शहरांमध्ये वर्षांतून काही दिवस अनुभवायला मिळतातच. पण यंदा अनुक्रमे अ‍ॅमस्टरडॅम, लंडन आणि पॅरिस या युरोपीय शहरांमध्ये अशा तापमानांची नोंद झालेली आहे. अशा प्रकारच्या तापमानात नेमके काय करायचे, याची कल्पना व तयारीच नसल्यामुळे युरोपसारख्या प्रगत मानल्या जाणाऱ्या खंडात उष्णतेच्या लाटेचे बळीदेखील नोंदवले गेले आहेत. आइसलँड देशात यंदा १८ ऑगस्टला त्यांच्या एका प्रसिद्ध हिमवाहासाठी (ग्लेशियर) चक्क शोकसभा आयोजित करण्यात आली आहे! ओक्योकुल नामक हा हिमवाह २०१४ मध्ये वितळून फारच चिमुकला बनला, ज्यामुळे त्याचा हिमवाहाचा दर्जा काढून घ्यावा लागला. पहिल्यांदा नोंदवला गेला तेव्हा जवळपास ५.८ चौरस मैल क्षेत्रफळ असलेला हा हिमवाह २०१४ मध्ये मूळ आकाराच्या अवघा ६.६ टक्के (०.३८६ चौरस मैल) शिल्लक राहिला होता. जागतिक तापमानवाढीमुळे या हिमवाहाचा मृत्यू ओढवला आहे. आता भौगोलिकदृष्टय़ा लहानशा राहिलेल्या या पूर्वाश्रमीच्या हिमवाहाला ‘मृत बर्फ’ असे संबोधले जाईल. ओक्योकुल हिमवाहाचे स्मारक उभारले जात असून, त्यावरील स्मृतिसंदेश तापमानवाढीची सद्य:स्थिती नेमक्या शब्दांत पकडतो. ‘‘पुढील २०० वर्षांत आपल्या इतर हिमवाहांवरही हीच वेळ येईल. काय होते आहे आणि काय करावे लागेल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे..’’ या स्मृतिसंदेशाला ओक्योकुलच्या चाहत्यांनी ‘भविष्यपत्र’ असे संबोधले आहे आहे. जागतिक तापमानवाढ, त्यातून उद्भवणाऱ्या हवामान बदलांनी जगभर विध्वंस घडवायला सुरुवात केली आहे. ओक्योकुलचे जसे ‘भविष्यपत्र’ आइसलँडवासींनी लिहिले, तसे मुंबई-ठाणे वा पश्चिम महाराष्ट्रात बसणाऱ्या तडाख्यांचे किंवा विदर्भ-मराठवाडय़ातील अवकाळी पावसाचे भविष्यपत्र लिहिण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे अनेकांना वाटेल. पावसाळ्याऐवजी आपण तडाखेच अनुभवतो आहोत, हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे हे या अनेकांच्या गावीही नसल्यामुळे ते साहजिकच म्हणायला हवे. वास्तविक, मुंबईत प्रलयंकारी ठरलेल्या ’२६ जुलै २००५’ नंतर याविषयीचे शास्त्रीय अभ्यास सुरू झाले आहेत. नोव्हेंबर २००६च्या ‘न्यू सायंटिस्ट’मधील लेखात कॅथरीन ब्राहिक यांनी, यापुढे भारतातील पावसाळ्यात सातत्यपूर्ण पाऊस न पडता तडाखे देणारी वादळेच अधिक असतील, असा निष्कर्ष त्यापूर्वीच्या दोन अभ्यासांतून काढला. त्याला अनेक परदेशी (युरोपीय, अमेरिकी, जपानी) हवामानशास्त्रज्ञांनी दुजोराही दिला आहे. परंतु भारतातील सरकारी हवामान यंत्रणांनी हे वास्तव पुरेशा गांभीर्याने मान्यच केलेले नाही. हे गांभीर्य ओळखले गेले, तर आपल्या शहर नियोजनापासून अनेक क्षेत्रांतील धोरणांची दिशा बदलू शकेल. तसे होईल, तोवर आपण हवामान बदलाचे तडाखेच झेलत राहू.

First Published on August 5, 2019 12:07 am

Web Title: flood due to heavy rainfall in maharashtra mpg 94
Just Now!
X