‘जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा लालू..’ ही  घोषणा होती बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची. २०१३ मध्ये सहापैकी पहिल्या खटल्यात दोषी ठरलेल्या लालू यांना जामीन झाल्यावर त्यांनी तुरुंगाबाहेर आल्यावर आपले अस्तित्व दाखविण्याकरिता स्वत:ची आलू म्हणजे बटाटय़ाबरोबर तुलना केली होती. दुसऱ्या खटल्यात लालूप्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांची रवानगी तुरुंगात झाली. लालूप्रसाद आणि तुरुंगवारी हे जणू काही समीकरणच झाले आहे, कारण आतापर्यंत आठ वेळा त्यांची तुरुंगवारी झाली आहे. ‘आलू तो रहेगा, पर लालू तो जेल में ही रहेगा’ ही भाजपच्या एका नेत्याने केलेली कोटी बरीच बोलकी आहे. टू-जी घोटाळ्यात सर्व आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता करणे आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला गुदरण्यास परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने लागोपाठ दोन दिवस केंद्रातील सत्ताधारी भाजपला फटका बसला होता. लालूप्रसाद यांना न्यायालयाने दोषी ठरविल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपला दिलासा मिळाला आहे. लालू यांना न्यायालयाने दोषी ठरविले त्याच दिवशी त्यांची कन्या मिसा हिच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एकूणच लालूंना हा दुहेरी धक्का आहे. पहिल्या खटल्यात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यावर जामीन मिळाला होता. तेव्हा केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार होते आणि लालूंच्या पक्षाचा सरकारला पाठिंबा होता. आता केंद्रात तसेच झारखंडमध्ये भाजपची सत्ता असल्याने लालूंच्या जामिनाला सीबीआयकडून विरोध होऊ शकतो. एकूणच लालूंसाठी कठीण दिवस आहेत. बिहारच्या राजकारणावर लालूप्रसाद यांची वेगळी पकड किंवा वर्चस्व आहे. चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यावरही लालूप्रसाद यांचा जनाधार कायम असल्याचे दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाले. तेव्हा लालू आणि नितीश एकत्र लढले असले तरी सर्वाधिक जागा या लालूंच्या राष्ट्रीय जनता दलास मिळाल्या होत्या. लालू जेव्हा केव्हा तुरुंगात जातात तेव्हा त्यांचा पक्ष अधिक मजबूत होतो, अशी प्रतिक्रिया त्यांच्याच एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. कोटय़वधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतले. अमित खरे या आयएएस अधिकाऱ्याने हा घोटाळा प्रथम उघडकीस आणला. चाऱ्याच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून कोटय़वधी रुपये राजकारण्यांनी लुटले. न्यायालयाने दोषी ठरविल्यावर लालूंनी स्वत:ची तुलना नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. या तिन्ही महान नेत्यांनी समाज- परिवर्तनासाठी केलेल्या कार्याची आणि लालूंची तुलनाच होऊ शकत नाही. जातीय रंग आणि सामाजिक ढाल पुढे करण्याचा लालूंनी कितीही प्रयत्न केला तरीही लालूंकडे पशुसंवर्धन खाते असताना खोऱ्यासारखे पैसे सरकारी तिजोरीतून लुटण्यात आले होते. लालू आता सारा दोष भाजपला देत असले तरी १९९७ मध्ये चारा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीस लालूंचे साथी एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान असतानाच परवानगी देण्यात आली होती हे दुर्लक्षित करता येणार नाही. लालू दोषी ठरल्याने काँग्रेसची परिस्थिती अवघडल्यासारखी झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २०१९च्या लोकसभेची तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्यावर काँग्रेसची सारी मदार होती. नेता कितीही मोठा असला तरी भ्रष्टाचार करणाऱ्यांची खैर नाही हा चांगला संदेश या निकालाने दिला आहे.