News Flash

चैतन्यमूर्ती!

मुंबईचे नगरपाल, कॅम्लिनचे संचालक, मुंबई चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या.

माधवराव आपटे

आयुष्यात अन्याय आणि अपयशामुळे कित्येक जण उन्मळून पडतात आणि पुन्हा कधीही उभे राहू शकत नाहीत. इतर काही जण त्या बिकट कालखंडातून बाहेर पडतात, पण आयुष्याविषयी आणि समाजाविषयी कटुता बाळगत कुढत जगतात. माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधवराव आपटे यांची तऱ्हा या दोन उदाहरणांपेक्षा पूर्णपणे वेगळी. कारकीर्दीच्या सुरुवातीस वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचे माधवरावांनी सोने केले. १९५२-१९५३ मधील त्या दौऱ्यात माधवरावांनी एका खणखणीत शतकासह ४६० धावा केल्या. पहिल्याच परदेशी दौऱ्यात अशी कामगिरी केल्यानंतर त्यांची कसोटी क्रिकेट कारकीर्द प्रदीर्घ आणि झळाळती ठरणार, असा अंदाज बहुतेक सहकारी, माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषकांनी व्यक्त केला. पण माधवराव त्यानंतर अवघा एकच कसोटी सामना खेळले. यात त्यांच्या कामगिरीपेक्षाही तत्कालीन निवड समिती अध्यक्ष आणि माजी कर्णधार लाला अमरनाथ यांनी त्यांच्याकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले. पण तरीही माधवराव खचले नाहीत, आसवे गाळत बसले नाहीत वा वडिलोपार्जित साखर आणि कापडनिर्मिती उद्योगांमध्ये त्यांनी स्वतला चौकटबद्ध केले नाही. माधवराव क्रिकेटशी एकनिष्ठ राहिले आणि समाजाप्रति कृतज्ञ राहिले. क्रिकेटच्या परिभाषेत वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्रदीर्घ ‘इनिंग’ सोमवारी संपुष्टात आली, पण आजही त्यांच्याशी संबंधित सर्वानाच माधवराव आठवतात, ते क्रिकेटप्रमाणेच जगण्यावर प्रेम करणारे आणि अखेपर्यंत रसरशीत राहिलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणून. लाला अमरनाथांविषयी एक आठवण माधवरावांनी त्यांच्या आत्मचरित्रात (‘अ‍ॅज लक वुड हॅव इट – अनप्लग्ड अनकट’) दिलेली आहे. माधवरावांचे वडील लक्ष्मणराव यांच्या कोहिनूर मिलचे दिल्लीतील वितरक बनण्याची अजब इच्छा लाला अमरनाथांनी माधवरावांकडे एका सामन्याच्या वेळी बोलून दाखवली. माधवरावांनी त्यांची लक्ष्मणरावांशी भेट घालून दिली. ‘पण मी किंवा भाऊसाहेब (लक्ष्मणराव) क्रिकेट आणि व्यवसाय यांना एकत्र गुंफण्याविरुद्ध होतो. त्यामुळे वितरक बनण्याचा प्रस्ताव अमान्य झाला. लाला अमरनाथ पुढील काही वर्षे निवड समिती अध्यक्ष राहिले, पण ते असताना माझी निवड भारतीय संघात कधीही होऊ शकली नाही,’ असे माधवराव लिहितात. विनू मांकड, विजय हजारे, विजय र्मचट, पॉली उम्रीगर, सुभाष गुप्ते अशा दिग्गजांबरोबर खेळण्याची, त्यांना जवळून पाहण्याची संधी माधवरावांना मिळाली. परंतु मुंबईकर क्रिकेटपटूंच्या वाटय़ाला त्या काळी यश आणि उपेक्षा असे दोन्ही यायचे. प्रत्येक गुणवान क्रिकेटपटूला भारतीय संघातून प्रदीर्घ काळ खेळण्याची संधी मिळेलच, याची शाश्वती नव्हती. मुंबई क्रिकेटला गुणवत्तापुरवठा करणाऱ्या कांगा साखळीत माधवराव तब्बल ५० वर्षे खेळले. दि. ब. देवधरांपासून सचिन तेंडुलकपर्यंत सगळ्यांबरोबर माधवराव खेळले. शेवटचा कांगा साखळी सामना खेळले, त्या वेळी ते ७१ वर्षांचे होते! क्रिकेटबरोबरच स्क्व्ॉश आणि बॅडमिंटन या खेळांत ते पारंगत होते. लक्ष्मी विष्णू गिरणी, जम्बो आइसक्रीम, फलटण शुगर वर्क्‍स, स्वस्तिक समूह यांचे यशस्वी परिचालन त्यांनी केले. मुंबईचे नगरपाल, कॅम्लिनचे संचालक, मुंबई चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष असताना, १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची गुणवत्ता हेरून त्यांनी त्याला क्लबकडून खेळण्याची संधी दिली. त्यांच्या घरी क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमी, वैचारिक वर्तुळातील सुहृदांचा नेहमीच वावर असे. सदा हसतमुख, क्रिकेटसह इतर खेळांच्या, उद्योग  व्यवसायांच्या विविध बारकाव्यांची जाण आणि ती उपस्थितांबरोबर वाटून घेण्याचा मोकळेपणा आणि रसरशीतपणा माधवरावांच्या ठायी होता. या चैतन्यमूर्तीला ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:46 am

Web Title: former india cricketer madhav apte dies zws 70
Next Stories
1 आखातातील धोकादायक पेच
2 अस्मिता केंद्रस्थानी, अर्थकारण परिघावर
3 पाकव्याप्त काश्मीरच्या निमित्ताने..
Just Now!
X