अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी चौदा वर्षांपूर्वी सैतानी अक्ष अशी संकल्पना मांडली होती. इराण, इराक आणि उत्तर कोरिया हे या अक्षाचे तीन अक्षबिंदू. ही अर्थात बुश यांच्या तत्कालीन युद्धखोर राजकारणाला अनुरूप अशी मांडणी होती. त्यातील इराक केव्हाच बेचिराख झाला. इराणला वठणीवर आणण्यात आले. उरला उत्तर कोरिया. तो देश मात्र बुश यांचे मत किती योग्य आहे हेच वारंवार सिद्ध करून दाखवीत आहे. दक्षिण कोरिया या आपल्या पारंपरिक शत्रूला नमविणे हे एकमेव उद्दिष्ट बाळगणारा हा देश आणि त्याचे (दिवंगत) किम जाँग इल तसेच किम जाँग ऊन हे हुकूमशहा यांची आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तणूक ही सातत्याने दांडगाईची राहिलेली आहे. जपानच्या सागरी हद्दीत क्षेपणास्त्र डागून त्यांनी बुधवारी या दांडगाईची परिसीमा गाठली. उत्तर कोरियाच्या म्हणण्यानुसार हे क्षेपणास्त्र कोरिया आणि जपान यांच्यातील समुद्रात पडले. जपानच्या म्हणण्यानुसार ते जपानच्या सागरी विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळले. तसे असेल तर तो निश्चितच गंभीर प्रकार आहे. हे सहन केले जाणार नाही, असे जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी म्हटले आहे. या वर्षांच्या सुरुवातीपासून उत्तर कोरियाने जणू आंतरराष्ट्रीय समुदायास धाब्यावर बसविण्याचा निश्चय केला आहे. जानेवारीत या देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून जगाला धक्का दिला. त्यानंतर तीनच महिन्यांत चौथ्या अणुचाचणीसाठी हालचाली सुरू केल्या. मे महिन्यात पाणबुडीवरून डागण्यात येणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी केली. या अशा कृत्यांतून उत्तर कोरियाने लष्करी तणाव निर्माण करू नये असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी दिला, तर या देशाच्या हेकट हुकूमशहाने त्यांचा उत्तर कोरियाचा दौराच रद्द करून टाकला. वर पुन्हा जूनमध्ये त्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी करून आंतरराष्ट्रीय समुदायास वाकुल्या दाखविल्या. उत्तर कोरियाच्या या अशा कृत्यांमुळे दक्षिण कोरियावरही शस्त्रसज्जतेचा दबाव येतो. तो देश आपली संरक्षणसिद्धता वाढवितो आणि त्यामुळे उत्तर कोरियाला आयतीच आपली अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रसज्जता वाढविण्याची संधी मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून हे चक्र अबाधित सुरू आहे. या दोन देशांच्या शस्त्रस्पर्धेला तिसरा कोन आहे तो चीन आणि अमेरिका यांच्यातील प्रभावक्षेत्राच्या स्पर्धेचा. शीतयुद्धकालीन अमेरिकेच्या साम्यवादविरोधाला असलेला अर्थकारणाचा पदर या स्पर्धेत प्रच्छन्नपणे फडकताना दिसतो. अमेरिकेच्या लष्करी-औद्योगिक संकुलाची दक्षिण कोरिया ही गरज आहे. दक्षिण कोरियाच्या आणि तेथील अमेरिकी तळाच्या सुरक्षेसाठी तेथे आधुनिक क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुढील वर्षांखेरीस ती कार्यरत होईल. गेल्या महिन्यात त्याची घोषणा झाली आणि केवळ त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने बुधवारी क्षेपणास्त्रे डागली. त्यातील एक हवेतच जळून गेले. दुसरे जपानच्या समुद्री हद्दीत पडले. ही जपानला दिलेली चिथावणी असून, दक्षिण चिनी सुमद्रात सुरू असलेल्या चीन विरुद्ध जपान वादाच्या पाश्र्वभूमीवरच त्याकडे पाहावे लागेल. मुळात चीनकडील अण्वस्त्र तंत्रज्ञान पाकिस्तानी धातुतज्ज्ञ ए. क्यू. खान यांच्यामार्फत चोरटय़ा मार्गाने पुरविले गेल्यामुळेच उत्तर कोरिया अण्वस्त्रस्पर्धेत उतरण्यास तयार झाला, हा इतिहास फार तर दोन दशकांपूर्वीचा. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असण्यातील धोका त्या देशाच्या बेजबाबदारपणामुळे अधिक असल्याचे भारतास वाटते, तर दक्षिण कोरियाची भीती कोणत्या पातळीची असेल याची कल्पना केलेली बरी. जपानच्या सागरी हद्दीतील उत्तर कोरियाच्या दु:साहसाला चीनचाही कोन असल्याने यातून पुढे काय घडेल हे सांगणे उत्तर कोरियाला आवरण्याएवढेच कठीण आहे. मध्य पूर्वेत गुंतलेल्या अमेरिकेला हा नवा आशियाई गुंता परवडणारा नाही. तेथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी बुश यांची आणखी बिघडलेली आवृत्ती अध्यक्षपदी आली तर अमेरिका हेही साहस करू शकेल. तोवर मात्र उत्तर कोरियाच्या डरकाळ्या अशाच सुरू राहतील. तोवर तरी हा प्रश्न बिनउत्तराचाच राहणार आहे.